अकोला हायवे नजीक बियर शॉपी व देशीविदेशी दारु दुकानास नागरीकांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:54 PM2017-11-18T13:54:40+5:302017-11-18T13:59:06+5:30

वाशीम - अकोला हायवे नजीक असलेल्या वाटाणे वाडी येथे सुरु होत असलेल्या बियर शॉपी व देशी विदेशी दारु दुकानाला परिसरातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर दुकान या भागात सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

Citizens' intense opposition to the beer shops near Akola Highway | अकोला हायवे नजीक बियर शॉपी व देशीविदेशी दारु दुकानास नागरीकांचा तीव्र विरोध

अकोला हायवे नजीक बियर शॉपी व देशीविदेशी दारु दुकानास नागरीकांचा तीव्र विरोध

Next
ठळक मुद्देनागरीकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन तीव्र आंदोलनाचा इशारा

वाशीम - अकोला हायवे नजीक असलेल्या वाटाणे वाडी येथे सुरु होत असलेल्या बियर शॉपी व देशी विदेशी दारु दुकानाला परिसरातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शविला असून सदर दुकान या भागात सुरु करण्यास परवानगी देण्यात येवू नये यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. नागरीकांच्या भावनांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

    दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये मोडत असलेल्या वाटाणेवाडी या नागरीकांची वस्ती असलेल्या भागात बियर शॉपी व देशी व विदेशी दारु दुकाने सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. याकरीता राजकुमार चंद्रपाल नागदेव यांच्या प्लॉट क्र. ३५ , सर्वे नं. ३७८, भुभाग क्र. ५७ मध्ये बियर शॉपी व देशी-विदेशी दारु दुकान सुुरु करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये असलेल्या या परिसरात सर्व जातीधर्माचे गोरगरीब नागरीक अनेक वर्षापासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या भागातील कोणत्याही व्यक्तीला व्यसन नाही. तसेच परिसरात जवळच शाळा, दवाखाने, हॉस्पीटल, तीन मंदिरे, कॉलेज आहेत. सदर बियर शॉपी व दारुचे दुकान या भागात सुरु झाल्यास परिसरातील नागरीक या व्यसनाला बळी पडू शकतात. तसेच लहान बालकांवरही याचा मोठा वाईट परिणाम होवू शकते.
    परिसरातच शाळा, महाविद्यालये असल्यामुळे दारुचे दुकान सुरु झाल्यास दारुड्या व्यक्तींकडून येणार्‍या जाणार्‍या मुलींची छेड काढण्याचा किंवा विनयभंग करण्याचा प्रकार घडु शकतो. असे झाल्यास येथे एखादा मोठा जातीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील हनुमान मंदिर, गजानन महाराज मंदिर, स्वामी समर्थ महाराज आदी देवतांची तीन मोठी मंदिरे असून त्या अनुषंगाने भाविक भक्त व महिलांची रस्त्यावर मोठी वर्दळ असते. या महिलांना दारुड्या व्यक्तींकडून छेडखानीचा प्रकार घडु शकतो. तसेच दारु दुकान सुरु झाल्यास इतर ठिकाणच्या असामाजीक तत्वांकडून या भागात येवून दारुच्या नशेत वादावादी किंवा चोरी करण्याचे प्रकार घडु शकतात.
    सन्माननिय सर्वोच्च न्यायालयाने जनहितार्थ दिलेल्या निर्णयानुसार दारुदुकानच्या नियम व अटींचे याठिकाणी उघडपणे उल्लंघन करुन परवाना काढण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच नगर परिषदेकडूनही दारु दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे प्रयत्न होत आहेत. या दारु दुकानाला परिसरातील नागरीकांचा तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत नागरीकांच्या तीव्र विरोधाचा विचार करुन व लोकहिताचा विचार करुन या ठिकाणी बियर शॉपी व देशी-विदेशी दारु दुकान सुरु करण्याला परवानगी देण्यात येवू नये. निवेदनावर ठोस कारवाई न झाल्यास येथील नागरीक व महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर निसर्ग युवा मित्रमंडळासह दौलतराव वाटाणे पाटील नगर, स्वामी समर्थनगर, दत्तनगर, भडकेवाडी व प्रभाग एक मधील सर्व नागरीक व महिलांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, दारुबंदी अधिकारी,  न.प. अध्यक्ष, मुख्याधिकारी व ठाणेदारांना देण्यात आल्या.

Web Title: Citizens' intense opposition to the beer shops near Akola Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.