ठळक मुद्देतक्रारीने फोडले बिंग : शवविच्छेदनासाठी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला

सुदाम दारव्हणकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रुंझा: मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह परस्परच पुरल्याचा खळबळजनक प्रकार पांढरकवडा तालुक्यातील झोटींगधरा गावात उघडकीस आला. शुक्रवारी पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी गावातीलच बाप-लेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.
प्रकाश आनंदराव आत्राम (३३) रा. कोलामपोड झोटींगधरा असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर गावातीलच नंदलाला मोतीराम टेकाम (४५) व त्याची दोन मुले अंबादास (२१) आणि गोपाल (१९) यांनी २९ आॅक्टोबर रोजी प्राणघातक हल्ला केला होता. गंभीर जखमी प्रकाशला तातडीने रुंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर डॉ.उपाध्ये यांनी प्रकाशला यवतमाळला रेफर केले. तेथे उपचार सुरू असताना ७ नोव्हेंबर रोजी प्रकाशचा मृत्यू झाला. मात्र त्याचे कोणतेही शवविच्छेदन केले गेले नाही. त्याचा मृतदेह गावाबाहेरच परस्पर जमिनीत पुरण्यात आला. दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी मृतक प्रकाशचे वडील आनंदराव आत्राम यांनी पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकरण कथन करीत फिर्याद नोंदविली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार असलम खान पठाण, नायब तहसीलदार बोनगीनवार शुक्रवारी सकाळीच डॉक्टरांसह झोटींगधरा गावात पोहोचले. प्रकाशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपाध्ये यांनी जागीच शवविच्छेदन केले. या प्रकरणी नंदलाल टेकाम व त्याच्या दोन मुलांविरुद्ध खून व पुरावा नष्ट करणे या कलमाखाली गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे पांढरकवडा पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, पांढरकवडा तालुक्यातील केळापूर येथील मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात प्रकाश आत्राम गेला होता. तेथे २८ आॅक्टोबर रोजी त्याचा नंदलाल टेकामसोबत वाद झाल्याचे सांगितले जाते. याच वादाचे पडसाद दुसºया दिवशी उमटले. गावात आल्यावर नंदलाल व त्याच्या दोन मुलांनी प्रकाशच्या घरी जाऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. प्रकाशच्या शरीरावरील जखमांबाबत रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘स्टॅबिंग इन्जुरी’ अर्थात भोसकल्याने झालेली जखम, असा उल्लेख आहे. सूत्रानुसार, प्रकाशवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर हे प्रकरण समेटाने मिटविण्याचे ठरले होते. मात्र ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ फिसकटल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
मृताच्या वडिलांनाही धमक्या
फिर्याद देण्यास विलंब का असा प्रश्न सदर प्रतिनिधीने मृत प्रकाशचे वडील आनंदराव आत्राम यांना पीएम स्पॉटवर विचारला असता आपल्याला आरोपी टेकाम पिता-पुत्रांकडून धमक्या मिळाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘तुलाही ठार मारू’ अशा धमक्या सतत मिळत राहिल्याने आपण पोलीस ठाण्यात जाण्यास घाबरलो. शिवाय आपण मुलाच्या उपचारातही एवढे दिवस व्यस्त होतो. ७ तारखेला त्याचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार आटोपून आपण ९ नोव्हेंबरला हल्लेखोरांची धमकी झुगारुन फिर्याद देण्यासाठी पांढरकवडा पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे आनंदराव आत्राम यांनी सांगितले.