ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By admin | Published: April 20, 2017 12:46 AM2017-04-20T00:46:56+5:302017-04-20T00:46:56+5:30

हिंगणघाटकडून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला

Two wheelers killed in a trailer crash | ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next

एक गंभीर जखमी : उड्डाण पुलावरील अपघात, वाहतुकीचा खोळंबा
वर्धा : हिंगणघाटकडून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना स्थानिक बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपूलावर मंगळवारी रात्री उशीरा घडली. जखमीवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सदर अपघातामुळे वर्धा-यवतमाळ, वर्धा-हिंगणघाट मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
रोहीत राजपाल मेश्राम (३३) रा. समतानगर असे मृतकाचे तर हेमंत प्रभुदास बुचुंडे (२८) असे गंभीर जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक समतानगर येथील हेमंत बुचुंडे व रोहीत मेश्राम हे एम.एच.३२/झेड. ६६२३ क्रमांकाच्या दुचाकीने समतानगर येथून वर्धा शहरात येत होते. दुचाकी बजाज चौकातील उड्डाणपुलावर आली असता हिंगणघाटकडून येणाऱ्या अज्ञात ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. अपघात होताच ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून वाहनासह यशस्वी पळ काढला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मिळेल त्या वाहनाचा उपयोग करीत जखमींना सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाकडे रवाना केले. गंभीर जखमी रोहीत मेश्राम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेची जि.प.सदस्य उमेश जिंदे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून तक्रारीवरून अज्ञात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ट्रेलर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Two wheelers killed in a trailer crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.