अटीतटीच्या लढतीत गट आला; पण सत्ता गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:14 PM2018-04-07T23:14:38+5:302018-04-07T23:14:38+5:30

जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचे निधन झाल्याने गट व गणात प्रत्येकी एक पद रिक्त झाले होते.

The group got into the match of the terms; But it has gone to power | अटीतटीच्या लढतीत गट आला; पण सत्ता गेली

अटीतटीच्या लढतीत गट आला; पण सत्ता गेली

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक : आजंती गणात राष्ट्रवादी काँग्रेसला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/घोराड : जिल्हा परिषद तथा पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचे निधन झाल्याने गट व गणात प्रत्येकी एक पद रिक्त झाले होते. यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले असून आज मतमोजणी पार पडली. यात गटाची जागा भाजपाला राखता आली असली तरी गण मात्र हातून निसटला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवाराने आजंती गणात विजय प्राप्त केल्याने तेथील सत्तेचे समीकरणच बदलले आहे.
हमदापूर जि.प. गटाचे भाजपाचे सदस्य सुनील शेंडे यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जि.प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. भाजपाने त्यांचे भाऊ किशोर शेंडे यांना उमेदवारी दिली. यामुळे निवडणुकीचा निकाल एकतर्फी राहील, असा अंदाज वर्तविला जात होता; पण ही निवडणूक अटीतटीची झाली.
शनिवारी निकाल जाहीर करण्यात आला. यात भाजपाचे किशोर शेंडे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे जगन्नाथ राऊत यांचा २६८ मतांनी पराभव केला. भाजपा उमेदवाराचा झालेला विजय व काँग्रेस उमेदवाराच्या मतांमधील अंतर पाहता मतदारांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर विचारमंथनाची वेळ आणल्याचेच दिसून येत आहे. भाजपाचे किशोर शेंडे यांना ३ हजार ६६२ तर काँग्रेसचे जगन्नाथ राऊत यांना ३ हजार ३९४, मते मिळालीत. शिवसेनेचे शशिकांत देवतळे यांना १ हजार १०२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे घनश्याम डाखोळे यांना ९८० मते मिळालीत.
हा जि.प. गट हिंगणघाट विधानसभा मतदार संघात येत असल्याने निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजपाला गट राखता आला असला तरी गण हातून निसटल्याने एका हिंगणघाट पंचायत समितीमधील सत्ता गमवावी लागणार असल्याचेच दिसून येत आहे.
भाजप उमेदवाराचा ६४ मतांनी निसटता पराभव
हिंगणघाट - स्थानिक पंचायत समिती अंतर्गत आजंती पंचायत समिती गणाच्या रिक्त सदस्यपदाची पोटनिवडणूक अटीतळीची तथा प्रतिष्ठेची ठरली. यात अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संभा आनंदराव देवढे यांनी ६४ मतांनी बाजी मारली. ताब्यातील ही जागा या पोट निवडणुकीत गमविल्याने भाजपाला मोठा हादरा बसला आहे.
भाजपचे आजंती सर्कलचे पं.स. सदस्य तथा उपसभापती धनंजय रिठे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पं.स. सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत चार उमेदवार रिंगणात होते. या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. आज तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. यात विजयी संभा देवढे यांना एकूण २ हजार १२० मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार भास्कर बोबडे यांचा ६४ मतांनी पराभव केला. त्यांना २ हजार ०५६ मते मिळाली. अन्य दोन अपक्ष उमेदवार सुनील काळे यांना ५१७ तर राजेश वसंतराव धोटे यांना ४३९ मते मिळालीत. ५४ मतदारांनी नोटाला पसंती दिली.
या निवडणुकीत ७ हजार ९४९ पैकी ५ हजार १८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान ६५.२७ टक्के झाले होते. राकाँचे संभा देवढे विजयी झाल्यानंतर तहसील कार्यालयातून कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून माजी आमदार राजू तिमांडे यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष केला. नंदा तिमांडे यांनी औक्षवण केले. त्यानंतर ही विजयी मिरवणूक बाजार समिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर समारोपीय सभा घेण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कोठारी, पं.स.चे माजी सभापती संजय तपासे, राजेश कोचर, सतीश वानखडे, संजय घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. सभेला इंटकचे सचिव आफताब खान, नगरसेवक धनंजय बकाणे, प्रकाश राऊत तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाधान शेडगे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सचिन यादव यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
विरोधी गटाचे संख्याबळ समीकरण बदलणार
पोटनिवडणुकीच्या निकालाने हिंगणघाट पंचायत समितीमधील एकूण १४ सदस्यांपैकी सत्तारूढ भाजपाची सदस्यसंख्या सातवरून आता सहावर आली तर विरोधकांचे संख्याबळ आता सातवरून आठवर पोहोचले आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे प्रत्येकी तीन तर शिवसेना व स्वभाप यांचे संख्याबळ प्रत्येकी एक राहणार आहे. यामुळे पं.स.च्या रिक्त उपसभापती पदासाठी भाजप विरोधकांची दावेदारी वाढली आहे.

Web Title: The group got into the match of the terms; But it has gone to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.