कपाशीवर मर रोगाचे आक्रमण

By Admin | Published: August 3, 2015 02:21 AM2015-08-03T02:21:49+5:302015-08-03T02:21:49+5:30

सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता कपाशी पिकावर मर रोगाने आक्रमण केले आहे.

The invasion of cotton wool disease | कपाशीवर मर रोगाचे आक्रमण

कपाशीवर मर रोगाचे आक्रमण

googlenewsNext

शेतकरी धास्तावले : तीन तालुक्यातील पिके उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर
पांढरकवडा : सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता कपाशी पिकावर मर रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़
पावसाअभावी आधीच पिकांची वाढ खुंटली आहे. कशीबशी पिके तग धरून आहे. तोच आधी सोयाबिनवर आलेल्या उंटअळीने आणि आता कपाशीवरील मर रोगाने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे़ कृषी विभागाच्या कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाने (क्रॉपसॅप) केलेल्या सर्वेक्षणानुसार कापूस पिकावर मर व अर्धमर रोग असल्याचे आढळून आले आहे़ तालुक्यातील चनाखा, रूढा, घुबडी व मारेगाव तालुक्यातील सगणा, मैसदोडका व मार्डी तसेच वणी तालुक्यातील साखरा, वठोली, कोलगाव, जुगाद, कायर या परिसरात या रोगाचा प्रभाव अधिक आढळून आला असल्याचे किड नियंत्रक दिनेश चव्हाण यांनी सांगितले.
अर्धमर किंवा अचानक कपाशीची झाडे वाळणे, अशा दोन प्रकारचा हा रोग आहे़ पावसानंतर किंवा सिंचन झाल्यानंतर जेव्हा पावसाचा खंड पडतो, तेव्हा काही शेतात अर्धमर हा रोग दिसून येतो़ यामध्ये झाडे अचानक निस्तेज होऊन वाळतात व झाड मरते़ या रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रभावित झाडावर कोबाल्ट क्लोराईड १ गॅम प्रति १०० लीटर पाणी या प्रमाणात घेऊन १० पीपीएम तीव्रतेची फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. याशिवाय शेतकरी बांधव कॉपर आॅक्सीक्लोराईट २५ ग्रॅम व २०० ग्रॅम युरिया १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात किंवा कार्बन डेन्झीम १० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात घेऊनसुध्दा फवारणी करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या प्रकारचा मर हा जास्त तीव्रतेचे पर्जन्यमान झाल्याने होतो़ ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही, पाणी जमिनीतच साचते, अशा जमिनीत प्राणवायूचे प्रमाण कमी होते व बुरशीचे प्रमाण वाढते़ त्यामुळे कपाशीचे झाड चिमते व त्यानंतर ते मरते़ यासाठी वापसा येताच फवारणी करावी, असा सल्लाही सातपुते यांनी दिला़
शेतात चर खोदून शेतात साचलेले पाणी शेताबाहेर काढावे व रोगग्रस्त झाडाच्या मुळाभोवती कॉपर आक्सीक्लोराईड २५ ग्रॅम हे बुरशीनाशक १०० ग्रॅम युरियासोबत १० लीटर पाण्यात मिसळून प्रतिझाड १०० मि़ली़ टाकावे़ याशिवाय डायथेन एम-४५ (२० ग्रॅम) किंवा कार्बन डेंन्झीम १० गॅम १० लीटर पाण्यात २०० ग्रॅम युरियासोबत मिसळून फवारणी करावी, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The invasion of cotton wool disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.