एसटीची मिडी बस मोजतेय शेवटच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:29 AM2018-12-17T05:29:48+5:302018-12-17T05:30:22+5:30

आदीवासी, ग्रामीण प्रवाशांची गैरसोय : यांत्रिक बिघाडामुळे कालबाह्यठरवून करणार इतिहासजमा

The last factor to measure MIDI buses of ST | एसटीची मिडी बस मोजतेय शेवटच्या घटका

एसटीची मिडी बस मोजतेय शेवटच्या घटका

Next

अनिरुद्ध पाटील

डहाणू : खेडोपाड्यात रस्त्यांचे जाळे पसरल्यानंतर, महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या बसेस तिथपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. या करिता मिडी बस फायदेशीर ठरतात. मात्र या आगाराकडे केवळ दोनच मिडी बस उपलब्ध असून यांत्रिकदृष्ट्या त्या कार्यक्षम नसल्याने अल्पावधीतच त्यांचा गाशा गुंडाळला जाऊन त्या इतिहासजमा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

या आगाराअंतर्गत डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. डहाणूत ८५ ग्रामपंचायती असून एकूण दिडशेपेक्षा अधिक गावं आहेत. मागील दशका पेक्षा आज खेडोपाड्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झालेले असून लोकसंख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पाड्यापर्यंत बस सेवा मिळण्यासह, त्या दिवसातील ठराविक अंतराने उपलब्ध व्हाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. या संदर्भातील प्रस्तावही पाठविलेले आहेत. मात्र डहाणू नगरपालिका क्षेत्र आणि लगतची गावे यामध्ये ही सेवा पुरविण्यात या आगाराला अपयश आले आहे. त्यामुळे रिक्षातून आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबलेले असतांना अधिकचे भाडे भरून नागरिकांना प्रवास करावा लागतो. डहाणूपर्यंत लोकल सेवा आल्यानंतर परगावतील प्रवाशांची संख्या वाढली आहे. या मध्ये विद्यार्थी, शासकीय नोकरीतील कर्मचारी आणि न्यायालय, उप विभागीय दंडाधिकारी, यूपीए विभागीय पोलीस अधिकारी, उप वन संरक्षक कार्यालय आणि आगर येथील उप जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी पोहचण्यासाठी दिवसभर प्रवाशी ठराविक वेळेने येत असतात.
शिवाय विकेंड आणि पर्यटन हंगामात रहदारी वाढती असते. मात्र, सेवे अभावी सर्वांचीच गैरसोय होते. तर लालपरी म्हणून ओळखली जाणारी परिवर्तन गाडी ४४ आसनी असून एवढे प्रवासी न मिळाल्यास नफ्या पेक्षा खर्च अधिक होत असल्याने त्या चालविण्या पेक्षा मिडी बसेस फायद्याच्या ठरतात. परंतु येथे केवळ दोनच मिडी उपलब्ध आहेत. त्या ही यांत्रिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नाहीत. प्रवासादरम्यान त्यांच्यात सतत बिघाड होत असून काळा धूर फेकून त्या प्रदूषण निर्माण करीत आहेत. तर या पद्धतीच्या बसेस शेवटच्या घटिका मोजत असून पालघर विभागात पालघर आणि बोईसर आगारात प्रत्येकी चार आणि उर्वरित दोन डहाणूला आहेत. त्या कालबाह्य ठरल्याने हा प्रोजेक्ट बासनात गुंडाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डहाणू आगाराच्या आर्थिक तोट्याचे असे आहे गणित
या आगाराचे प्रतिदिन १३ हजार किमी प्रवासाचे सरासरी लक्ष्य आहे. मात्र, ते साधण्यास अपयश येत आहे. त्यामुळेच सात लाखांचे अपेक्षित उत्पन्न असतांना ३ लक्ष ७७हजार एवढेच उत्पन्न हाती येते. प्रती किमी उत्पन्न २८ रु पये ८३ पैसे इतके तर भारमान ५५ एवढे आहे. या आगाराच्या ताफ्यात ३३ परिवर्तन गाड्या, १४ मानव विकास आणि फक्त २ मिडी बसेस आहेत. दरम्यान, मिडीची असलेली कमतरताच या आगाराला आर्थिक तोट्याकडे ढकलत असल्याचे दिसून येते.

 

Web Title: The last factor to measure MIDI buses of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.