आदिवासी माना बांधवांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:55 PM2018-10-21T23:55:43+5:302018-10-21T23:56:12+5:30

अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली.

Tribal | आदिवासी माना बांधवांचा एल्गार

आदिवासी माना बांधवांचा एल्गार

Next
ठळक मुद्देअन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या आदिवासी माना समाज बांधवांच्या मोर्चाने दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्हाकचेरीवर धडक दिली. सदर मोर्चा न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर शहर पोलिसांनी अडविल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
संविधानातील ३४२ व्या कलमानुसार तसेच अनुसूचित जाती/जमाती सुधारणा कायदा १९६५ व १९६७ नुसार राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये १८ व्या क्रमांकावर माना जमातीची नोंद आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक ९५९/२००२ दि. ११ जुलै २००३ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. याचिका क्र. ५२७०/२००४ दि. ८ मार्च २००६ चा निर्णय माना जमातीच्या बाजूने असताना राज्य सरकारने माना जमातीचा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबंधी शासन निर्णय काढले होते.
त्यानुसार सदर जमातीला प्रमाणपत्रही प्राप्त होत होते. परंतु, त्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोली, नागपूर, अमरावती यांनी माना जमातीचे जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे प्रलंबित ठेवलेली आहेत. हे एक प्रकारे अन्याय करण्याचे षडयंत्रच असल्याचा आरोप करीत तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सदर मोर्चाने बजाज चौक, इतवारा चौक, डॉ. आंबेडकर पुतळा चौक मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
या मोर्चात माना आदिम जमात मंडळ व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच आदिवासी माना समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमचा लढा फक्त जात वैधतेसाठी
जात वैधता आमच्या हक्काची..., लोकशाही की ठोकशाही..., गुंज उठा है कोणा-कोणा जाग उठा है आदिवासी माना आदी घोषणा देत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी माना समाज बांधवांनी आमचा लढा फक्त जात वैधतेसाठी असा आवाज बुलंद केला. सदर आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

Web Title: Tribal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.