ठळक मुद्देजिल्हा सामान्य रुग्णालय दर बुधवारी होताहेत शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी २५ आणि ८ नोव्हेंबर रोजी ३१ अशा एकूण ५६ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या जातात. गोरगरीब रूग्णांना या शस्त्रक्रिया प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने जनजागृती करून संबंधित रूग्णांनी सरकारी रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी केले. संबंधित रूग्णांच्या योग्य त्या तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते. वाशिम जिल्ह्यातील गोरगरीब रूग्णांसाठी आता विशेष व्यवस्था केली जात आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सदरील शस्त्रक्रिया सामान्य रुग्णालयातील डॉ. अविनाश झरे, डॉ. शेख व डॉ. राऊत यांनी केल्या. शस्त्रक्रियेस भूलतज्ञ व फिजिशयन म्हणून डॉ. अनिल कावरखे व डॉ. बंग यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी रुग्णालयातर्फे योग्य ती जनजागृती आणि विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालयात होणाºया टाक्याच्या महिला शस्त्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अरुण राऊत यांनी केले आहे.