माणुसकी अजूनही जिवंत आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:56 PM2018-03-19T22:56:22+5:302018-03-19T22:56:22+5:30

माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही.

Humanity is still alive ...! | माणुसकी अजूनही जिवंत आहे...!

माणुसकी अजूनही जिवंत आहे...!

Next
ठळक मुद्देप्रतिसाद फाउंडेशन : चिमुकल्या माहीसाठी धावले यवतमाळकर

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही. पण आपल्या यवतमाळ शहरातील विशेषत: युवकांनी माणुसकी अजूनही जिवंत ठेवली आहे. शनिवारी बसस्थानक चौकात घडलेल्या अपघातानंतर ही माणुसकी ‘प्रतिसाद फाऊंडेशन’च्या रूपाने प्रकर्षाने पुढे आली.
बसस्थानक चौकात दुचाकी-ट्रकचा अपघात झाला. दुचाकीवरील डॉ. वामन हेपट आणि त्यांची सून अंजली हेपट हे दोघेही दगावले. तर अडीच वर्षांची चिमुकली माही जखमी होऊन बचावली. जाणारे गेले. पण आता प्रश्न होता माहीचा. कारण तिचे जवळचे असे कुणी नातेवाईकच उरले नाही. दूरचे नातेवाईक गावात नव्हते. अशावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे युवक धावून आले.
त्यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले. तोवर कुणीतरी माहीला घरी पोहोचविले होते. फाउंडेशनचे कार्यकर्ते पुष्पकुंज सोसायटीतील माहीच्या घरी पोहोचले, तेव्हा ती एकटीच रडत बसली होती. आजूबाजूचे शेजारी तिथे जमले होते. कार्यकर्त्यांनी लगेच डॉ. कसारे यांना बोलावले. तिचे चेकअप् करून घेतले. नंतर बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर यांच्या रुग्णालयात तिला भरती केले. डॉ. जोशी यांनीही तपासणी केली. उपचारानंतर माही स्थिर झाली. मात्र, आईसाठी तिचा टाहो सुरूच होता. आता प्रश्न होता दोन मृतांच्या अंत्यसंस्काराचा. मृताचे नातेवाईक हजर नव्हते. कुणी पुण्यासारख्या दूरच्या अंतरावर होते. शेवटी प्रतिसाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीच अंतसंस्काराचीही जबाबदारी उचलली. त्याआधी नातेवाईकांना फोन करून परवानगीही घेतली.
नातेवाईक यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच युवकांनी कामे वाटून घेतली. ज्याला जमेल तेवढे आर्थिक योगदान दिले. उत्तरीय तपासणीपासून, हेपट यांच्या घरापुढे शामियाना लावण्यापासून ते पाण्याच्या कॅन तयार ठेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था करून ठेवली. दोन अंत्यसंस्कार असल्याने प्रत्येक साहित्य दोन-दोन आणले. नातेवाईक गोळा झाल्यावर त्यांच्या हस्ते अंत्यविधी आटोपला. दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कारानंतर पाण्याच्या कॅन, जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. अंत्ययात्रेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीची गैरसोय होऊ नये याची काळजी युवकांनी घेतली.
या संपूर्ण सत्कार्यासाठी प्रतिसाद फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, सचिव प्रलय टिप्रमवार, उपाध्यक्ष बिपीन चौधरी, विनोद नगराळे, योगेश धानोरकर, देवेंद्र कळसकर, अजय बोरेले, अनिल तांबेकर, गजू राऊत, उमेश बोबडे, विनोद दोंदल, सचिन कावरे, चंदन फेंडर, राजेश पोहनकर, राजू केराम, रवी माहुरकर, राजेश इसाळकर, सौरभ इंगोले, श्याम बजाज, हर्षल राठोड, अर्पित शेरेकर, राहुल फाळके आदींनी परिश्रम घेतले.

माहीच्या भविष्यासाठी आज बैठक
आई-बाबा, आजी-आजोबा, मामा असे सर्व नातेवाईक गमावलेली अडीच वर्षांची माही आता एकटी आहे. तिचे भवितव्य काय, हाच प्रश्न अनेक सहृदांना सतावतोय. त्यावरही प्रतिसाद फाउंडेशनने पाउल उचलले आहे. माहीच्या दूरच्या नातेवाईकांची त्यांनी मंगळवारी बैठक ठेवली आहे. माहीच्या भविष्याची जबाबदारी कोण उचलणार, याबाबत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती प्रतिसाद फाऊंडेशनचे सचिव प्रलय टिप्रमवार यांनी दिली.

Web Title: Humanity is still alive ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.