आंध्रच्या सीमेवर गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:40 AM2017-11-20T02:40:11+5:302017-11-20T02:42:44+5:30

स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन  गर्भलिंग निदान चाचणी करत आहे.

fitus test on the Andhra border! | आंध्रच्या सीमेवर गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा!

आंध्रच्या सीमेवर गर्भलिंग तपासणीचा गोरखधंदा!

googlenewsNext
ठळक मुद्देवाशिम, मालेगाव तालुक्यात दलालांचे मोठे ‘रॅकेट’ सक्रिय

सुनील काकडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्त्री भ्रूणहत्येला आळा बसावा, या उद्देशाने गर्भलिंग निदानावर बंदी कायदा लागू करण्यात आला; मात्र आजही छुप्या पद्धतीने आंध्र प्रदेशात गर्भपात केला जात असून, जिल्ह्यात मोठे रॅकेट सक्रिय आहे. मोठी रक्कम घेऊन हे रॅकेट इच्छुकांना आंध्र प्रदेशात नेऊन  गर्भलिंग निदान चाचणी करत आहे. प्रशासनानेही यासंदर्भात  दुजोरा दिला आहे. तथापि, ठोस पुरावे मिळत नसल्याने प्रशासनाचीही अडचण झाली आहे.
मुलगाच हवा, या अट्टहासापोटी मोठय़ा प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या केली जाते. यावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कायदा केला, तरीही काही ठिकाणी गर्भनिदान चाचणी केली जात आहे. आंध्र प्रदेशात चालणार्‍या एका गर्भनिदान केंद्रावर जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर इच्छुक जात असल्याची माहिती आहे. यासाठी  दलालांचे  एक रॅकेट सक्रिय असून, ते इच्छुकांना तेथे पोहचवते. गर्भवती महिलांना एका वाहनात बसवून त्यावर लग्नसोहळ्य़ाचे बॅनर  लावले जाते. त्यामुळे कुणाला शंका येत नाही. हे वाहन ठरावीक ठिकाणी पोहचण्याच्या काही अंतरावर पुरुषांना विशिष्ट ठिकाणी थांबवून फक्त गर्भवतींनाच केंद्रावर नेऊन चाचणी केली जाते. संबंधिताच्या इच्छेनुसार गर्भपात केला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी २0 हजारावर रक्कम इच्छुकाकडून हे रॅकेट उकळते आणि कुठेही वाच्यता न करण्याचा दम देते.  जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांसमोर या रॅकेटचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आहे. 

अपेक्षित यश मिळाले नाही!
 ‘पीसीपीएनडीटी’ अर्थात गर्भलिंग तपासणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. काही मंडळी आंध्र प्रदेशच्या सीमेवर छुप्या मार्गाने चालणार्‍या गर्भलिंग तपासणी केंद्रात जात असल्याची माहिती प्रशासनालाही आहे. त्यावरून यापूर्वी तीन ते चार वेळा सापळा रचून या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न झाला. ‘पीसीपीएनडीटी’च्या सभांमध्येही या विषयावर अनेक वेळा चर्चा झाली; मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

तक्रार दाखल होणे महत्त्वाचे!
  गर्भवती महिलांना अवैधरीत्या गर्भलिंग तपासणीसाठी आंध्र प्रदेशमधील केंद्रावर नेले जात असल्याची चर्चा अनेकदा कानावर आली आहे. त्यानुषंगाने कारवाई करण्याचादेखील प्रयत्न झाला; मात्र जोपर्यंत नागरिकांकडून ठोस स्वरूपात आणि पुराव्यानिशी याप्रकरणी तक्रारी दाखल होत नाहीत, तोपर्यंत यातून फारसे काही निष्पन्न होणार नाही.
- जनार्दन जांभरूणकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, 
जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम
-
 

Web Title: fitus test on the Andhra border!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.