सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

By Admin | Published: May 23, 2015 12:17 AM2015-05-23T00:17:35+5:302015-05-23T00:17:35+5:30

वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत.

Bank and society burden on seven bars | सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

सातबारांवर बँक व सोसायटीचा बोझा

googlenewsNext

दरवर्षी कर्जाची उचल : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाकडे दुर्लक्ष
नांदेपेरा : वणी तालुक्यातील १०० टक्के शेतकरी कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच शतकऱ्यांचे सातबारे ‘बोझायुक्त’ आहेत.
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. शासन स्तरावरून शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून नवनवीन पॅकेज स्वरूपात अनेक योजनांना मंजुरी देण्यात येत आहे. मात्र आत्महत्येचे सत्र संपता संपत नाही. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वणी तालुक्यात असा एकही शेतकरी नाही की, त्या शेतकऱ्याने पीक कर्जाची उचल केली नाही. मात्र पीक कर्ज मंजूर करण्याकरिता त्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे.
शेतकऱ्यांना सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आदींमुळे कर्ज काढल्याशिवाय तरणोपाय नसतो. कर्ज काढूनच त्यांना शेती कसावी लागते. मात्र सबंधित बँक कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना आधी सातबारावर बोझा चढवून आणा, तेव्हाच पीक कर्ज मंजूर करू, अशी भूमिका घेत आहे.
एकीकडे नापिकी, दुष्काळ या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सातबारावर पीक कर्ज चढविण्याकरिता कधी तलाठ्याकडे, कधी सेतूकडे, तर कधी बँकेकडे सतत चकरा माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या नावे एक लाखापर्यंत कर्ज असेल, तर सातबारावर कर्जाचा बोझा चढवू नये, असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश आहेत. असे असतानाही राष्ट्रीयकृत बँकांनी एक लाख रूपयांच्या आत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सातबारावर ‘बोझा’ चढवून आणण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सातबारा आता रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार कर्जमुक्त कधी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)

सातबारा कर्जमुक्त होण्याची अपेक्षा
शेतकऱ्यांचा सातबारा सदैव कर्जयुक्त असतो. त्यावर विविध बँकांच्या कर्जाचा बोझा चढविलेला असतो. वर्षानुवर्षे सातबारावर कर्जाचा बोझा असल्याने शेतकरी सदैव कर्जात वावरतो. त्याला कर्जफेडीची सतत चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कधी कर्जमुक्त होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे एक लाखापर्यंतचे कर्ज सातबारावर बोझा म्हणून चढवू नये, असे निर्देश असतानाही बोझा चढविण्यात येत आहे. परिणामी जवळपास सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा आता कर्जाच्या बोझाखाली दबून आहे. तो कधी कर्जमुक्त होणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Web Title: Bank and society burden on seven bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.