जि.प. सभापतिपद; भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच

By admin | Published: March 26, 2017 12:59 AM2017-03-26T00:59:56+5:302017-03-26T00:59:56+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता जनतेचे लक्ष लागले आहे ...

Zip Chairmanship BJP leaders rope in | जि.प. सभापतिपद; भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच

जि.प. सभापतिपद; भाजप नेत्यांमध्ये रस्सीखेच

Next

मोर्चेबांधणी : सदस्यांकडून भेटीगाठी
राजेश भोजेकर वर्धा
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता जनतेचे लक्ष लागले आहे ते सभापती पदांच्या निवडीकडे. जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा बहुमतात फडकला असला तरी आपल्याच प्रभावक्षेत्रातील सदस्याच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडावी, यासाठी भाजप नेत्यांमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
येत्या १ एप्रिलला सभापती पदांची निवड होऊ घातली आहे. अर्थ व बांधकाम, महिला व बाल कल्याण, शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या पाच समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. पैकी एक समिती उपाध्यक्षाकडे राहणार असल्यामुळे चार सभापतींचीच निवड होईल.
जि. प. अध्यक्षपदावर सुरूवातीपासूनच हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांनी दावा सांगितला होता. सोबतच आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही दावा केला होता. यामध्ये आ. कुणावार यांचे पारडे जड पडल्याने त्यांच्या मर्जीतील सावली(वाघ) गटाचे सदस्य नितीन मडावी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली, तर उपाध्यक्षपद आर्वी मतदार संघातील जळगाव गटाच्या सदस्य कांचन नांदुरकर यांच्या वाट्याला आले. उल्लेखनीय गटनेता पदही सरोज माटे यांच्या रूपाने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रालाच मिळाले. यामुळे आता या मतदार संघाचा सभापतिपदावरील दावा संपला, असे भाजपात बोलले जात आहे. उपाध्यक्षाकडे एक समिती जाणार असल्यामुळे उर्वरित चार समित्यांसाठी भाजपश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे.


भाजपला बहुमत, तरीही कमालीची चुरस
वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रातील पारडी गटाचे सदस्य सुरेश खवशी यांच्या रुपाने पुन्हा एका सभापती पदाचा आग्रह दादाराव केचे पक्षश्रेष्ठींकडे धरुन असल्याची माहिती आहे. सभापती पदांबाबत देवळी आणि वर्धा विधानसभा मतदार संघाचेही दावे मजबूत आहे. वर्धा विधासभा मतदार संघातील येळाकेळी गटातील सदस्य सोनाली अशोक कलोडे यांचे नाव महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी तर नालवाडी गटाच्या सदस्य नुतन प्रमोद राऊत यांचे समाज कल्याण समिती सभापतीपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अशोक कलोडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांचे खंदे समर्थक आहे ही त्यांची जमेची बाजू आहे, तर प्रमोद राऊत हे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्ती ओळखले जातात. हे दोन्ही सदस्य वेगवेगळ्या पदासाठी इच्छुक असल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात आहे. विशेष म्हणजे, वर्धा मतदार संघाला दोन सभापतीपदे मिळावी, यासाठी आ. डॉ. पंकज भोयर फिल्डिंग लावून असल्याचे समजते. त्यांनी आपले पत्ते अद्याप उघडल्याचे ऐकिवात नाही.
देवळी विधानसभा मतदार संघाची धुरा स्वत: खा. रामदास तडस वाहतात. या मतदार संघाचे राजकारण त्यांच्या नेतृत्वात होते. भिडी गटाचे सदस्य मुकेश भिसे, आंजी(मोठी) गटाच्या सदस्य जयश्री सुनील गफाट व गुंजखेडा गटाच्या सदस्य वैशाली जयंत येरावार यापैकी दोघांची सभापतिपदी वर्णी लागावी, यासाठी ते आग्रही असल्याची माहिती आहे. वर्धा जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत असले तरी सभापतिपदासाठी चारही विधानसभा मतदार संघातील भाजप नेते आपल्या प्रभावातील सदस्याला पद मिळावे, यासाठी हालचाली करीत आहे, यात कुणाला यश येते, या अनुषंगाने या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Zip Chairmanship BJP leaders rope in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.