आमचे गुरुजी सायकलवाले; विद्यार्थी व पालकांमध्ये कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:02 PM2019-07-20T23:02:28+5:302019-07-20T23:02:57+5:30

साधेपणा व पर्यावरणविषयक गुरुजींचा संदेश

Our Gurujee's chicks; | आमचे गुरुजी सायकलवाले; विद्यार्थी व पालकांमध्ये कुतूहल

आमचे गुरुजी सायकलवाले; विद्यार्थी व पालकांमध्ये कुतूहल

Next

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : आमचे सायकलवाले गुरुजी, ते सायकलनेच शाळेत येतात. या विद्यार्थ्यांच्या वाक्यांनी पालकवर्गातच नव्हे तर गावातील वस्तीत हा कुतुहलाचा विषय बनला आहे. घोलवड गावच्या टोकेपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील योगेश यशवंत जगताप हे शिक्षक नव्यानेच या शाळेत रुजू झाले आहेत. या काळात कार्यालयापर्यंतचा प्रवास सायकलने करण्याचे कालबाह्य झाले असताना त्यांच्या सायकलवारीची चर्चा रंगत आहे.

जगताप गुरुजी हे मूळचे जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील आहेत. दहा वर्षांपूर्वी ते डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कैनाड केंद्रातील खरपडपाडा या प्राथमिक शाळेत रुजू झाले. या दुर्गम आदिवासी पाड्यावरील पालकांची आर्थिक स्थिती पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य घडविण्याकरिता त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीशी नाळ जोडणे आवश्यक आहे. म्हणूनच साधे राहणे आवश्यक असल्याचे जगताप गुरुजींनी हेरले. पेहरावापासून ते भाषेपर्यंत सर्वच साधे असावे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. हा भाग डोंगराळ आणि गरिबीमुळे पालकांकडे सायकली शिवाय अन्य साधनांचा अभाव होता. एखाद दुसरी दुचाकी पाड्यावर पाहायला मिळायची. तेव्हापासून गुरुजींनी डहाणूतील घर ते शाळा आणि पुन्हा परतीचा असा सुमारे २२ कि.मी.चा प्रवास तब्बल दहा वर्ष सायकलने केला. त्यांना तिन्ही ऋतूंचा अडथळा कधी आला नाहीच. त्यामुळे काही अवधीतच ते विद्यार्थिप्रिय तर झालेच. गुरुजी आपल्यातीलच वाटल्याने आदिवासी पालकही त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधू लागले. विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि बौद्धिक गुणवत्ता वाढण्याची किमया सायकलने साधल्याचे लक्षात आल्यानंतर २०१९ या शैक्षणिक वर्षात त्यांची टोकेपाडा शाळेत बदली झाल्यावरही हा नेम चुकलेला नाही. उलटपक्षी त्यांच्या आगमनाने शाळा आणि परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गालगत ही शाळा असून त्यांच्या घरापासून १२ कि.मी.वर आहे. येथे दिवसभर वाहनांची वर्दळ शिवाय शाळेसमोरच एसटीचा बस थांबा. एवढेच नव्हे तर जवळच घोलवड हे पश्चिम रेल्वे स्थानक आहे. या शाळेतील प्रमुख शिक्षक दीपक देसले स्वत:चे वाहन घेऊन डहाणूहून शाळेत येतात. त्यांनीही गुरुजींना सोबत शाळेपर्यंतचा प्रवास विनामूल्य करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सायकल प्रवासाचे प्रयोजन सांगितल्याने गुरुजीही प्रभावित झाले. जगताप गुरुजींचे इंग्रजी विषयावर प्रभुत्व असून अल्पावधीतच त्यांनी विद्यार्थ्यांना आपलेसे केले.

‘‘ गरिबीतून शिक्षण घेतले, त्यामुळे साधेपणाने वागण्याची सवय अंगवळणी लागलेली. विद्यार्थ्यांना हे वागणं आवडल्याने त्यांनी आपलंसं केलं असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतो. शारीरिक तंदुरुस्तीसह पर्यावरण व आर्थिक बचत ही त्रिसूत्री साधली जाते.’’
-योगेश जगताप (टोकेपाडा शाळेतील शिक्षक)

Web Title: Our Gurujee's chicks;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक