मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

By रवींद्र चांदेकर | Published: August 16, 2023 07:19 PM2023-08-16T19:19:14+5:302023-08-16T19:20:08+5:30

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले.

Mother and two child last rituals on same time, : husband and in laws arrested | मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

मातेसह दोन चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार, पतीसह सासू-सासरे यांना अटक

googlenewsNext

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील माता व चिमुकल्यांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या दुर्दैवी प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. निंगनूर व आजूबाजूची अनेक गावेही या काळीज पिळविटणाऱ्या प्रसंगाने शोकमग्न झाली.

रेश्मा नितीन मुडे (२६), श्रावणी (६) आणि सार्थक (३) अशी त्या तीन मायलेकांची नावे आहेत. नितीन मुडे व रेश्मा मुडे यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. नितीनला दारूचे व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे आर्थिक टंचाईत वाढ होत गेली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर श्रावणी व सार्थक अशी फुले उमलली. दारूच्या व्यसनामुळे नितीनला ऑटोरिक्षा विकावी लागली. त्यामुळे तो रेश्माला माहेरवरून पैसे आणण्यासाठी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता, अशी माहिती रेश्माच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. सततच्या जाचामुळे आयुष्याला कंटाळलेल्या रेश्माने आपली दोन्ही चिमुकले श्रावणी आणि सार्थक यांच्यासह आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. स्वतः विषाचा घोट घेत तिने दोन्ही निरागस लेकरांना विष पाजले.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसाआधी सोमवारी निंगनूर येथे ही घटना घडली होती. या घटनेत रेश्मासह दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 
देशभर स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असताना हे आक्रीत घडले होते. या प्रसंगाने परिसरावर शोककळा पसरली. आईने पोटच्या गोळ्यांना घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे समाजमन सुन्न झाले. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून तिन्ही मृतदेह निंगनूर येथे आणण्यात आले. त्यावेळी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता.

रेश्माच्या माहेरची मंडळी आणि आप्तेष्टांनी हंबरडा फोडला. तिघांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सासरच्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यानंतर रेश्माचा पती नितीन मुडे, सासरे किसन हेमला मुडे आणि सासू निर्गुणा मुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध हुंडा बळी आणि छळ केल्याप्रकरणी भादंवि ४९८ अ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३०६ आणि ३४ कलमानुसार गुन्हा नोंद केला. त्यानंतर एकाच चितेवर तिन्ही मायलेकरांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जड अंतःकरणाने शेवटचा निरोप

रेश्मा, श्रावणी आणि सार्थकच्या मृतदेहांना एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थितांचे अंतःकरण भरून आले. मान्यवरांसह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. निंगनूर येथे बुधवारी एकही चूल पेटली नाही. संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येकजण दुःख व्यक्त करत होते. आबालवृद्धांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता. सर्वच जण हळहळ व्यक्त करीत होते.

Web Title: Mother and two child last rituals on same time, : husband and in laws arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.