जव्हारला रजपूत, वाड्याला पाटील, डहाणूला झाईवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:02 AM2018-01-12T05:02:15+5:302018-01-12T05:02:22+5:30

गुरूवारी झालेल्या निवडणुकीत वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उर्मिला पाटील तर डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहिंग्टन झाईवाला हे बिनविरोध तर जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत या १० विरूद्ध ७ मतांनी निवडून आल्यात.

Jawhar Rajput, Wadali Patil, Dahanula Jhaiwala | जव्हारला रजपूत, वाड्याला पाटील, डहाणूला झाईवाला

जव्हारला रजपूत, वाड्याला पाटील, डहाणूला झाईवाला

Next

वाडा/ डहाणू/जव्हार :गुरूवारी झालेल्या निवडणुकीत वाड्याच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उर्मिला पाटील तर डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहिंग्टन झाईवाला हे बिनविरोध तर जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत या १० विरूद्ध ७ मतांनी निवडून आल्यात. तर स्वीकृत नगरसेवकपदी वाड्यात सेना भाजपचे तर जव्हारमध्ये सेना, राष्टÑवादीचे प्रत्येकी एक आणि डहाणूला भाजपचे २ तर राष्टÑवादीचा एक उमेदवार स्वीकृत झाले.
वाडा : या नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी गुरूवारी शिवसेनेच्या उर्मिला पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
नगरपंचायतीच्या निवडणूकीत शिवसेना व भाजप यांच्यात खºया अर्थाने लढत होऊन भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निशा सवरा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर या विजयी झाल्या. मात्र शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाला असला तरी नगरसेवक पदाच्या १७ जागांपैकी अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने उपनगराध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्याचे शिवसेने पुढे मोठे आव्हान होते. नगरपंचायत निवडणूकीच्या निकालात शिवसेना सहा, भाजप सहा, काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी, रिपाइं व बहुजन विकास आघाडी यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले होते .
गुरूवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून उर्मिला पाटील यांनी तर भाजपकडून गटनेते मनिष देहेरकर यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र देहेरकर यांनी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूकीच्या पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष गीतांजली कोळेकर यांनी केली.
शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत नसल्याने शिवसेनेने काँग्रेसच्या दोन सदस्यांचा पाठिंबा सुरवातीलाच मिळवल्याने शिवसेनेचे संख्याबळ नगराध्यक्षासह नऊ झाले होते. त्यात नगराध्यक्षांना कास्टिंग मत असल्याने शिवसेनेचे संख्याबळ उमेदवारासह नऊ झाले होते. त्यात नगराध्यक्षांना कास्टिंग मत होते. त्यामुळे अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी, रिपाइं व बहुजन विकास आघाडी या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा देऊन ते सत्तेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग सुकर झाला. यावेळी शिवसेनेचे नेते राजेश शहा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख अरूण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव मनीष गणोरे, तालुका प्रमुख प्रकाश पाटील, ज्येष्ठनेते प्रा.धनंजय पष्टे, तुषार यादव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहीदास पाटील, शहराध्यक्ष अमिनसेंदू आदी उपस्थित होते.

पवार, केणे बिनविरोध
स्वीकृत नगरसेवकपदी संदीप पवार, प्रकाश केणे यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतीच्या एकूण संख्याबळानुसार दोन स्वीकृत नगरसेवकांच्या जागा होत्या. निवडून आलेल्या पक्षीय संख्याबळानुसार भाजप व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा होती. त्यानुसार भाजपकडून संदीप पवार व शिवसेनेकडून प्रकाश केणे यांची नावे सूचित करण्यात आली होती.

जव्हारच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत

जव्हार : या नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा रजपूत यांची १० विरुद्ध ७ मतांनी निवड झाली. राष्टÑवादीचे वैभव अभ्यंकर पराभूत झालेत. स्वीकृत नगरसेवकपदाची निवड ही चुरशीची होऊन सेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे दोन नगरसेवक स्वीकृत झाले. सेनेकडून प्रसन्न भोईर यांची वर्णी लागली तर राष्ट्रवादीने जव्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत पाटील यांची निवड करून सगळ्यांना बुचकळ्यात टाकले भाजपाचे एकमेव नगरसेवक कुणाल उदावंत हे उपस्थित राहूनही तटस्थ राहीले.

गुरूवारी झालेली उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवडही रंगतदार झाली. तसे पाहील्यास एकूण १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष १ धरून १८ मतांचे गणित
बघितल्यास १० सेना, ७; राष्ट्रवादी आणि १ भाजप असे पक्षीय बलाबल
होते.
मात्र तरीही राष्ट्रवादीने उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज केल्यामुळे सेनेच्या गोटात काही काळ खळबळ माजली होती. परंतु दहा विरुद्ध सात असे मतदान झाल्याने पिठासीन अधिकारी चंद्रकांत पटेल यांनी रजपूत यांना विजयी घोषित करून उपनगराध्यक्षांच्या आसनावर विराजमान केले.
तर स्वीकृत नगरसेवक म्हणून संख्याबळानुसार राष्टÑवादी व शिवसेनेला प्रत्येकी १ नगरसेवक नेमता येणार होता. यावेळी सेनेकडून अपेक्षित अशी अ‍ॅड प्रसन्न भोईर यांची वर्णी लावली तर राष्ट्रवादीने मोठी राजकीय खेळी करून ज्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत नंबर दोनची मते मिळवली होती त्या भरत पाटील यांना स्वीकृत नगरसेवक करून सगळ्यांना चकित केले. यामुळे याबाबीची जोरदार चर्चा जव्हारमध्ये रंगली असून ही भावी राजकारणाची नांदी समजली जाते आहे. यामुळे मात्र राजकारणत काहीही शक्य याची प्रचीती आली.

डहाणूच्या उपनगराध्यक्षपदी रोहिंग्टन झाईवाला
डहाणू : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आणि तीन स्विकृत नगरसेवक पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत उपनगराध्यक्षपदी भाजपाचे रोहींग्टन झाईवाला तर स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे विशाल नांदलस्कर आणि भरत शहा यांची तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी भरतसिंग राजपूत यांनी केली.नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे भरत सिंग राजपूत हे निवडून आले होते. तर नगरसेवकपदी भाजपाचे १५, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ८ आणि शिवसेनेचे २ नगरसेवक निवडून आले होते.
गुरूवारी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे रोहीग्टन झाईवाला विजयी झाले तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे भरत शहा व विशाल नांदलस्कर तर राष्ट्रवादीचे मिहीर शहा यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी केली. या तीनही पदांसाठी तीनच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. ही तीनही नावे अपेक्षेप्रमाणे निघालीत.

Web Title: Jawhar Rajput, Wadali Patil, Dahanula Jhaiwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.