Deprived of tribal wandering facilities | आदिवासींची पंढरी जागजई सुविधांपासून वंचित
आदिवासींची पंढरी जागजई सुविधांपासून वंचित

ठळक मुद्देवैशाख पौर्णिमेला स्नान : विदर्भातील हजारो भाविकांची उपस्थिती राहणार, रस्त्याअभावी भाविकांचे हाल

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येत्या शनिवारी, १८ मे रोजी वैशाख पौर्णिमा स्नानााठी विदर्भातील हजारो भाविक आदिवासींची पंढरी आणि काशी असलेल्या तालुक्यातील जागजई येथे येणार आहे. मात्र हे क्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पेरसापेन, भिमालपेन, रान, मानको, तोडोबा, कल्यासूर आदी अनेक देवतांच्या स्नानाचा वैशाख पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे हजारो आदिवासी बांधव या ठिकाणीच्या पवित्र स्नानास येतात. विशेषत: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील ५० ते ६० हजार आदिवासी भाविक दरवर्षी हजेरी लावतात. त्यामुळे जागजई हे आदिवासींची पंढरी आणि काशी म्हणून ओळखी जाते. वर्धा आणि यशोदा नदीच्या संगमावर हे क्षेत्र वसले आहे. वैशाख पौर्णिमेला भल्या पहाटे भाविक या देवांच्या मूर्त्यांच्या मागे वाजत-गाजत सहभागी होऊन स्नान करतात. ठिकठिकाणचे आदिवासी बांधव आपापल्या गावातील देवांची पूजा-अर्चना आटोपून या ठिकाणच्या वर्धा नदीच्या पंचधारात स्नानाकरिता दाखल होत असतात.
सुंदर चवरने सजविलेले देव, गावागावातून मिरवणुकीने जागजई येथे येतात. आदिवासी बांधव त्यांचे खास पेहराव करून नृत्य करीत येथे पोहोचतात. याकरिता दोन-दोन दिवस आधीच ते आपपल्या गावातून निघतात. वैशाख स्नान म्हणजे आदिवासी देवदेवतांचे अडीच दिवसाचे माहेर मानले जाते. सोबत असलेल्या सर्व देवदेवतांना प्रथम भल्या पहाटे या संगमावर स्नान घातले जाते. जागजई तीर्थक्षेत्रास आदिवासींची ‘काशी’ असेही मानले जाते. पहाटे ४ ते सकाळी १० वाजतापर्यंत प्रथम भाविक तेथील श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, निगुणशी महाराज मंदिरात दर्शन घेऊन गंगास्नान करतात.
जागजई ते आजनसरा (भोजाजी महाराज समाधीस्थळ) या तीन किलोमीटर क्षेत्रात वर्धा नदीचे पाणी डोह स्वरुपात बाराही महिने असते. डोह ४०-५० फूट खोल आहे. तेथील नदी उत्तरवाहिनी आहे. पाणी कधीही आटत नाही. पात्रात ५० फूट क्षेत्रात सदैव पाणी असते. त्यामुळे तापत्या उन्हातही येथे वैशाख महिन्यात ही जत्रा भरते. मात्र ही तीर्थक्षेत्र अद्याप मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. त्यामुळे भाविकांमध्ये संताप आहे.
अंतरगाव-जागजई रस्ता अत्यंत दयनीय
जागजई येथे अंतरगाव येथून जावे लागते. मात्र हा सात किलोमीटरचा रस्त्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर केवळ खड्डे दिसतात. गावातून संगमापर्यंत पायऱ्या नाहीत. डोहानजिक पुरेशा सुविधा नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी दोन भाविकांचा डोहात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथे बचावात्मक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या क्षेत्राला तीर्थक्षेत्र अथवा पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता देण्याची मागणी आहे. त्यानुसार किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


Web Title: Deprived of tribal wandering facilities
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.