विजय भटकर : पर्यावरणप्रेमींसोबत चर्चा
हिंगणघाट : आपण विज्ञानाची कास पकडली आहे. विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले. पण पारंपरिक भारतीय जीवनपद्धतीचा आपल्याला विसर पडत आहे. आदर्श असलेली भारतीय जीवनशैली आपण नव्याने स्वीकारू तेव्हाच आरोग्यमय जीवन जगू शकतो. भारतात शेती सेंद्रीय होईल, घरोघरी गाय पाळल्या जाईल तेव्हाच भारत खऱ्या अथार्ने सुजलाम होईल. याकरिता तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुपर कॉम्पुटरचे जनक व शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.
शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी पर्यावरणप्रेमी संघटनांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी स्थानिक पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेचे कार्यकर्ते, प्रा. अभिजित डाखोरे, आशिष भोयर, राजू कोंडावार, नितीन शिंगरु, ज्ञानेश चौधरी, प्रा. घुले, प्रा. अमृत लोणारे, शशांक हिवरकर यांची उपस्थिती होती.
शास्त्रज्ञ भटकर यांनी पर्यावरण व जलसंवर्धन उपक्रमाची चौकशी करुन संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. देशात पाणी आणि जंगले वाचविण्यासाठी जे कार्य होत ते आहे त्याची सर्वाथाने गरज आहे. महासंगणकाने देशात झालेली क्रांती आणि परिणाम याविषयी भटकर यांनी विविध उदाहरणातून माहिती दिली. संगणकाने शहरच नाही तर ग्रामीण भाग जोडले आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचे भवितव्य उज्वल राहील. यात तरुणांनी झोकून कार्य करण्याचा सल्ला त्यांनी दिला.(स्थानिक प्रतिनिधी)