पालिकेत सभापतीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:47 PM2018-01-03T23:47:03+5:302018-01-03T23:47:14+5:30

जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमध्ये बुधवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. देवळी नगर पालिकेमध्ये जुनेच सभापती पुन्हा कायम करण्यात आले तर इतर नगर पालिकांमध्ये मात्र नवीन चेहऱ्यांना सभापती पदाची संधी देण्यात आली.

Opportunity for newcomers to be elected in the election | पालिकेत सभापतीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी

पालिकेत सभापतीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी

Next
ठळक मुद्देजुन्यांचा पत्ता कट : देवळीत मात्र जुनेच चेहरे कायम; वर्धेतही झाला बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमध्ये बुधवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. देवळी नगर पालिकेमध्ये जुनेच सभापती पुन्हा कायम करण्यात आले तर इतर नगर पालिकांमध्ये मात्र नवीन चेहऱ्यांना सभापती पदाची संधी देण्यात आली.
वर्धा नगर पालिकेतील पाच सभापतींची निवड करण्यात आली. ही निवडणूक नगर पालिकेच्या सभागृहात पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी स्मीता पाटील यांनी काम पाहिले.
नगर पालिकेच्या बांधकाम सभापती पदावर नौशाद शेख यांची वर्णी लागली. यापूर्वी निलेश किटे यांच्याकडे हे पद होते. पाणी पुरवठा संदीप उर्फ गोपी त्रिवेदी, महिला व बालकल्याण रेणुका शरद आडे, आरोग्य गुंजन मिसाळ, शिक्षण विजय उईके तर महिला बालकल्याण उपसभापती पदावर रंजना सुरेश पट्टेवार यांची निवड झाली. निवडणुकीला बुधवारी दुपारी १ वाजता सुरूवात झाली. सुमारे दोन तास निवडणूक प्रक्रिया सुरू होती. स्थायी समितीत सुरेश आहुजा, सचिन पारधे व प्रदीप जग्ग्यासी यांची निवड करण्यात आली. निवडणुकीला नगराध्यक्ष वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते. निवडणुकीनंतर वर्णी लागलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नगर पालिकेच्या परिसरात फटाके फोडून जल्लोष केला.
न.प. स्थायी व विषय समित्यांची निवडणूक अविरोध
हिंगणघाट - नगर पालिकेच्या स्थायी व विषय समित्यांची निवडणूक अविरोध पार पडली. सर्व समित्यांवर भाजपचा वरचष्मा कायम राहिला. न.प. सभागृहात दुपारी १२ वाजता विशेष सभा घेण्यात आली. सर्र्व सदस्यांची निवड अविरोध झाली. बांधकाम समिती सभापतीपदी चंद्रकांत मावणे, पाणी पुरवठा राहुल शेटे, आरोग्य नरेश युवनाथे, शिक्षण प्रा.डॉ. उमेश तुळसकर, महिला व बाल कल्याण वैशाली सुरकार, उपसभापती धनश्री वरघणे, स्थायी समिती सदस्य शीतल खंदार, भास्कर ठवरे व आफताब खान राष्ट्रवादी काँगे्रस यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी काम पाहिले. त्यांना मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी सहकार्य केले. आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, भाजपा महामंत्री किशोर दिघे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, छाया सातपुते, दादा देशकरी, अंकुश ठाकूर आदींनी नवनियुक्त पदाधिकाºयांचे अभिनंदन केले.
देवळीला न.प. स्थायी समिती सदस्यांची फेरनिवड
देवळी - न.प. सभागृहातील विशेष सभेत स्थायी व विषय समित्यांचे गठण करण्यात आले. सत्तारूढ भाजपाकडे न.प. सदस्यांचे बहुमत असल्याने खा. रामदास तडस यांच्या गटाच्या स्थायी समिती सदस्यांची फेरनिवड करण्यात आली. यात न.प. उपाध्यक्षांकडे पाणी पुरवठा व जलनि:स्सारण समिती सभापती पदाचा पदभार देण्यात आला. शिक्षण कल्पना हरिदास ढोक, बांधकाम सारिका लाकडे, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सुनीता बकाणे व महिला व बालकल्याण सुनीता ताडाम यांची वर्णी लागली. प्रत्येक विषय समिती सभापतींसह चार न.प. सदस्यासहित स्थायी समिती गठित करण्यात आली. यात भाजपाचे तीन सदस्य व काँग्रेसचा एक सदस्य घेण्यात आला. स्थायी समिती सदस्यासाठी काँगेसचे न.प. सदस्य पवन महाजन यांनी नामांकन दाखल केले होते; पण संख्याबळाअभावी ते अपात्र ठरविण्यात आले. सभेचे पीठासीत अधिकारी म्हणून तहसीलदार तेजस्विनी जाधव व सहअधिकारी म्हणून न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी काम पाहिले. नवनियुक्त सभापतींचे नगराध्यक्ष सुचिता मडावी, भाजपाचे गटनेता शोभा तडस व न.प. सदस्यांचे स्वागत केले. देवळी नगर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. खा. तडस यांच्या गटाचेच नगरसेवक पुन्हा सभापती म्हणून विराजमान झाले आहेत. समित्यांवरही भाजपाच्याच सदस्यांची वर्णी लागली आहे. यामुळे भाजपाचा वरचष्मा येथेही कायमच राहिला आहे. जिल्ह्यात सहा नगर पालिकांच्या सभापती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून आले.
आर्वीत पालिकेत चेहरेबदल
आर्वी - नगर पालिकेतील विषय समित्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने आज नगर पालिका सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेत तथा नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यात आर्वी पालिकेच्या सहा विषय समित्यांवर नवनियुक्त नगरसेवकांची सभापती पदावर निवड करण्यात आली. निवड झालेल्या नगरसेवकांत बांधकाम सभापती अजय करकमवार, महिला बालकल्याण सभापतींपदी संगीता डोंगरे, पाणीपुरवठा कांता कसर, नियोजन समिती सभापतीपदी मिथून बारबैले, आरोग्य सभापतीपदी प्रकाश गुल्हाने आदींची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून सुनील बाजपेयी, प्रशांत ठाकूर आणि नरसिंग सारसर आदींची निवड करण्यात आली आहे. यावेळी सभागृहात भाजपाचे आर्वी विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, तालुका प्रमुख मिलिंद हिवाळे, नंदू थोरात यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सिंदी (रेल्वे) पालिकेतही निवडणूक
सिंदी (रेल्वे) - येथील नगर पालिकेत सभापतीची निवडणूक आज घेण्यात आली. बांधकाम समिती सभापतीपदी विलास तळवेकर, शिक्षण वंदना नरेंद्र सेलूकर, महिला व बालकल्याण वनीता मनोहर मदनकर, उपसभापती चंदा बोरकर यांची निवड करण्यात आली. यातील वनीता मदनकर यांची फेरनिवड झाली आहे. नगर परिषद उपाध्यक्षांकडे पाणी पुरवठा व आरोग्य सभापती पद असून त्यांनी पदाचा राजीनामा न दिल्याने आज ही निवड झाली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी रमन जैन, सहायक म्हणून रवींद्र ढाके यांनी काम पाहिले. या निवड प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्षांची उपस्थिती होती. पालिकेत काँग्रेसचे दोन तर भाजपा व मित्र पक्षाचे १५ सदस्य आहेत.
पुलगाव पालिकेत अपक्ष २, बसपा व भाजप प्रत्येकी एक
पुलगाव - नगर परिषदेत भाजपाचे वर्चस्व असून नगराध्यक्षासह भाजपा ९, अपक्ष ३, बसपा ५, काँग्रेस २ असे १९ सदस्य आहे. यात भाजपासोबत २ अपक्ष व १ बसपा असे १२ सदस्य तर बसपाचे ४, काँग्रेस २ व अपक्ष १ असे ७ नगरसेवकांचा गट असतांनाही विषय समित्यांवर अपक्षांचाच वरचष्मा राहिला. आज दुपारी पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, समुद्रपूर नगर पंचायतच्या मुख्याधिकारी स्वालिया मालगावे यांच्या उपस्थितीत विशेष समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात अपक्ष पूनम सावरकर यांची पुन्हा बांधकाम सभापतीपदी वर्णी लागली. अपक्ष गौरव दांडेकर यांची स्वच्छता व आरोग्य सभापती, बसपाच्या शोभा ठवकर यांची महिला व बाल कल्याण सभापती तर भाजपाचे नारायण भेंडारकर यांची पाणी पुरवठा सभापतीपदी निवड झाली. शिक्षण सभापती पदावर भाजपाचे न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

Web Title: Opportunity for newcomers to be elected in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.