सर्वत्र शिस्तबद्धता : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:46 AM2018-09-25T02:46:04+5:302018-09-25T02:46:22+5:30

यंदा वसईतील बाप्पा हे डी जे मुक्त मिरवणुकीतून रविवारी दुपारी विसर्जनासाठी निघालेत. ढोल लेझीमच्या गजरात तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

 Discipline everywhere: Quote by the conventional sermons to the papa | सर्वत्र शिस्तबद्धता : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप

सर्वत्र शिस्तबद्धता : पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप

googlenewsNext

वसई : यंदा वसईतील बाप्पा हे डी जे मुक्त मिरवणुकीतून रविवारी दुपारी विसर्जनासाठी निघालेत. ढोल लेझीमच्या गजरात तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
दरम्यान वसई रोड आणि वसई शहरातील गणपतींचे विसर्जन अत्यंत शांततेत तथा खासकरून डी जे मुक्त वातावरणाने अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडले. असे माणिकपूर पोलीस पोलीस निरीक्षक बांदेकर यांनी माहिती देताना सांगितले,
दुपारी ३ वाजल्यानंतर अनेक भाविकांनी घरगुती व सार्वजनिक मूर्तींच्या विसर्जनाच्या मिरवणुकीस प्रारंभ केला. ढोल, ताशे , लेझीम यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांमध्ये लहान मुलांसह अबालवृद्धही सहभागी झाले होते. गणरायांच्या विसर्जनासाठी वसई विरार महापालिकेच्या नवघर आणि वसई विभागीय क्षेत्रात चांगली व्यवस्था करण्यात आली होती.
सालाबादप्रमाणे दिवाणमान आणि पापडीच्या तलावांमध्ये बाप्पांचा हा विसर्जन सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. यासाठी वसई आणि माणिकपूर पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता, तर रस्त्यावर वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस यांच्या सह, स्वयंसेवी, सामाजिक संस्था, एन सीसी चे विद्यार्थी आदी भक्तगण ,पदाधिकारी यांनी विसर्जन ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवली होती.
दरम्यान वसईच्या नवघर माणिकपूर शहरात आणि वसई गावच्या हद्दीत साधारण बाराशे गणपतीचे विसर्जन झाले तर शहरी व ग्रामीण भाग यांचे घरगुती आणि सार्वजनिक असे मिळून दीड ते दोन हजार गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले.
विसर्जनावेळी बाप्पाला निरोप देताना भक्तांना आपले अश्रू आवरता आले नाही वसईकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप देतांना पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला.
रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुका दिवाणमान तलाव, वसई गावात, पापडी पुढे किल्लाबंदर, पाचूबंदर, समुद्र किनारी रानगाव आदि विसर्जनस्थळी येत होत्या.
यावेळी मनपाचे आजी -माजी लोकप्रतीनिधी व मनपा अधिकारी या संपूर्ण व्यवस्थेसाठी नियंत्रणाचे काम करीत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक व स्थानिक पोलिसांनी परिपूर्ण व्यवस्था केली होती. त्यामुळे वसईकरांचा उत्साह भरभरून दिसत होता.
माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण साडेतीनशे गणपतींचे विसर्जन झाले यामध्ये सार्वजनिक गणपतीची संख्या २१ आणि घरगुती ची संख्या ३०० च्या आसपास होती ,हे सर्व गणपती दिवाणमान च्या तलावात विसर्जित करण्यात आले. तर अन्य दोन मोठे गणपती किल्लाबंदरच्या समुद्रात नेण्यात आले,तसेच वसई पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक गणपतीची संख्या १५ होती, तर घरगुती गणपतीचा आकडा साधारण ८५० होता, या सर्व गणपतींचे पापडी, देवतालाव, रानगाव, पाचूबंदर जेट्टी, नायगाव आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिस्त पाळल्याने विसर्जन शांततेत पार पडले.

जव्हारमध्ये पालिकेतर्फे विसर्जनाची होती सज्जता

जव्हार : रविवार दुपार पासूनच लाडक्या बाप्पाला निरोप देणाºया मिरवणुकीचा प्रारंभ या शहरात झाला. येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक श्रीराममंदीर गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक आकर्षक ठरली.तीमध्ये महिला व पुरूषवर्गाने पोपटी रंगाचा एक सारखा पोषाख घालून चार चाँद लावले होते. प्रारंभी जव्हार पोलीस ठाण्याच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले, व दुपार नंतर लगेचच पोलीसांनी आपला बंदोबस्त सांभाळला. तसेच या मिरवणूकीत शहरातील मोर्चा गणेशमंडळ, महालक्ष्मी गणेश मंडळ, श्रीराममंदीर गणेश मंडळ, अंबिका चौक गणेश मंडळ यांनी बॅन्जो, ढोलपथक सह भव्य मिरवणूक काढली होती. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर नगर परिषदेने विसर्जनाची संपूर्ण सज्जता ठेवली होती. पाण्यात कचरा होऊ नये म्हणून फुल हार करीता निर्मल कलशची व्यवस्था करण्यात आली होती.

बोईसर - तारापूरला बाप्पांना भावपूर्ण निरोप
बोईसर : तारापूरसह परिसरातील गावामध्ये सार्वजनिक ३० तर घरगुती सुमारे दिडशे बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सायंकाळी सुरू झालेल्या विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मिरवणूक पाहण्याकरता बोईसरला भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने रस्ते दुतर्फा फुलून गेले होते मिरवणूक मार्गात बदल करण्यात आले होते . गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती .गर्दीच्या ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून तेथे पोलीस तैनात केले होते मिरवणुकीतील वाद्यांच्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी पोलिसांनी ध्वनिमापकाचा वापर केला.

मोखाड्यात विसर्जन शांततेत
मोखाडा : गणपती बाप्पा मोरय्या, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, एक लाडु फुटला गणपती बाप्पा उठला, या घोषणा, त्याचप्रमाणे ढोलताशे, सनई - संबळाच्या तालावर तसेच गुलालाची उधळण करत तालुकावासियांनी बाप्पाला रविवारी निरोप दिला दहा दिवसांच्या गणरांयाची संख्या कमी असल्याने शांततेत व भावपूर्ण श्रध्देने गाव पाड्यांतील भक्तांनी आप-आपल्या स्थानिक नदी पात्रात तर मोखाडा शहरात विराजमान असलेल्या बाप्पाला पांरपारीक मोखाड्यातील तलावात निरोप दिला.

मनोरच्या राजासह
३५ बाप्पांचे विसर्जन
मनोर : ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्यांच्या तालावर रविवारी मनोरच्या राजा सहित सार्वजनिक व घरगुती श्रीं च्या मूर्तींचे गणेश कुंडात विसर्जन केले गेले. मनोरच्या राजा सहित १० सार्वजनिक व २५ घरगुती गणपतीचे वैतरणा, सूर्या, देहर्जा, तानसाच्या पत्रातील गणेश कुंडात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले मनोर पोलिसांनी ही पोलीस ठाण्यात दहा दिवसांच्या गणरायाची स्थापना केली होती. त्याचेही विसर्जन रविवारी अत्यंत थाटामाटात करण्यात आले. हे यावेळचे आकर्षण ठरले होते.

वसई ग्रामीणमध्ये गणरायाला निरोप
पारोळ : अकरा दिवस,मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी गणरायांना मंगलमय वातावरणात निरोप देण्यात आला. वसई तालुक्यात ७१ ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या वर्षी डीजे ला बंदी असल्याने पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूकीत भक्तांचा उत्साह कायम होता. सर्व विसर्जन ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने सोहळा शांततेत पार पडला. गणरायाला निरोप देण्यासाठी अवघी वसई रस्त्यावर उतरली होती. पारंपरिक पद्धतीने गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात, आल्या.

अकरा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन
विक्रमगड : शहरातील छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, चालक मालक मित्र मंडळ, पोलिस स्टेशन यांच्या गणरायाचे गाजतवाजत विसर्जन करण्यात आले , या वेळी आवाजाची मर्यादा असल्याने वाद्यांच्या सौम्य गजरात परंतु अत्यंत उत्साहात या सर्व मंडळांनी आंनदात विसर्जन केले ११ दिवसांच्या उत्सव काळात विविध कार्यक्रम, भंडारा आयोजित करण्यात आले होते. त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला.

तलासरीत गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप
तलासरी : दहा दिवसांच्या गणरायाला रविवारी भावपूर्ण वातावरणात लेझीम , तारफा नृत्याच्या तालावर निरोप देण्यात , निरोप देतांना मंडळाचे कार्यकर्ते भावूक झाले होते. रविवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. दहा दिवसांच्या सात गणरायाचे विसर्जन करण्यात आले तलासरीतील कुर्झे धरण, वेरोली नदी, झडी खाडी येथे हे विसर्जन करण्यात आले यावेळी तलासरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. डीजेला बंदी असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.
येथील पारंपरिक असलेल्या तारफा नृत्याने डिजेची कमतरता भरून काढली. पावसाने विश्रांती घेतल्याने मिरवणुकीचा उत्साह चांगलाच वाढला होता. शिस्तबद्धतेमुळे हे विसर्जन शांततेत पार पडले.

पालघरात विसर्जन शांततेत

पालघर : रविवारी संपूर्ण जिल्ह्यात ६०७ सार्वजनिक, तर ४८०७ घरगुती गणरायांचे विसर्जन शांततेत पार पडले. डीजेवरील बंदी व ध्वनी तीव्रतेवरील निर्बंधांचे काटेकोरपणे या मिरवणुकीत पालन करण्यात आले. विसर्जन काळात समुद्राला ओहोटी असल्यामुळे मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यास आलेल्या भक्तजनांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. गणेशोत्सवाच्या काळात १२२ पोलीस अधिकारी १३६५ पोलीस, एक एसआरपी कंपनी, ३५० होमगार्ड तैनात होते. कडेकोट बंदोबस्तामुळे वाहतूककोंडीही झाली नाही व मिरवणूकही शांततेत पार पडली.

Web Title:  Discipline everywhere: Quote by the conventional sermons to the papa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.