धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:32 AM2022-07-15T07:32:45+5:302022-07-15T07:33:19+5:30

एनडीआरएफनं वैतरणेत उतरवली बोट, १६ तासांचा लढा झाला यशस्वी

Heavy rain, flooded river ten workers out of the jaws of death ndrf vaitarana river heavy rain | धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

धो-धो पाऊस, पुराने वेढलेली नदी आणि.... ‘त्या’ दहा कामगारांना आणले मृत्यूच्या दाढेतून

googlenewsNext

हितेन नाईक
पालघर : डोक्यावर धो-धो कोसळणारा पाऊस, पायाखाली पुराने वेढलेली वैतरणा नदी आणि समोर रात्रीचा काळाकुट्ट अंधार. अंगावर काटा आणणाऱ्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन १० कामगार रात्रभर डोळ्यांत तेल घालून मदतीकडे आस लावून  कुडकुडत होते. समोर मृत्यू दिसत असतानाही कोणीतरी येईल आणि मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत आपल्याला घेऊन जाईल, हीच इच्छाशक्ती उराशी बाळगत त्यांनी सोळा तास निकराने लढा दिला आणि जगण्यासाठी सुरू असलेला त्यांचा हा संघर्ष यशस्वी झाला. सकाळी एक बोट त्यांच्या दिशेने येताना दिसली आणि अगदी कंठाशी आलेल्या त्यांच्या जिवात जीव आला. देवदूतासारखे धावून आलेल्या एनडीआरएफच्या टीमनेही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या दहा कामगारांची सुखरूप सुटका करीत शेवट गोड केेला.   

पालघरच्या वैतरणा नदीत बुधवारी रात्री अडकलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरच्या १० कामगारांचा हा अनुभव थरारक असाच ठरला. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एनडीआरएफ टीमचे काम सुलभ झाल्याने कामगारांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. 

मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू असून, ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरने बहाडोली गावात मोठा प्रकल्प उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी खांब उभारण्याचे काम मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असतानाही सुरू होते.

कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची हीच जोखीम १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली. बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे, एनडीआरएफकडे असलेल्या साधनसामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीची मदतही  मिळू शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. 

स्थानिक पोलिसांचे सहकार्य महत्त्वपूर्ण
जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि समुद्राला आलेली ओहोटी यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्यानंतर एनडीआरएफने नदीत बोटी उतरविल्या.

Web Title: Heavy rain, flooded river ten workers out of the jaws of death ndrf vaitarana river heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.