पोलिसांच्या ‘पीए’ चे वाहतुकीबाबत मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:57 PM2018-11-30T23:57:14+5:302018-11-30T23:58:17+5:30

शहरातील मुख्य मार्गावरील तसेच बाजारपेठेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील पाच मुख्य चौकामध्ये पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (पी.ए.) लावण्यात आली आहे.

Silence about police 'PA's traffic | पोलिसांच्या ‘पीए’ चे वाहतुकीबाबत मौन

पोलिसांच्या ‘पीए’ चे वाहतुकीबाबत मौन

googlenewsNext
ठळक मुद्देपब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम बंद : आता सूचना मिळेना

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील मुख्य मार्गावरील तसेच बाजारपेठेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील पाच मुख्य चौकामध्ये पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (पी.ए.) लावण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे ‘वाजताच भोंगा टवकारतात कान, सुरळीत होतात विस्कळीत वाहन’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, अल्पावधीच ही प्रणाली बंद पडल्याने आता वाहनचालकांना सूचना मिळणेही बंद झाले. परिणामी पुन्हा विस्कळीत वाहतूकीचा सामना करावा लागत आहे.
शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनांचीही संख्या त्या तुलनेत झपाट्याने वाढली आहे. पण, बाजारपेठेत वाहनतळाची कुठेही सुविधा नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली होती. तसेच शहरात दरम्यानच्या काळात बाजारपेठेत चोरट्यांनीही धुमाकूळ घातला होता. म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व चोरट्यावर वॉच ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख २२ चौकांमध्ये सिसीटिव्ही कॅमेरे व पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम लावण्यात आली. या प्रणालीव्दारे गुन्हेगारांसह वाहनचालकांच्या हालचाली टिपल्या जायच्या. वाहनचालकाने रस्त्यावर कुठेही वाहन उभे केले तर लगेच पिएच्या माध्यमातून सूचना मिळायच्या. सूचना मिळताच वाहनचालक आपले वाहन बाजुला लावत किंवा वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचून सूचनांचे पालन करण्याच भाग पाडायचे. पण दीड वर्षातच ही प्रणाली बंद पडल्याचे चित्र आहे. आता ना भोंगा वाजत ना वाहतुकीची कोंडी सुटत. पण, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला दुय्यम स्थान देऊन चालान फाडण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.
या अनोख्या प्रणालीबाबत...
शहरातील प्रमुख २२ चौकामध्ये ८० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यातील पाच चौकात पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम म्हणजेच पिए सिस्टीम बसविण्यात आली. याचे कनेक्शन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये आहे. त्यामुळे शहरातील चौकामध्ये वाहतुकीची कोंडी, रस्त्यावरील वाहनांची पार्कींग आदी बाबी दिसताच कंट्रोल रुममधून लगेच सूचना करुन त्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमव्दारे चौका-चौकात ऐकायला येतात. सूचना ऐकताच नागरिक किंवा वाहनचालक स्वत:च वर्तनात सुधारणा करतात, अशी ही प्रणाली सुरु करण्यात आली; पण अल्पावधीतच बंद पडल्याने कोटीचा निधी व्यर्थ गेल्याची चर्चा होत आहे. वरिष्ठांकडून दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात पाच ठिकाणी पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम लावण्यात आली आहे. यापैकी रेल्वे स्थानक चौकातील सिस्टीम तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. तसेच सराफा लाईनमधील व्यावसायिकांच्या तक्रारीमुळे तेथील सिस्टिमचा आवाज कमी करण्यात आला. इतर सर्व सिस्टिम सुरु असून शहरात ८० सीसीटिव्हीचा वॉच आहे. कंट्रोल रुममध्ये सात कर्मचारी कार्यरत आहे.
- सारंग बोंपल्लीवार, पोलीस उपनिरिक्षक, वर्धा.

जुनेच दिवस परत आले...
न.प. व पोलीस प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे लाखो रुपये खर्चुन लावलेले सिग्नल शोभेचे ठरले आहे. शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता स्मार्ट शहर प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी १ कोटी ८० लाखाचा निधी पोलीस प्रशासनाला उपलब्ध करुन दिला. या निधीतून शहरातील २२ चौकात ८० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यातील पाच चौकात सीसीटिव्ही सोबतच पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम अंतर्गत भोंगे लावण्यात आले. या आधारे हालचाली टिपून भोंग्याव्दारे सूचना दिल्या जायच्या. यामुळे वाहतुकीला शिस्त लागली होती. सीसीटीव्ही सुरु अन् भोंग्याचा आवाज बंद आहे.

Web Title: Silence about police 'PA's traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस