'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 01:25 PM2018-11-05T13:25:35+5:302018-11-05T17:33:26+5:30

आईच्या शोधात दोन बछडे जंगलात फिरताहेत. ते एकदा दिसलेही होते, पण पुन्हा हरवले.

Campaign to find T-1 cubs; Fear of Tiger Attack | 'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू

'अवनी'च्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात?; शोध सुरू

Next
ठळक मुद्देवाघीण जिथे ठार झाली तिथे बछडे येण्याची शक्यता

- नरेश मानकर 

यवतमाळ: टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर आता अनाथ झालेल्या तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने युद्धस्तरावर शोधमोहिम सुरू केली आहे. दरम्यान रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले होते.
बोराटीच्या जंगलात शुक्रवारी टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर वनविभागाचे पथक तिच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यासाठी सराटी, बोराटी, वरूड, भुलगड आदी भागातील जंगल परिसर पिंजून काढत आहे. रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास या पथकाला वरूड डॅम परिसरात दोन्हीही बछडे आढळून आले. परंतु झुडूपात लपून असलेले हे बछडे क्षणातच दुसरीकडे निघून गेले.
टी-१ वाघिणीचे बछडे आपल्या आईच्या शोधार्थ इतरही ठिकाणी भटकू शकतात. त्यामुळे वनविभागाच्या शोध पथकाने बोराटी जंगलात ज्या नाल्याजवळ टी-१ वाघिणीला मारले, त्या परिसरात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. टी-१ वाघिणीसोबत राहणारा नर वाघसुद्धा याच परिसरात असल्यामुळे हा वाघ या ११ महिन्याच्या बछड्यावर केव्हाही हल्ला करू शकतो. त्यामुळे या बछड्यांना तातडीने बेशुद्ध करून जेरबंद करणे आवश्यक आहे. या बछड्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता वनविभागासमोर आहे.
टी-१ वाघिणीला तब्बल दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ठार करण्यात आले. त्यामुळे वनविभागाने व वाघग्रस्त परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या परिसरात नर वाघाचे व दोन बछड्यांचे वास्तव्य कायम असल्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती अद्यापही कायम आहे. हा नर वाघसुद्धा आपल्यावर हल्ला करू शकतो, अशीही भीती आहे.

बछड्यांच्या जीवित्वाची जबाबदारी कुणाची?
१३ जणांचे बळी घेणाऱ्या टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या बछड्याची जबाबदारी कोणावर, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे. या बछड्यांनाही बेशुद्ध करून जेरबंद न करता गोळ्या घालून ठार करणार काय? वाघिणीला ठार मारल्यानंतर इतर जंगली प्राण्यांचे परिसरातील ग्रामस्थांवर होणारे हल्ले थांबतील काय? असे प्रश्नसुद्धा वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केले आहे.

Web Title: Campaign to find T-1 cubs; Fear of Tiger Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.