दिव्यांग लाभार्थ्याच्या घरकुलाची फाईलच गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 10:08 PM2018-01-12T22:08:56+5:302018-01-12T22:09:19+5:30

प्रशासनाच्या कारभाराने एका दिव्यांगाचे घरकुलाचे स्वप्नही अपंग झाले आहे. घरकुलाची चक्क फाईलच बेपत्ता झाली आहे. नवीन बांधायचे म्हणून जुने घर पाडल्याने संपूर्ण कुटुंबाला थंडीत कुडकुडत दिवस काढावे लागत आहे.

 Missing file from Divyang beneficiary's cottage file | दिव्यांग लाभार्थ्याच्या घरकुलाची फाईलच गहाळ

दिव्यांग लाभार्थ्याच्या घरकुलाची फाईलच गहाळ

Next
ठळक मुद्देनेर पंचायत समितीचा कारभार : जुने घर पाडले, संसार उघड्यावर, न्यायासाठी आता उपोषणाची तयारी

सुरज नौकरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगावदेवी : प्रशासनाच्या कारभाराने एका दिव्यांगाचे घरकुलाचे स्वप्नही अपंग झाले आहे. घरकुलाची चक्क फाईलच बेपत्ता झाली आहे. नवीन बांधायचे म्हणून जुने घर पाडल्याने संपूर्ण कुटुंबाला थंडीत कुडकुडत दिवस काढावे लागत आहे. नेर तालुक्याच्या मांगुळ येथील सुरेश विठ्ठल पांडे या दिव्यांगाची ही व्यथा आहे. नेर पंचायत समितीकडून मात्र हा विषय सहज घेतला जात आहे.
वयोवृद्ध असलेल्या सुरेश पांडे यांनी घरकुलासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. सचिवाने घरकूल मंजूर झाल्याचेही पांडे यांना सांगितले. जुने घर पाडून टाका, नवीनची तयारी करा असे सांगितल्याने पांडे यांनी सूचनेचे पालन केले. गृह कर, पाणी कर भरण्यासाठी उसनवार पैसा आणला. घरातला कापूस स्वस्तात विकून घर पाडण्याची मजुरी दिली. घरकूल मंजूर झाल्याने हाती लवकरच पैसा येईल या आशेवर राहिलेल्या पांडे यांना दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही रक्कम मिळाली नाही. ग्रामसेवकाशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने पांडे हे चक्कर येवून पडले. फाईलच हरवल्याने घरकूल मिळणार नाही, असे सचिवांनी सांगितले. फाईलविषयी आता टोलवाटोलवी सुरू आहे. ग्रामसेवक म्हणतात, पंचायत समितीकडे सादर केली तर पंचायत समिती आम्हाला मिळालीच नाही, असे सांगते आहे. प्रशासनातील या भोंगळ कारभारात सदर लाभार्थी मात्र पिचला जात आहे. नव्याने प्रक्रिया करून घरकूल उभे राहील. मात्र आज तरी पांडे यांना टिनाच्या झोपडीत दिवस काढावे लागत आहे. घरकुलाचा लाभ न मिळाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा पांडे यांनी दिला आहे.

सदर अपंग व्यक्तीच्या घरकुलाची फाईल ग्रामसेविकेने आपल्याकडे सादर केली नाही. फाईल सादर केल्याची कुठलीही रिसिव्ह त्यांच्याकडे नाही.
- आशीष राऊत
विस्तार अधिकारी, पं.स.,नेर

सुरेश पांडे यांच्या घरकुलाची फाईल हरविली आहे. नवीन तयार करून त्यांना घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- शारदा कांबळे
ग्रामसेविका, मांगुळ

Web Title:  Missing file from Divyang beneficiary's cottage file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.