लघुउद्योगाच्या माध्यमातून महिला, तरुणांना काम देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:26 PM2019-06-06T22:26:03+5:302019-06-06T22:26:36+5:30

विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील महिला बचत गट व संस्था यांना लघु उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

Through small enterprises, women and youth will be able to work | लघुउद्योगाच्या माध्यमातून महिला, तरुणांना काम देणार

लघुउद्योगाच्या माध्यमातून महिला, तरुणांना काम देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले अतिलघु, लघु व मध्यम उपक्रम हे खाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आले आहे. या विभागाच्या माध्यमातून वर्धा लोकसभा मतदारसंघातील महिला बचत गट व संस्था यांना लघु उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आपण काम सुरू केले आहे, अशी माहिती वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी दिली. गुरुवारी त्यांनी वर्धा ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व सहकाऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला.
खा. तडस म्हणाले, वरूड येथील पंढरी सिंचन प्रकल्प मागील ३० वर्षांपासून रखडलेला आहे. केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या एक वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. या भागातील संत्रा उत्पादकांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. लोअर वर्धा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी पूर्ण व्हायला हवा होता. त्याच्या कामाला मागील पाच वर्षात गती देण्यात आली. आता तो पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. अप्पर वर्धा, आजनसरा हेही सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. याशिवाय पुलगाव-आर्वी या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. पुलगाव-आर्वी-तळेगाव-वरूड-आमला (मध्य प्रदेश)पर्यंत या रेल्वे मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा थेट मध्यप्रदेशाशी रेल्वेमार्गाने जोडला जाईल. याशिवाय सिंदी (रेल्वे) येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
वर्धा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देण्याची योजना आहे. घरासोबतच प्रत्येक घरी शुद्ध पिण्याचे पाणीही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन तयार केले जात आहे. शेतकºयांच्या हिताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टिकोनातून मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पंतप्रधान किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील एनडीए सरकारने दोन एकरापर्यंतच्या शेतकºयांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली होती. ती आता शेतकºयांना सरसकट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला प्रत्यक्ष दिसून येत होता. त्यावेळी विजयाची शंभर टक्के खात्री वाटावी, अशी परिस्थिती होती. २०१९ च्या निवडणुकीत मतदार संपूर्ण प्रचारादरम्यान बोलताना दिसला नाही. मात्र, मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सोपविण्याचा निर्णय घेतलेला होता. ते मतमोजणीनंतर दिसून आले. गतवेळेचे मताधिक्य कमी होईल, असे वाटत होते. मात्र, विजयाचे अंतर फार मोठे राहिले. यात तरुण व महिला मतदार यांचा मोठा सहभाग राहिला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जातीवर गेली नाही. लोकांनी उस्फूर्तपणे मतदान केले. मागील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देत लोकांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाची संघटन बांधणी अतिशय मजबूत आहे. प्रत्येकाला काय काम करायचे आहे, याचे नियोजन ठरलेले आहे. खासदारानेही किती काम दररोज केले पाहिजे, याचे नियोजन ठरवून दिले जाते. त्यामुळेच आपण विजयी होऊ शकलो, असेही खासदार रामदास तडस म्हणाले. व्यक्तिगत स्तरावर प्रत्येकांशी जनसंपर्क ठेवला. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक भूमिका घेतली. त्यामुळेच पुन्हा जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर लगेच भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या दृष्टिकोनातून बूथ प्रमुख, शक्तीप्रमुख आदी कामाला लागले आहेत. भाजपच्या केंद्रीय स्तरावरून २०२४ च्या निवडणुकीचे नियोजनही आमच्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्या दृष्टीने पुढील पाच वर्षे आम्ही काम करणार आहोत.

Web Title: Through small enterprises, women and youth will be able to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.