दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:05 PM2019-05-08T14:05:58+5:302019-05-08T14:08:54+5:30

मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे.

severity of Drought and management | दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’

दुष्काळाची ‘भीषणता’, उपाययोजनांची ‘विषमता’

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळाचे सावट चारा-पाण्याअभावी पावणे पाच लाख जनावरांची होरपळ

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षी झालेले अल्प पर्जन्यमान आणि जलाशयाच्या गाळ उपस्याकडे केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात सध्या कधी नव्हे इतक्या दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून निवारणार्थ प्रशासनाने आखलेल्या उपाययोजना गावापर्यंत पोहोचविण्याकरिता यंत्रणा कुचकामी ठरत आहे. परिणामी प्रशासनाच्या कागदोपत्री जिल्ह्यात सुकाळ दिसून येत असला तरी प्रत्यक्षात मात्र भिषणता कायम आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी ७०.४५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. नद्यांना एकही मोठा पुर गेला नसल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरुवात झाली असून मे महिन्या पहिल्या आठवडयात पाणीकोंडीचा अनुभव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या जलाशयातही सरासरी १७ टक्केच पाणी शिल्लक असल्याने पाणीपुरवठाही प्रभावित झाला आहे. शहरांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठाही ठप्प असल्याने नागरिकांना दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. नागरिकांना पिण्याकरिता तसेच जनावरांकरिताही पाण्याची गरज असल्याने पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.
समृद्धी महामार्ग आणि नागपूर- तुळजापूर महामार्गासह राष्ट्रीय महामार्गाचे आणि जिल्ह्यांतर्गत मार्गाचे सिमेंटीकरणही जोरात असल्याने त्याचाही पाणी टंचाईवर प्रभाव पडत आहे. शेतातील विहिरीतून १ हजार रुपये टँकरप्रमाणे मार्गांच्या कामासाठी पाणी खरेदी केले जायचे त्याचे दरही आता वाढले आहे. तसेच पाण्याची पातळीही खोल जात असल्याने गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सार्वजनिक विहिरी, हातपंप यांनाही या दुष्काळी परिस्थितीत अच्छे दिन आले असले तरी भूर्गभातच पाणी नसल्याने तेही कोरडेठाक झाले आहे. तसेच शेत शिवारातील विहिरी आणि नालेही आटल्याने शेतकऱ्यांचे सिंचन बंद आहे. त्यामुळे हिरवा आणि वाळल्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. सोबतच पिण्याचाही प्रश्न गंभीर असल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील बैल, गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या असे एकूण ४ लाख ८५ हजार १७९ जनावरांची होरपळ होत आहे. या टंचाईच्या दिवसात डौलदार दिसणारी जनावरे रोडके झाले असून चाऱ्याअभावी त्यांचे पोट खपाटीला गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागाची जनवारे अल्पदरात विकायला सुरुवात केली आहे. तर काहींनी जनावारांना चार महिन्यांकरिता दुसऱ्या गावी पाठविले आहे. आधी अल्प उत्पादन तर आता दुष्काळामुळे गोधन विकावे लागत असल्याने गोठ्यातील जनावरांचा खुटा एकटा पडला आहे. ही भवायह परिस्थिती पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रृ तरळताना दिसतात.

पारगव्हाण या गावापासून दहा कि.मी.अंतरापर्यंत पाण्याची कुठलीही सोय नाही. त्यामुळे गावकऱ्यांना हे अंतर पार करुनच पाणी मिळवावे लागते. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. घरच्या वापराकरिता आणि जनवारांकरिता पाणी आता विकत घ्यावे लागत आहे. काहींना नाईलाजास्तव चांगली जनावरे विकावी लागत आहे.
ज्ञानेश्वर बेले, ग्रामस्थ, पारगव्हाण, आष्टी (श.)

आमचा पिढीजात दुग्धव्यवसाय असून यावरच परिवाराचा उदनिर्वाह चालतो. आतापर्यंत यावर्षीसारखा दुष्काळ बघितला नाही. माझ्याकडे ११ गायी,१८ म्हशी असून त्यांच्याकरिता २ ते ३ कि.मी. वरुन पाणी आणावे लागते. सोबतच चाऱ्याचीही टंचाई असल्याने आता हा पिढीजात व्यवसाय अडचणीत आला आहे. आता कसे जगावे, कोणता व्यवसाय करावा हा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
महादेव घोडे, गोपालक, सेलगाव(उमाटे), कारंजा (घा.)

Web Title: severity of Drought and management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.