गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले ‘पाणीदार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 11:03 AM2021-05-31T11:03:13+5:302021-05-31T11:03:48+5:30

Water Conservation News : पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.

Through the unity of the villagers, Tapovan village became 'watery'! | गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले ‘पाणीदार’!

गावकऱ्यांच्या एकजुटीतून तपोवन गाव बनले ‘पाणीदार’!

Next

- साहेबराव राठोड
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार : वॉटरकप स्पर्धेने पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये एकजूट निर्माण केली. शासनावर अवलंबून राहण्याचा प्रघात मोडायला शिकवले आणि स्वकष्टाने आपल्या गावाला पाणीदार बनविण्याचा अनुभवही दिला. याच बळावर शेलूबाजार येथून जवळच असलेल्या तपोवन ग्रामवासीयांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देता एकजुटीने पानी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी समस्येवर मात करीत गाव पाणीदार बनविले आहे.
तपोवन हे केवळ १ हजार ६५ लोकवस्तीचे गाव. मात्र येथे ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची असायची. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शरदराव भानुदास येवले यांची जनतेतून सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर गावातील अंतर्गत राजकारणाला फाटा देत गावाचा विकास करण्याचा निश्चय केला. २०१८-१९ मध्ये पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला.  ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रमदानातून एकजूट दाखविल्याचा प्रत्यय दिला. मागील वर्षी श्रमदानातून ३ शेततळे निर्माण केले. त्यामुळे गावातील गुराढोरांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली, सोबतच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. गावाला पाणीपुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतचे बोअरवेलमध्ये आता दिवसभर पाणी पुरेल इतका जलसाठा वाढला. पानी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या श्रमदानास ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह जाणवला. भारतीय जैन संघटनेकडून पोकलँड मिळाला. 
यासाठी जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत पोफळकर, शेलूबाजार ग्रा पं उपसरपंच रजनीश कर्नावट तसेच डॉ रिखबचंद कोठारी, मदनभाई येवले यांच्या सहकार्याने गेल्यावर्षी २ व यावर्षी ४ असे ६ किलोमीटर नाला खोलीकरण करण्यात आले. 
ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या पुढाकाराने तपोवन गाव जलसमृद्ध बनले आहे. पानी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, तालुका समन्वयक सुभाष गवई, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, पानी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. गाव पाणीदार बनविण्यासाठी गावकरी, शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. गेल्या दोन वर्षांत गावातील पाणी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्ह्यातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व गावातील युवकांचे मोठे सहकार्य लाभले, असे सरपंच शरदराव भानुदास येवले यांनी सांगितले. 


कृषी विभागातर्फे जलसंधारणाची कामे
गेल्यावर्षी २५० हेक्टर बांध बंदिस्त डिप सीसीटीची ५६ हेक्टर कामे केली. यंदाही कृषी विभागाकडून गॅबियन बंधारे निर्माण केले. एकाचे काम पूर्ण झाले तर २ प्रगतीपथावर आहे. २५ एलबीएस मंजुर आहेत. १ माती नाला बांध, ५ गावातील युवकांना कृषी विभागाच्यावतीने मधुमक्षिका पालनचे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणावरुन चंद्रकांत येवले यांनी आपल्या शेतात तो प्रयोग यशस्वी केला आहे. कृषी सहाय्यक वर्षा भारती यांनी तपोवन गावाला आवश्यक त्या विविध कामाचे नियोजन केले आहे.


सामाजीक वनिकरण विभागाचेही सहकार्य
पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी तपोवन ग्रामवासीयांना सामजीक वनिकरण विभागाचेही पाठबळ मिळाले. पावसाळ्यापूवीर्चे ई क्लास जमीनीवर २० हेक्टर मध्ये २२ हजार २२० खड्डे १० बाय १० आकारात केले आहेत. यावर्षी नियोजनानुसार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पाणी क्षेत्रात पाणी अडविण्यासाठी समतल चर खोदण्यात आले. वृक्षलागवड क्षेत्रामध्ये गुरांपासून संरक्षण मिळावे म्हणून चर खोदले आहे. सदर कामे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर चौधरी यांच्या देखरेखखाली केली.

Web Title: Through the unity of the villagers, Tapovan village became 'watery'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.