सेलूच्या केळीला गतवैभवाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:34 PM2018-11-24T23:34:38+5:302018-11-24T23:36:28+5:30

काही वर्षांपूर्वी सेलूच्या केळी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होत्या. इतकेच नव्हे तर राज्याबाहेरील व्यापारी हंगामात केळी खरेदीसाठी सेलूत आपला डेरा टाकत. त्यावेळी केळी बागायतदार संघ तयार करण्यात आला. कालपरत्वे ते कमी झाले.

Waiting for Selu's banalism | सेलूच्या केळीला गतवैभवाची प्रतीक्षा

सेलूच्या केळीला गतवैभवाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देठिबक सिंचनाचा वापर : अवघ्या १५ महिन्यांच्या कालावधीत होतेय लाखोंची ‘इन्कम’

प्रफुल्ल लुंगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : काही वर्षांपूर्वी सेलूच्या केळी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होत्या. इतकेच नव्हे तर राज्याबाहेरील व्यापारी हंगामात केळी खरेदीसाठी सेलूत आपला डेरा टाकत. त्यावेळी केळी बागायतदार संघ तयार करण्यात आला. कालपरत्वे ते कमी झाले. मात्र, आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करण्यास सुरूवात केल्याने केळींच्या बागांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सेलूच्या केळीला गतवैभवाची प्रतीक्षा असून त्यासाठी या भागातील केळी उत्पादक शेतकरी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
पूर्वी मोठ्या प्रमाणात सेलू तालुक्यात केळीचे उत्पन्न घेतल्या जात होते. परंतु, त्यानंतर शेतकºयांनी केळीचे उत्पादन घेण्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे सेलूच्या केळी नामशेष होण्याच्या मार्गावर आल्या होत्या. परंतु, सध्या पुन्हा एकदा शेतकरी केळीच्या लागवडीकडे वळत असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले आहे. केळी उत्पादक टिश्यु बियाण्यांचा वापर करीत असून यामुळे उत्पादनातही भर पडत असल्याचे शेतकरी सांगतात. पूर्वी रात्रदिवस बागेत मोठाली आळी करून केळीच्या झाडांना पाणी दिले जायचे. परंतु, आता केळी उत्पादक ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. त्यामुळे उपलब्ध कमी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर होत आहे.
रोख पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते. पूर्वी केळीच्या व्यापाऱ्यांची मनमर्जी होती. परंतु, आता रॅपनिंग युनिट सुरू झाल्याने युनिट मालकांत केळी खरेदीसाठी स्वर्धा सुरू झाली आहे. उत्पादीत हा शेतमाल कमी पडत असल्याने युनिटमालक जिल्ह्याबाहेरून केळी खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या केळीची योग्य वेळी कटाई होते. शिवाय शेतकऱ्याला योग्य भाव मिळत आहे. केळी रॅपनिंग युनिट मध्ये बंद खोल्यांमध्ये मोठाले वातानुकूलीत यंत्र लावले जाते. कॅरेटमध्ये घडापासून वेगळ्या केलेल्या केळीच्या फण्या रचून ठेवल्या जातात. सदर बंद खोलीत केळी पिकविण्याचे तंत्रज्ञान विकसीत झाले. सेलू शहरात चार तर सेलडोह येथे एक असे तालुक्यात एकूण पाच रॅपनिंग युनिट आहेत. शेतकºयांसोबतच केळी विक्रेत्यांची सोय झाली आहे. या प्रक्रियेत पिकविलेली केळी चार-पाच दिवसांपर्यंत खराब होत नाही. केळी उत्पादकांना टिश्यु बेण्यावर अनुदान व विमा असायचा. तालुक्यातील केळी उत्पादन घटल्याने सुरूवातीला मिळणारा हा लाभ बंद झाला. तर इतर तालुक्यात ही योजना सुरू असल्याचे शेतकरी सांगतात.
केळीचे पीक १५ महिन्यांचे असून झाडाला वेळोवेळी पाणी देण्याची गरज असते. परंतु, यंदा पाहिले तसा पाऊस न झाल्याने शेतातील विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. शिवाय भारनियमनाचा फटकाही केळी उत्पादकांना सहन करावा लागत आहे. शासनाने सर्व बाजूंचा विचार करून सेलूच्या केळीला गतवैभव मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा, अशी मागणी शेतकºयांची आहे.
अनुदान अन् विम्याचे कवच नाहीच
टिश्यु केळीचे बेणे व इतर मशागतीवर इतर जिल्ह्यात अनुदान व विम्याचे कवच दिल्या जाते. मात्र त्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने येथील शेतकऱ्यांना लाभापासून वंचित रहावे लागते. केळी लागवडीचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना मिळतो दिलासा
पावसाळ्यात केळीचा पैसा हातात येतो. हाच पैसा शेतकऱ्यांना बियाणे, खते व मजुरांना चुकारे देण्याच्या कामात येतात. त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळतो. बाजारात चांगले भाव राहिल्यास दीड लाखाचे सरासरी उत्पन्न एका एकरात शेतकऱ्यांना घेता येते.

परराज्यातील व्यापाऱ्यांची पाठ
रॅपनिंग युनिट केळी उत्पादकांसह व्यापाºयांसाठी लाभ दायक ठरत आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे केळी खरेदी-विक्री करणारे परराज्याचे व्यापारी आता सेलूत येत नाहीत. तालुक्यातील वडगाव (कला), वडगाव (खुर्द), हिंगणी, रेहकी, सुरगाव, सुकळी (स्टे.), मोही, किन्ही, रमना, धानोली, कोटंबा, खडकी व बेलगाव आदी शेतशिवारात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा आहेत.
एका एकरात १,६५० झाडे
केळीची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर सुमारे पाच फुटाचे ठेवण्यात येते. एका एकरात १,६५० झाड या पद्धतीने लावता येतात. शिवाय ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचतही होते. योग्य वेळी झाडांना पाणी दिल्यास व योग्य निगा घेतल्यास अल्पावधीत पिकाची बऱ्यापैकी वाढ होते. इतकेच नव्हे तर समाधानकारक उत्पन्नही होत असल्याचे शेतकरी सांगतात.
योग्य भाव मिळतो
केळी उत्पादक केळीची लागवड करताना टिश्यु बेण्यांला पसंती दर्शवितात. चांगले उत्पादन, वजनदार घड व टिकावू पणा या बेण्यात राहत असल्याचे शेतकरी सांगतात. तालुक्यात एकूण पाच रॅपनिंग युनिट असून तेथूनच नागपूर, वर्धा, भिवापूर, पवनी, दिघोरी येथील व्यापारी केळीची खरेदी करतात. त्यामुळे शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळतो.

माझे वडील केळी उत्पादक शेतकरी व केळीचे व्यापारी होते. मी शेतीकडे लक्ष द्यायला लागलो. नवे तंत्रज्ञान वापरले. केळीच्या नव्या वाणामुळे उत्पन्न वाढते. सरकारने केळी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीचे सरंक्षण द्यावे. शिवाय कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा द्यावा. तालुक्यातील केळी रॅपनिंग युनिटमुळे माझा स्वत:चा शेतमाल व इतरही शेतकºयांचा माल आपणच खरेदी करून चार पैसे शेतकºयांना जास्त देतो.
- मनोज उर्फ पप्पू बोबडे, शेतकरी, वडगाव (कला.)

केळीला चांगले बाजारभाव आल्यास एकरी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र, वादळ आल्यास उभ्या पिकाचे नुकसान होते. इतकेच नव्हे तर आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. केळी पिकाला वादळाचा विमा, वन्यप्राण्याची नुकसान भरपाई व सिंचनासाठी नियमित विद्युत पुरवठा दिल्यास केळीच्या बागांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.
- नरेंद्र जाधव, केळी उत्पादक शेतकरी, मोही.

Web Title: Waiting for Selu's banalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.