वृक्ष लागवडीसाठी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 09:57 PM2018-06-13T21:57:00+5:302018-06-13T21:57:00+5:30

यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे.

Lumbering | वृक्ष लागवडीसाठी कसली कंबर

वृक्ष लागवडीसाठी कसली कंबर

Next
ठळक मुद्दे१४.८९ लाख खड्डे खोदले : ग्रीन आर्मीसह सामाजिक संघटनांचे घेणार सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले असून सदर उद्दीष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने सध्या कंबर कसल्याचे दिसते. आतापर्यंत जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १४.८९ लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये १ ते ३१ जुलै या कालावधीत रोपटे लावण्यात येणार आहेत.
गत दोन वर्षांपासून हरित महाराष्ट्र या हेतूने पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्यात येते आहे. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या स्वयंसेवकांसह काही सामाजिक संघटनांचेही सहकार्य घेतल्या जात आहे. यंदा सदर उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या वन विभागासह जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. १ जुलै ते ३१ जुलै या नियोजित वेळेत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षरोपण व्हावे यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात १४ लाख ८९ हजार ६२९ खड्डे खोदण्यात आले आहेत. उर्वरित खड्डे कसे झटपट खोदता येतील यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.
११.१० लाख खड्डे खोदण्याचे काम युद्धपातळीवर
हरित वर्धा पर्यायाने हरित महाराष्ट्र या हेतूने १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदल्या जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४ लाख ८९ हजार ६२९ खड्डे खोदण्यात आले असून उर्वरित ११ लाख १० हजार ३७१ खड्डे खोदण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात वन विभागाने आघाडी घेतली आहे.
जनजागृतीपर दिंडीचे होणार आगमण
वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देणारी वृक्ष दिंडी आ. अनिल सोले यांच्या नेतृत्त्वात गोंदीया जिल्ह्यातील चिचगड येथून काढण्यात येणार आहे. ही वृक्ष दिंडी व त्या दिडीत सहभागी चित्ररथ २ जुलैला वर्धेत दाखल होणार आहे. सदर वृक्ष दिंडीचा समारोप नागपूर येथे होणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन विभागांना उपलब्ध करून दिली जागा
हरित वर्धा या उद्देशाने वृक्ष लागवडीसाठी वन विभागाने त्यांच्या मालकीची जागा ग्रामीण पाणी पुरवठा आणि पाटबंधारे विभागाला उपलब्ध करून दिली आहे. पाटबंधारे विभागाला वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथे २० हेक्टर तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कारंजा तालुक्यात १५ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणांवर पावसाळ्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
५० ठिकाण हिरवे करण्याचा मानस
जिल्ह्यातील ५० ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून सदर परिसर हरितमय करण्याचा मानस यंदा जिल्हा प्रशासनाचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. आतापर्यंत त्यासाठी आजनसरा येथील आॅक्सीजन पार्कसह सुमारे चार ठिकाण निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मागेल त्याला मिळणार रोपटे
वृक्ष लागवड या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ हा उद्देश यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील वनविभाग उराशी बाळगून आहे. मागणी करणाऱ्या प्रत्येकाला अल्प मोबदल्यात वन विभाग वृक्षारोपणासाठी विविध प्रजातींची रोपटे उपलब्ध करून देणार आहेत.

Web Title: Lumbering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.