बाभूळगाव नगरपंचायत काँग्रेसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:34 PM2018-05-25T22:34:51+5:302018-05-25T22:34:51+5:30

येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी विरोधी भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा नऊविरूद्ध आठ मतांनी पराभव करून सत्ता परिवर्तन घडवून आणले.

Babulgaon Nagar Panchayat Congress | बाभूळगाव नगरपंचायत काँग्रेसकडे

बाभूळगाव नगरपंचायत काँग्रेसकडे

Next
ठळक मुद्देअध्यक्षपदी प्रवीण गौरकार : उपाध्यक्षपदी चंद्रशेखर परचाके यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याने नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी विरोधी भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा नऊविरूद्ध आठ मतांनी पराभव करून सत्ता परिवर्तन घडवून आणले.
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे प्रवीण रामचंद्र गौरकार, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच चंद्रशेखर सूर्यभान परचाके विजयी झाले. काँग्रेसचे सात, शिवसेनेचा एक व एक अपक्ष नगरसेवक निवडणूक घोषित होताच देवदर्शनाला निघून गेले होते. हे सर्व नगरसेवक शुक्रवारी मतदानाच्या वेळी सभागृहात धडकले. अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे प्रवीण गौरकार, तर भाजप आघाडीतर्फे मिलींद नवाडे यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे चंद्रशेखर परचाके व भाजपा आघाडीतर्फे अनिल विठ्ठलराव खोडे रिंगणात होते. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी नऊ विरूद्ध आठ मतांनी विजय प्राप्त केला.
निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे, सहायक अश्विनी पाटील माने यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करताच समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. नंतर गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भैय्यासाहेब देशमुख, प्रकाशचंद छाजेड, डॉ. रमेश महानूर, गजानन नाईकवाड, प्रकाश नागतोडे, मोहन भोयर, कृष्णा ढाले, नन्ना महाजन, नईमखॉ मनवरखॉ, अतुल राऊत, अमोल कापसे, पांडुरंग लांडगे, शेख अब्बास, राजू गौरकार, नंदू लांडे, उत्तम पाटील, अमेय घोडे, शब्बीर खॉ, बाबू पांडे, हमीद खॉ पठाण, शेख कदीर, अन्वर खॉ, करामत अली आदी सहभागी होते.
‘सांभा’च्या अपयशाची चर्चा
या निवडणुकीत भाजपा आघाडीतर्फे ‘सांभा’वर महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र सांभाला एका नगरसेविकेला सांभाळण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेसने नगरपंचायत आपल्या ताब्यात घेतली. काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रशेखर परचाके यांच्यासह श्रीकांत कापसे, शेख कादर, शुभांगी गव्हाड, मदिना परवीन पठाण, पार्वतीबाई साबू, मीना गुणवंत वरकडे, गुलबानू शेख यांनी एकत्रितपणे सत्ता परिवर्तन घडवून भाजपा आघाडीला दणका दिला.
राळेगाव नगराध्यक्षपदी भाजपाच्या बंडखोर मालाताई खसाळे
राळेगाव : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाची चांगलीच फरपट झाली. ऐनवेळी भाजपाला आपल्या बंडखोर उमेदवारापुढे नांगी टाकावी लागल्याने भाजपाच्या बंडखोर मालाताई खसाळे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
येथील नगराध्यक्षपदासाठी भाजपातर्फे छायाताई पद्मनाथ पिंपरे, तर काँग्रेसतर्फे वैशाली तानबाजी पेंद्राम यांनी अर्ज दाखल केले होते. त्याचवेळी भाजपाच्या बंडखोर मालाताई खसाळे यांनीही अर्ज दाखल केला. त्यांच्यासह भाजपाच्या तीन नगरसेविका व काँग्रेस, शिवसेना आणि एका अपक्षाने आघाडी केली होती. परिणामी भाजपाकडे दहा नगरसेवक व एक सहयोगी सदस्य उरला होता. ११ सदस्य संख्या असूनही भाजपाचा उमेदवार धोक्यात सापडला होता. मात्र ऐनवेळी भाजपाने छायाताई पिंपरे यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसच्या वैशाली पेंद्राम यांनीही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अखेर भाजपाच्या बंडखोर मालाताई प्रफुल खसाळे यांची अविरोध निवड झाली.
उपाध्यक्षपदासाठी भाजपातर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण, भालचंद्र कविश्वर आणि सुषमा शेलोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अ‍ॅड. चव्हाण यांचा अर्ज छाननीत बाद झाला, तर कविश्वर यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे उपाध्यक्षपदी सुषमा प्रवीण शेलोटे यांचीही अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले, मुख्याधिकारी डॉ.विकास खंडारे यांनी घोषित केले.
भाजपाचे अपयश उघड
ही निवडणूक आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र बंडखोर उमेदवाराला अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यात भाजपाला अपयश आले.

Web Title: Babulgaon Nagar Panchayat Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.