देश रक्षणासाठी गेला गरिबा घरचा ‘आग्रमन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:46 PM2019-05-02T21:46:33+5:302019-05-02T21:47:56+5:30

वडिलांची छत्रछाया कधीचीच हरविलेली. आईने रोजमजुरी करून देशभक्तीचे धडे दिले. हीच कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन सळसळत्या रक्ताचा आग्रमन रहाटे पोलीस दलात भरती झाला. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादाने धगधगणाऱ्या भूमित तो कर्तव्य बजावित होता.

The country's 'arriving' for the protection of the poor | देश रक्षणासाठी गेला गरिबा घरचा ‘आग्रमन’

देश रक्षणासाठी गेला गरिबा घरचा ‘आग्रमन’

Next
ठळक मुद्देआर्णी तालुक्यावर शोककळा : नक्षली हल्ल्यात जवान शहीद

आसीफ शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा (आर्णी) : वडिलांची छत्रछाया कधीचीच हरविलेली. आईने रोजमजुरी करून देशभक्तीचे धडे दिले. हीच कौटुंबीक पार्श्वभूमी घेऊन सळसळत्या रक्ताचा आग्रमन रहाटे पोलीस दलात भरती झाला. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादाने धगधगणाऱ्या भूमित तो कर्तव्य बजावित होता. मात्र नक्षलवाद्यांविरुद्ध अभियानात काम करताना बुधवारी त्याला वीरमरण आले. गावातला धाडसी तरुण देश रक्षणात शहीद झाल्याचे कळताच तरोडा गावात मात्र शोककळा पसरली.
गडचिरोली जिल्ह्यातील बुधवारच्या नक्षलवादी हल्ल्याने अवघा देश हादरला. १५ जवान या हल्ल्यात शहीद झाले. शहिदांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तरोड्याच्या (ता. आर्णी) आग्रमन बक्षी रहाटे या जवानाचाही समावेश आहे. प्रचंड मेहनती आणि सदैव हसतमुख ही आग्रमनची गावातील ओळख होती. असा मनमिळावू जवान गेल्याने तरोडाच नव्हे तर संपूर्ण आर्णी तालुका शोकसागरात बुडाला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात २२ आॅक्टोबर १९८४ मध्ये आग्रमन जन्माला आला. वडील बक्षी यापूर्वीच मृत्यू पावले. तर आई निर्मलाबाई यांनी स्वत:च्या तीन एकर कोरडवाहू शेतीत मेहनत घेऊन आग्रमन व आशिष या दोन मुलांसह सुकेशना व रिना या दोन मुलींनाही शिकवून मोठे केले. घरची परिस्थिती आणि उपजत मेहनतीची प्रवृत्ती यामुळे आग्रमन १ फेब्रुवारी २०११ रोजी थेट गडचिरोली जिल्हा पोलीस दलात रुजू झाला. त्याची कार्यतत्परता बघून नक्षलविरोधी कारवायांसाठी जलद कृती पथकात त्याचा समावेश झाला. मात्र महाराष्टÑ दिन हेरुन नक्षलवाद्यांनी हल्ला केला. १५ जवानांसोबत तरोडा येथील आग्रमनही शहीद झाला.
अंत्यदर्शनासाठी तरोडा येथे पंचक्रोशी उलटली
गुरुवारी मूळ गावात शहीद आग्रमनच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार हे कळताच आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिकांनी तरोड्याकडे धाव घेतली. आग्रमनचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. तर बेलोराच्या जिल्हा परिषद शाळेत त्याने माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर रुई येथील वसंतराव नाईक विद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. एकीकडे आग्रमनचा भाऊ आशिष गावचा पोलीस पाटील झाला. तर आग्रमनने पोलीस दलात प्रवेश केला. डोंगरगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील रेश्मासोबत आग्रमनचा विवाह झाला. संसारवेलीवर गार्गी आणि आरुषी या दोन कळ्याही उमलल्या. मुलींच्या भविष्यासाठी आग्रमनची धडपड सुरू असतानाच नक्षल्यांनी घात केला.
चिमुकल्या मुलींचा टाहो, वृद्ध आई दवाखान्यात भर्ती
नक्षलवादी हल्ल्यात आग्रमन शहीद झाल्याची वार्ता तरोडा गावात धडकताच अख्खा गाव सुन्न झाला. आग्रमनची पत्नी रेश्मा, चार वर्षाची मुलगी गार्गी आणि दोन वर्षाची आरुषी धाय मोकलून रडू लागल्या. हा धक्का रहाटे कुटुंबीयांसाठी प्रचंड मोठा होता. त्यामुळे आग्रमनची वृद्ध आई निर्मलाबाई अस्वस्थ झाल्याने त्यांना आर्णी येथे दवाखान्यात भर्ती करण्यात आले.

Web Title: The country's 'arriving' for the protection of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.