मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:37 PM2018-08-09T21:37:48+5:302018-08-09T21:38:30+5:30

‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला.

Due to the Maratha reservation in the district | मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देठोक मोर्चा शांततेत : दुचाकी रॅलीत घोषणांनी वेधले लक्ष, बसस्थानक चौकात ठिय्या, शहिदांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. तर आंदोलनात शहीद झालेल्या युवकांना श्रद्धांजली अर्पण करून बसस्थानक चौकात मराठा बांधवांनी दिवसभर रास्तारोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती.
सकाळी शिवतीर्थावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्यांनी शहरात फिरून बंदची हाक दिली. त्यामुळे सर्व प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिली. त्यानंतर बसस्थानक चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या १७ जणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या ठिकाणी मराठा बांधवांनी दिवसभर ठिय्या देऊन समाजबांधवांनी राज्य शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. मराठे जागे झाले आहेत. यामुळे दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला.
बसस्थानक चौकातून मराठा बांधवांनी पायदळ मार्च काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. यावेळी मोर्चेकºयांनी मागण्या तत्काळ मुख्यमंत्र्यांकडे कळवाव्या, अन्यथा मराठा पेटून उठेल, असा इशारा दिला. सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची पूर्तता न झाल्यास मराठा समाज ‘चूल बंद’ करून रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला.
गुरुवारी दिवसभर शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. आॅटोरिक्षा चालक संघटनेने बंदमध्ये सहभाग घेतला. शहरातील सर्व दवाखाने बंद होते. एसटी महामंडळाच्या बसफेºयाही रद्द करण्यात आल्या होत्या. खासगी वाहने चक्काजाममुळे दिवसभर जागीच उभी होती. रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून देण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्येही शुकशुकाट होता.
मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुरेपूर दक्षता घेतली होती. बसस्थानक चौकात अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली. प्रत्येक चौकात पोलिसांची वाहने उभी ठेवण्यात आली होती. जागोजागी पोलीस, महिला पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मोर्चादरम्यान उपद्रव पसरविणाºयांना ताब्यात घेण्यात यावे, अशा सूचना मोर्चेकºयांच्या वतीने वारंवार दिल्या जात होत्या. यामुळे मोर्चा शांततेत पार पडला. तर खासगी वाहनचालकांना जागीच रोखून ठेवण्यात आले. यावेळी राजाभाऊ ठाकरे, बाबासाहेब गाडे पाटील, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, विजयाताई धोटे, माधुरी अराठे, नानाभाऊ गाडबैले, क्रांती धोटे, डॉ. दिलीप महाले, वर्षा निकम, राजेंद्र गायकवाड, प्रा. प्रवीण देशमुख, उषा दिवटे, कैलास राऊत, चंद्रशेखर चौधरी, वैशाली सवई, मनिषा काटे, अरुण राऊत, पप्पू पाटील भोयर, अमोल बोदडे आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तत्काळ आरक्षण लागू करावे, मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्र वसतिगृह उभारावे, मराठा ठोक मोर्चा काढणाºया समाजातील युवकांवर लादण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी दुरुस्ती करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची व्याप्ती वाढवावी, शिवस्मारक पूर्ण करावे, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या युवकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
उमरखेडच्या आंदोलकांनी रास्ता रोकोत अडकलेल्या नागरिकांना दिले भोजन
उमरखेड : सकल मराठा समाजाने गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यात अनेक रस्ते आंदोलकांनी अडविले होते. यामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता. मात्र जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव फाट्यावर वेगळेच दृष्य बघायला मिळाले.विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाºया मार्गावरील मार्लेगाव येथे आंदोलकांनी रस्ता रोखून धरला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागपूर-बोरी-तुळजापूर या मार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला. मात्र मार्लेगाव फाट्यावर आगळे-वेगळे दृष्य बघायला मिळाले. या फाट्यावर खोळंबलेल्या प्रवाशांना मराठा समाजाने जेवण दिले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर जेवणाची पंगत दिसून आली. रस्ता अडविण्यात आल्याने ट्रक, बस, खाजगी वाहनांमधील प्रवासी अडकून पडले होते. या प्रवाशांना मराठा समाजाकडून जेवण पुरविण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी केलेल्या व्यवस्थेमुळे अनेकांची जेवणाची चिंता दूर झाली.

Web Title: Due to the Maratha reservation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.