‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:09 PM2018-04-24T22:09:13+5:302018-04-24T22:09:13+5:30

गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला.

Front for water on 'Majipra' | ‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

‘मजीप्रा’वर पाण्यासाठी मोर्चा

Next
ठळक मुद्देवाहनाची हवा सोडली : तुकडोजीनगरात पाणी नाही, पालिकेवरही धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत महिनाभरापासून नळ न आल्याने तुकडोजीनगरातील संतप्त महिलांनी जीवन प्राधिकरणावर धडक दिली. मोर्चा धडकताच कार्यकारी अभियंत्यांनी काढता पाय घेतला. यामुळे प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडून महिलांनी निषेध नोंदविला. तर दुसरीकडे बांगरनगरातील महिलांनी नगरपरिषदेवर धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या कक्षात ठिय्या दिला.
शहरातील पाणी प्रश्नाने बिकट रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. पाण्याची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या या महिलांना कार्यकारी अभियंताच भेटले नाही. यामुळे मोर्चेकरी महिलांची तीव्र नाराजी झाली. त्यांनी प्राधिकरणाच्या कामकाजावर संताप नोंदविला.
तुकडोजीनगरामध्ये गत महिनाभरापासून नळ नाही. या भागात १० ते १२ दिवसानंतरच टँकर फिरकतो. यात अर्धा ड्रम पाणी मिळते. या पाण्यात कसे होणार, असा प्रश्न या भागातील महिलांनी उपस्थित करीत प्राधिकरणाचे पाणी देण्याची मागणी केली. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही नळ सोडले जात नााही. काही भागात चार ते पाच दिवसापासून नळ सुरू आहे. मात्र तुकडोजीनगराला पाणी मिळत नाही, अशी खंत या महिलांनी अभियंत्यापुढे व्यक्त केली. जीवन प्राधिकरणाचे नियोजन चुकले. प्रशासनाने कामकाजात दिरंगाई केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पाणी न मिळाल्यास बुधवारपासून उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला. यावेळी महिलांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून जीवन प्राधिकरणाच्या वाहनाची हवा सोडली. यावेळी छाया सपाट, अर्चना गिरोळकर, संगीता चातूरकर, संध्या भोयर, कांता अंबागरे, लिला राऊत, सुधा भोयर, मंदा तपके, आशा सोनकुसरे, छबू पखाले उपस्थित होत्या. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून उपाययोजना तोकड्या पडत असल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या संतापाला वाट मोकळी करण्यासाठी दररोज मोर्चे धडकत आहेत.
विशिष्ट घरांनाच पाणीपुरवठा
प्रत्येक वॉर्डात पाणीवाटपासाठी टँकर देण्यात आले आहे. मात्र नगरसेवक विशिष्ट घरांनाच पाण्याचे वाटप करतात, असा आरोप तुकडोजीनगरातील महिलांनी केला आहे. बांगरनगरामध्येही २५ दिवसांपासून नळ नाही. १० ते १५ दिवसानंतर या ठिकाणी टँकर फिरकतो. यामुळे महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे, असा आरोप बांगरनगरातील महिलांनी केला आहे. यावेळी सुनिता बोरकर, वंदना आगमे, रूपाली उपरकार, सोनाली मेश्राम, प्रज्ञा बिडवे, महानंदा इंगळे, मिरा खांदवे, शांता वांडरे, दीपमाला राठोड उपस्थित होत्या.

Web Title: Front for water on 'Majipra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.