The hospital receives lethality | रुग्णालयाला लेटलतिफीचे ग्रहण

ठळक मुद्देवरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी : मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : ग्रामीण रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आरोग्य केंद्र आणि रुग्णालय सुसज्ज करण्यात येत आहे. मात्र येथे कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार वाढीस लागला आहे. येथे कार्यरत कर्मचारी, अधिकाऱ्यांची लेटलतिफी नित्याची बाब झाली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी असतानाही रुग्णांची तपासणी करण्याकरिता वैद्यकीय अधिकारी नसणे. तर कधी बदली अधिकारी येण्यापूर्वीच रुग्णालय सोडणे, रुग्णांची निट तपासणी करणे यामुळे रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. रुग्णालयाची मुख्य जबाबदारी असलेले कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. अधिकारीच १२ नंतर रुग्णालयात येत असेल तर रुग्णांची ताटकळ होणारच. हा प्रकार गुरुवारला पाहायला मिळाला. बाह्य रुग्ण विभागाचा नोंदणी कक्ष वेळेवर सुरू झाला असला तरी ११ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने एन.सी.डी. क्लिनिक विभागात कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षेत रुग्ण तपासणी केली. येथे मधुमेह व रक्तदाबाची तपासणी होते. त्यामुळे मधुमेह तपासणीसाठी रुग्णांना लांबलचक रांगेत उभे राहावे लागले. घोराड ग्रामपंचायतचे सदस्य त्रिशुल राऊत हे याचवेळी रुग्णालयात गेले असता त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. ग्रामीण रुग्णालयात आलेल्या बहुतांश रुग्णांना अनेकदा सेवाग्राम किंवा सावंगीला पाठविले जाते. रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देऊन कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे गरजेचे आहे.
रुग्णांची होते ताटकळ
रुग्ण कल्याण समिती या रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी नेमली तरी यात अधिकारीच सदस्य आहे. समितीची सभा नाममात्र होत असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेटलतिफमुळे येथील सहाय्यक वैद्यकीय अधिक्षकांना अनेकदा रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे प्रकार घडले. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
एन.सी.डी. क्लिनिकची वेळ बदलवा
मधुमेह व रक्तदाबाच्या तपासणीसाठी एन.सी.डी. क्लिनिकमध्ये तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. हे क्लिनिक १० वाजता सुरू होते. त्यामुळे वेळेत बदल करून सकाळी ८ वाजता सुरू केल्यास रुग्णांना गावाला जाणे सोयीचे ठरू शकते.
दोन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी
बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची वाढलेली गर्दी पाहता सकाळपाळीत रुग्ण तपासणीकरिता येथे दोन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी आहे. एकच अधिकारीआसल्याने रुग्णांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. यात वेळेचाही अपव्यय होत असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक करतता.