Loans and increased malnutrition due to borrowing | कर्ज, उधारीच्या जाचामुळे वाढले कुपोषण

- रवींद्र साळवे
मोखाडा : जुलै २०१७ पासून अंगणवाडीत बालकांना देण्यात येणा-या पोषण आहाराची बिले दिली गेलेली नाहीत. त्यामध्ये सततची अनियमितता आहे. परिणामी, जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आला आहे. मागील काही महिने हा आहार पुरवणा-या महिलांनी आपले दागिने गहाण ठेवून, सावकार, बँक तसेच बचत गटांतून कर्ज काढून आपली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. कर्ज आणि उधारीच्या जाचात अडकलेल्या या महिला आता हतबल झाल्या असून त्यांच्या हतबलतेचे थेट परिणाम कुपोषणावर झाले आहेत.
शासनस्तरावरील या अनास्थेमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा कुपोषणाच्या विळख्यात सापडला असल्याचे हे चित्र श्रमजीवी संघटनेने पुन्हा एकदा माहितीच्या अधिकारातून जनतेसमोर आणले आहे. डिसेंबर या एका महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७०२ तीव्र इतकी लक्षणीय वाढ बालकांच्या संख्येमध्ये झाली आहे. १९९२-९३ साली जव्हारमधील वावर-वांगणी भागात घडलेल्या बालमृत्यूंच्या तांडवानंतर त्या काळातील सरकारने या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करून काही धोरणात्मक निर्णय घेतले होते. याच काळात जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा दिलेला होता. मात्र, ठाणे जिल्हा विभाजनानंतर जव्हार, मोखाडा पूर्णपणे दुर्लक्षित झाला आणि त्याचे परिणाम म्हणून वर्षाला सरासरीपेक्षा जास्त बालकांना जीव गमवावा लागला.
जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ६७५ अतितीव्र कुपोषित, तर ४७६७ तीव्र कुपोषित असे एकूण ५४४२ बालक असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील ३६८ अतितीव्र कुपोषित आणि २५३८ तीव्र कुपोषित अशी एकूण २९०६ बालके आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातील आहेत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी तर कुपोषणावर मात करण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ याच त्यांच्या मतदारसंघातून केला, मात्र ही योजनादेखील पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी झालेल्या उपाययोजनेनंतर कुपोषण काही प्रमाणात का होईना नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा येथील जनतेला होती.
>मोखाड्यातील विदारक चित्र
ज्या सागर वाघ या कुपोषित बालकाच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र खळबळ माजलेली आहे, त्या कमलवाडी येथेही दुर्दैवाने हीच परिस्थिती आहे. येथे एकूण ३९ लाभार्थी आहेत. या महिलांनाही दागिना गहाण ठेवून पोषण आहार शिजवण्याची नामुश्की ओढवली आहे. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात तब्बल ८७८ कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मध्ये १७६ अतितीव्र कुपोषित, तर ७२० तीव्र इतकी विदारक स्थिती आहे.
>लहानग्यांच्या ताटामध्ये फक्त सुकी खिचडी
जव्हारमधील चौथ्याचीच्या अंगणवाडीमध्ये एकूण ९३ लाभार्थी असून पोषण आहार लाभार्थी बालकांची संख्या ४३ आहेत. येथे आहार शिजवण्याची जबाबदारी सुवासिनी बचत गटाकडे असून ती बिले शासनाकडून वेळेवर अदा होत नाहीत. त्यामुळे या महिलांनी उसनवारी करून तसेच मंगळसूत्र गहाण ठेवून पोषण आहाराचा गाडा हाकला आहे. या परिस्थितीमुळे लहानग्यांना गत काही महिन्यांपासून फक्त सुकी खिचडी खावी लागत आहे. याठिकाणी १) अश्विनी राम दुमाडा- ६ वर्षे- ११.५०० किलोग्रॅम,२) यशश्री प्रकाश मुकणे - ६ वर्षे - १४.४०० किलो ग्राम ३) अंकिता शांताराम रामल - ६ वर्षे पूर्ण - ९.१०० किलोग्रॅम, ४) तेजस रामा दुमाडा- २ वर्षे- ७.६०० किलोग्रॅम ही चार तीव्र कुपोषित बालके असल्याची माहिती पुढे येत आहे.
>जिल्हा प्रशासनाच्यावतिने आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कुपोषणाची समस्या असणाºया सर्व तालुक्यात सर्व्हेक्षण केले असून त्या अनुशंगाने उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होणार असून रोजगार वाढणार आहे. येत्या मार्च महिन्यात रिझल्ट हाती येतील.
- मिलिंद बोरीकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जि.प.


Web Title: Loans and increased malnutrition due to borrowing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.