Next

तिलारी धरण धोक्याच्या पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 09:05 PM2019-08-07T21:05:25+5:302019-08-07T21:06:10+5:30

परिसरात रेड अलर्ट : दोन गावांतील लोकांना सुरक्षित स्थळी नेले, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद

सचिन खुटवळकर/दोडामार्ग : महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने धोक्याची पातळी गाठली असून परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आल्यामुळे अनेक गावांत पूर आला असून घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे वायंगणतड व मणेरी येथील एका वाडीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. एकूण दहा गावांना पुराचा धोका असल्यामुळे खबरदारीच्या सूचना दोडामार्गच्या तहसीलदारांनी दिल्या आहेत.तिलारी धरणाची धोक्याची पातळी ४३.६0 मीटर आहे. सध्या ही पातळी ४३.३0 मीटर झाल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून डाव्या कालव्याद्वारे धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणाचा चौथा दरवाजा उघडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला व नदीपात्रातील संरक्षक भिंत ओलांडून पाणी घोटगेवाडी गावातील सखल भागात घुसले. घोटगे पंचायतक्षेत्रातील वायंगणतड येथील घरांत नदीचे पाणी शिरले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील लोकांना सुरक्षित स्थळी शिरंगे येथे हलविण्यात आले. दोडामार्ग तहसीलदारांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, तिलारी नदीकाठावरील कोनाळकट्टा, घोटगेवाडी, परमे, घोटगे, खानयाळे, आवाडे, साटेली-भेडशी, मणेरी, कुडासे, कुडासे खुर्द या गावांना पुराचा धोका आहे.मणेरी पुलावर पाणी; बांदा, सावंतवाडीशी संपर्क तुटलामणेरी येथील तिलारी नदीच्या पात्रातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे दोडामार्गवासीयांचा बांदा, सावंतवाडीशी संपर्क तुटला. भेडशीहून तिलारीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आवाडे येथे दोन ठिकाणी तसेच भेडशी येथील पुलावर पाणी आल्यामुळे या परिसराचा संपर्क तुटला आहे.चार गावे ‘नॉट रिचेबल’तिलारी नदीला आलेल्या पुराचे पाणी दोन पुलांवरून वाहत असल्यामुळे केर, मोर्ले, घोटगेवाडी, भेकुर्ली या गावांतून होणारी रहदारी गेले चार दिवस पूर्णपणे ठप्प झाली आहे. या गावांतील वीज पुरवठा सलग पाच दिवस खंडित असल्यामुळे तसेच मोबाईलचे टॉवर निष्क्रीय झाल्यामुळे या गावांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होउ शकलेला नाही. केर येथून भेकुर्ली व निडलवाडीमार्गे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यांवर दरडी कोसळल्यामुळे या सर्व गावांतून अन्यत्र जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. या गावांत पणजीहून नियमित तीन कदंब बसेस जातात. मात्र पुरामुळे वाहतूक बंद आहे.प्रशासनाच्या इशाऱ्याकडे काणाडोळारात्रीच्या वेळी धरणक्षेत्रात आणखी पाउस पडल्यास आधीच धोक्याची पातळी गाठलेल्या धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदारांनी दहा गावांतील लोकांना अन्यत्र स्थलांतरित होण्याचा लेखी आदेशवजा इशारा दिला. मात्र यापूर्वी अशी स्थिती एकदाही न उद्भवल्याने नागरिक घरे सोडण्यास तयार नाहीत.गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंदतिलारी धरणाच्या कालव्यातून गोवा राज्याला पाणी पुरविले जाते. मात्र या कालव्यात दरड कोसळल्यामुळे पुरवठा ठप्प केला आहे. शिवाय पावसामुळे कालवा फुटण्याचा धोका असल्यामुळे पाणी कालव्यात न सोडता तिलारी नदीला जोडणाऱ्या मोठ्या कालव्यातून सोडण्यात येत आहे.