खाकीतील अंबिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:56 PM2018-10-15T23:56:46+5:302018-10-15T23:57:00+5:30

दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमात तहसीलदारांच्या भाषणाने तामिळनाडूच्या खेड्यात सामान्य कुटुंबात जन्मलेली एक विद्यार्थिनी प्रभावित झाली. स्पर्धा परीक्षा, देशसेवेच्या ध्येयाने तिच्या कोवळ्या मनात घर केले. महाविद्यालयात असतानाच लग्न झाले, पाहता पाहता दोन गोंडस मुले झाली. संसाराची जबाबदारी पार पाडत असतानाच तिला ध्येय खुणावत होते. प्रवास खडतर होता. पण विचलित न होता, नेटाने प्रयत्न करून २००९ मध्ये तिने ध्येय गाठलेच. तिचे नाव आहे आयपीएस अधिकारी एन. अंबिका.

Ambika khaki! | खाकीतील अंबिका!

खाकीतील अंबिका!

Next

- मनीषा म्हात्रे

एन. अंबिका यांचा जन्म तामिळनाडूच्या खेड्यातील. दहावीत असताना शाळेतील एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या तहसीलदारांच्या भाषणाने त्या प्रभावित झाल्या. भविष्यात सरकारी सेवेत रुजू होऊन समाजासाठी काहीतरी करायचे, असे त्यांनी त्याचक्षणी ठरवले. पुढे कला शाखेत प्रवेश घेतला. मात्र शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे लग्न झाले.


घर, संसार सांभाळतानाच अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पतीनेही पाठिंबा दिला. दरम्यान, मुलगा झाला. तरीही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. पहिल्यांदा अपयश आले. पुन्हा तयारी सुरू केली. परंतु, अपयश पाठ सोडेना! त्यादेखील जिद्दी होत्या. त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. दरम्यान, दुसरा मुलगा झाला. संसार, लहानग्यांचे संगोपन आणि स्पर्धा परीक्षा... अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेर मेहनतीला यश आले. पाचव्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्या वेळी एक मुलगा पाच वर्षांचा तर दुसरा वर्षाचा होता. २००९ मध्ये त्या पोलीस सेवेत दाखल झाल्या. अकोला, हिंगोली, नाशिकमध्ये कर्तव्य बाजावल्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या परिमंडळ ४च्या उपायुक्त पदाची जबाबदारी आली. दोन वर्षांपासून त्या ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. अलीकडेच शहरात गणेशोत्सव पार पडला. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. गर्दीत चोरी, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक आघाड्यांवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या साथीने अंबिका यांनी चोख बंदोबस्त ठेवला. कधीकाळी परिमंडळ ४मध्ये सोनसाखळी चोरीच्या सर्वाधिक घटना घडायच्या. अंबिका यांनी अचूक व्यूहरचना आखली. गस्त, बंदोबस्ताची पद्धत बदलली. आरोपी लवकर पकडले जावेत, चोरी मुद्देमाल ज्याचा त्याला परत मिळावा, यासाठी धडपड सुरू असते, असे अंबिका यांनी सांगितले. महिला घराचीच नव्हे, तर देशाच्या संरक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पेलू शकतात, हे अंबिका यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

महिलांनो, सक्षम व्हा. हिंमत हरू नका. अत्याचार सहन करू नका. कोणत्याही अडचणींबाबत कुरबूर न करता त्यावर मात करत पुढे चला. ठरवले तर कोणतीही गोष्ट अवघड नसते. फक्त ध्येय पक्के हवे, मन खंबीर हवे आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी हवी. मग पाहा, अशक्यही सहज शक्य करता येते.

Web Title: Ambika khaki!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत