पालघर : परिवहन विभागाने पासिंग चाचणी प्रक्रिया पालघरवरून कल्याणला हलविल्याने ते पुनश्च पालघरमध्ये सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील तीन आणि सहा आसनी रिक्षाधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. ह्यावेळी ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ ह्या आपल्या ब्रीद वाक्याला जागत पहाटेपासून एसटी सेवा प्रवाश्यासाठी रस्त्यावर धावत होत्या.
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तीन, सहा आसनी रिक्षा युनियननी शुक्र वारपासून सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनामुळे पहाटेपासून कामावर जाणारे कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी ह्यांची मोठी पंचाईत झाली. पालघर, बोईसर औद्योगिक वसाहतीमध्ये कामावर जाणाºयांना शुक्रवारी सुट्टी असल्याने गर्दीचे प्रमाण कमी होते. मात्र पालघरमध्ये भरणाºया शुक्रवारच्या बाजारावर मात्र ह्या बंदचा परिणाम जाणवत होता.
रेल्वे स्टेशन ते बाजारापर्यंत आपले सामान घेऊन जाताना विक्रेत्यांची पुरी दमछाक होताना दिसत होती. पालघर, सफाळे, बोईसर, डहाणू रेल्वे स्टेशनवरून मुंबई-गुजरातकडे जाणाºया आपल्या नातेवाईकांना मोटारसायकल, कारने पोचिवण्याचे काम त्यांच्या नातेवाईकाना करावे लागत होते. ह्यावेळी ट्रिपल सीट बसलेल्यांना ही पोलीस आज अडवत नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर येईल त्या वाहनांना हात दाखवून थांबविण्याची विनंती प्रवासी करीत होते.
सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आणि प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्याला जागून शुक्रवारी पहाटेपासून एसटी पालघर विभागाचे नियंत्रक अजित गायकवाड ह्यांच्या साथीने सर्व चालक, वाहक प्रवाश्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले होते. रस्त्या- रस्त्यावर वाहतूक निरीक्षकांच्या नेमणुका करून प्रवाशांची काळजी घेतली जात असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे सर्वच विभागातील बसेस भरून जात होत्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे एसटी विभागाला मोठा फायदा झाला.
पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, सफाळे, मनोर आदी तर डहाणू तालुक्यातील हजारो रिक्षाधारक मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून पालघर तद्नंतर वसईच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात आपल्या गाडीची पासिंग चाचणी प्रक्रिया करीत आले होते. मात्र उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेसंदर्भात देण्यात आलेल्या आदेशात ब्रेक टेस्ट ट्रॅक सुविधा असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातच पासिंग चाचणी प्रक्रि या करण्याचे सांगितले. त्यामुळे वसई येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे ब्रेक टेस्ट ट्रॅक सुविधा नसल्याने न्यायालयाच्या आदेशान्वये कल्याणच्या उपप्रादेशिक कार्यालयात पासिंग करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई तालुक्यातील सर्व वाहनधारकांना आता पासिंग चाचणीसाठी नाईलाजाने कल्याण येथे जावे लागणार आहे. ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून सर्व वाहनधारकांना खर्चिक, धोकादायक आणि मनस्ताप सहन करून सध्या तरी कल्याणची वारी करावीच लागणार आहे. ह्यातून काहीतरी कमी त्रासदायक मधला मार्ग काढावा अशी इच्छा रिक्षाधारकानी व्यक्त केली आहे.
ह्या समस्येतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने शुक्रवारी आमदार अमित घोडा, आॅटो टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष केतन पाटील, उपाध्यक्ष सुनील जगताप, सेना जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, छत्रपती शिवाजी महाराज संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत आदींनी निवासी जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे ह्यांची भेट घेतली.
हा निर्णय उच्च न्यायालयाचा असल्याने त्याची अंमलबजावणी करावी लागेल. मात्र, वसई येथे ब्रेक टेस्ट ट्रॅकची उभारणी होईपर्यंत
इथल्या वाहनधारकांना कल्याण येथे जावे लागू नये ह्या साठी वरिष्ठ
शासन पातळी वरून मार्गदर्शन घेऊ असे डॉ. जरे ह्यांनी सांगितल्या नंतर सर्व रिक्षा युनियनच्या
पदाधिकाºयांनी बेमुदत बंद मागे घेत शुक्रवारी रात्रीपासून आपापल्या रिक्षा सेवा सुरू राहतील, असे जाहीर केल्याची माहिती मनोज घरत
ह्यांनी दिली.

वसई-विरारमध्ये रिक्षांचा कडकडीत बंद
वसई : योग्यता तपासणी चाचणी पालघर जिल्ह्यातच घेण्यात यावी यामागणीसाठी वसई विरार परिसरातील रिक्षा चालकांनी दिवसभर बंद पाळला. या कडकडीत बंदमुळे शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल झाले. संध्याकाळी पाच वाजता रिक्षा पुन्हा धावू लागल्या. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ब्रेक टेस्ट शासकीय ट्रॅकवरच घेण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. पालघर जिल्ह्यात शासकीय ट्रॅक नसल्याने चाचणीसाठी प्रवाशी आणि मालवाहतूक वाहनांना कल्याण येथे जावे लागणार आहे. त्याला पालघर जिल्ह्यातील संघटनांनी विरोध केला आहे. चाचणी पालघर जिल्हयात शासकीय जागेवर ट्रॅक तयार करून घेण्यात यावी अशी मागणी आहे.सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रिक्षा वाहतूक बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पालघर जिल्ह्यातील वाहनांची चाचणी विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात केली जात होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या ट्रॅक योग्य नसल्याने हायकोर्टाच्या निर्देशानुसार सदर ट्रॅकवर चाचणी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी कल्याण येथील शासकीय ट्रॅकवर चाचणी घेण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. कल्याणसारख्या दूरवरच्या ठिकाणी जाण्यास वाहन चालकांना विरोध असल्याने बंद पाळण्यात आला होता.दरम्यान, शासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य अशा ट्र्ॅकवरच चाचणी घेण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने ट्रॅक तयार करण्याचे मान्य केले होते. पालघर जिल्हयासाठी असलेले विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अजूनही भाडे तत्तावर खाजगी जागेवर सुरु आहे. जागा अतिशय कमी असल्याने त्याठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ट्रॅक करणे कठीण आहे. राज्य सरकारने उपप्रादेशिक कार्यालयासाठी गोखीवरे येथे जागा देण्यात आली आहे. मात्र, सदर जागेवर काही भागात अतिक्रमण झालेले असल्याने पुढील काम रखडून पडले आहे.

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल
बोईसर : तीन व सहा आसनी रिक्षा चालकानी सुरु केलेल्या बंदमुळे शुक्रवारी बोईसर व परिसरात जाणाºया प्रवाश्याचे प्रचंड हाल झाले तर एरवी एसटी कडे फारसे वळून न बघणाºया प्रवशांनी शक्रवारी एसटीचा आधार घेतला. बोईसर हुन तारापुर चिंचणी तसेच पालघर, नवापुर, मुरबा आणि बोईसर पूर्व येथील अनेक गांव पाड्यांकडे जाण्या करीता रिक्षा वरच अवलंबुन असल्याने रिक्षा बंदचा फटका या सर्वांना बसला तर बोईसर एसटी डेपोतून जास्त बेसेस सोडण्यात आल्या होत्या


रिक्षाचालक आंदोलनात सामील
पारोळ : पालघर, डहाणु,विरार या ठिकाणी प्रवासी वाहनांची पासिंग बंद करून ती कल्याण येथे केली जाणार असल्याच्या निषेधार्थ वसई पूर्व भागात चालक व मालकांनी दिवसभर रिक्षा बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. या बंदची कल्पना प्रवाशांना नसल्याने त्यांची फरफट झाली. विरार फाटा, वसई फाटा, शिरसाड, चंदनसार, पारोळ फाटा याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.