दोन हॉटेल्सला सात हजारांचा दंड : नियमांना बगल देणे भोवले
वर्धा : शहरातील बऱ्याच हॉटेल्सकडून त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते. त्याचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची ओरड झाल्याने पालिकेच्यावतीने अशा हॉटेल्स मालकांना नोटीसी बजावणे सुरू केले आहे. शिवाय त्यांच्या हॉटेल्सची तपासणी करण्याची धडक मोहिमही राबविण्यात येत आहे. याकरिता पालिकेच्यावतीने एक पथक तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून कारवाई करणे सुरू झाले आहे.
शहरातील बरेच हॉटेल्स रात्री सुरू राहत असल्याने हे पथक याच काळात हॉटेल्सची तपासणी करणार असल्याचे समजते. या निर्णयानुसार या पथाकाने सोमवारी रात्री वर्धेत हॉटेल सालसा व सावजी या दोन ठिकाणी अचानक धडक दिली. या धडकेत दोनही हॉटेल्समध्ये अनेक त्रुट्या असल्याचे दिसून आले. या दोन्ही हॉटेल्स चालकांकडे पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र नसल्याचे उघड झाले. शिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही नव्हते. या व्यतिरिक्त दोन्ही हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांना व येथे अन्न शिजविण्याकरिता असलेल्या पाण्याबाबत आवश्यक स्वच्छता नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या हॉटेल्स मालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. यातील हॉटेल सालसाला पाच हजार रुपये तर हॉटेल सावजीच्या संचालकाला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
वर्धा शहरातील इतर हॉटेल्सची तपासणी करण्याकरिता पालिकेने सात कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. हे पथक रात्री ८ वाजताच्या सुमारास या कामाला निघणार आहे. दिवसभर पालिकेतील कामे आटोपून सायंकाळी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. या काळात वर्धेतील सर्वच हॉटेल्सची तपासणी होणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

पालिकेची सात कर्मचाऱ्यांची चमू तयार
हॉटल मालकांकडून होत असलेल्या अनागोंदीमुळे शहरात वाढत असलेल्या अस्वच्छतेवर आळा घालण्याकरिता पालिकेच्यावतीने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून सात कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करणे सुरू झाले आहे. या पथकाला मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे यांचे मार्गदर्शन असून त्यात प्रशासकीय अघिकारी अजय बागरे, अशोक ठाकूर, चंद्रकांत देव, राजू निखाडे, संदीप नाहारकर, सुमित भोसले, विशाल सोमवंशी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोजच प्रत्येक हॉटलमध्ये कारवाई करण्यात येणार आहे.