दुष्काळाने बैलबाजार पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 09:33 PM2019-01-06T21:33:32+5:302019-01-06T21:37:05+5:30

दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

Bullocks fell in the drought | दुष्काळाने बैलबाजार पडला

दुष्काळाने बैलबाजार पडला

Next
ठळक मुद्देभाव अर्ध्यावर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी आले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शेतकऱ्यांऐवजी थेट मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारीच यवतमाळात येऊन चक्क अर्ध्या किमतीत बैलजोड्या विकत घेत आहेत.
खरीप हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांच्या हाती पैसे आले नाही. शेतकऱ्यांनी उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावला. यातून सुटका व्हावी म्हणून शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीला आली आहे. त्या तुलनेत खरेदी करणारे मात्र बाजारात नाही. यामुळे बैलबाजार कोसळला आहे.
बैलांची खरेदी करणारे व्यापारी आणि दलालच बाजारात दिसत आहे. ही मंडळी बैलाची अत्यल्प दरात मागणी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व्यापारी जिल्ह्यात येऊन बैलांची खरेदी करताना दिसत आहे. अडत्यामार्फत खरेदी केली जात आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. ५० ते ६० हजार रूपयापर्यंत असलेली बैलजोडी ३० ते ३५ हजारापर्यंत मागितली जात आहे. यामुळे शेतकरी या बाजारातून दुसऱ्या बाजारात आणि तेथून आणखी तिसऱ्या बाजारात बैल घेऊन पायपीट करीत आहे. मात्र कुठेही भाव मिळत नाही.

२०० पैकी १७० बैलजोड्या परत
बैलबाजारात भाव नसल्याने शेतकरी बैल न विकता परत नेणेच पंसत करीत आहे. दुसऱ्या बाजाराकडे मोर्चा वळवत आहे. रविवारी यवतमाळच्या बैलबाजारात २०० जोड्यांपैकी केवळ ३० जोड्यांचीच विक्री झाली. त्याचा सर्वाधिक दर ३५ हजार रूपये राहिला. अपेक्षेपेक्षा हे दर निम्मे होते. शेतकऱ्यांना बैलजोडी ने-आण करण्याचाच मोठा खर्च करावा लागला.

शेतकरी म्हणतात, पर्यायच नाही
उधारी, उसनवारी, सावकाराचे पैसे या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैलजोडी विक्रीचा निर्णय घेतला. पण आता पुढच्या वर्षी पाहू. यंदा भावच नाही.
- अशोक मेश्राम, वाढोणा बाजार
बैलजोडीला एक लाख रूपयाचा भाव ठेवला. बाजारात इतकी सुपर जोडी शोधून सापडत नाही. पण ५० हजारांच्या आताच मागत आहे. मी बैलजोडी न विकताच परत जाणार आहे. अडचणीत व्यापारी पाडून भाव मागत आहेत. - महादेव सोळंके, कळंब
बैलजोडीला भाव नसले तरी दुधाळ जनावरांच्या किमती चांगल्या आहे. त्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. दुष्काळी स्थितीने बाजारात चढउतार होत आहे. मात्र पर्याय नसल्याने जनावरे विकावीच लागत आहे. - दत्ता पजगाडे, चाणी

Web Title: Bullocks fell in the drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार