आधी पंक्चर केली कार, नंतर मारहाण करून लुटले दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 08:39 PM2022-04-06T20:39:51+5:302022-04-06T20:41:42+5:30

Wardha News कारचे चाक पंक्चर करून कार थांबवून कारमधील सदस्यांना मारहाण करीत रोख रकमेसह दागदागिने जबरीने हिसकावून लुटमार केल्याची घटना मंगळवारी ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात घडली.

First punctured car, then beaten and robbed of jewelry | आधी पंक्चर केली कार, नंतर मारहाण करून लुटले दागिने

आधी पंक्चर केली कार, नंतर मारहाण करून लुटले दागिने

Next
ठळक मुद्देतळेगावच्या सत्याग्रही घाटातील घटनाभंडाऱ्याच्या परिवारावर धाडसी हल्ला

 

वर्धा : शेगाव येथून भंडाऱ्याकडे कारने जाणाऱ्या कारचे चाक पंक्चर करून कार थांबवून कारमधील सदस्यांना मारहाण करीत त्यांच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह दागदागिने जबरीने हिसकावून लुटमार केल्याची घटना मंगळवारी ५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटात घडली. या घटनेने चांगलीच खळबळ माजली.

उमेश भय्यालाल उरकुडे रा. भंडारा रोड, सुभाष वाॅर्ड, वरठी, ता. मोहाडी जि. भंडारा हे पत्नी चंदा उरकुडे, मामी अलका हरसे, वहिनी रेवता उरकुडे, भाचा वैभव कुरवे तसेच चालक विशाल नेवारे हे एम.एच. ३६ एजी. ६६३१ क्रमांकाच्या कारने शेगाव येथे नातेवाईकाच्या मयतीला गेले होते. अंत्यविधी आटोपून संपूर्ण कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेगावहून भंडाऱ्याला जाण्यासाठी निघाले. मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटाच्या समोर अचानक कारचा समोरील टायर फुटल्याचा आवाज आल्याने कार रस्त्याकडेला थांबविली. चालक विशाल आणि वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३० ते ३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. त्यांनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हल्ला चढवून दोन्ही हातांवर उजव्या पायाच्या गुडघ्याखाली तसेच पाठीवर लाठीने मारहाण करून जखमी केले.

कारमधील महिलांना दागिन्यांची मागणी करून शिवीगाळ करीत मारहाण केली. महिलांसह पुरुषांच्या अंगावरील एकूण ५५ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदी आणि ११ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला. त्याच रात्री अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेड फाट्या वळ लुटमारीची घटना घडली असून तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीस लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, याची कुठलीही नोंद नाही. एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात टोळीकडून वाटमारीच्या घटना घडल्याने अमरावती व वर्धा येथील गुन्हे अन्वेशन शाखेची चमू तसेच तळेगाव पोलीस दरोडेखोरांच्या मागावर असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

महत्त्वाचे दस्तऐवजही हिसकावून नेले

उरकुडे कुटुंबीय कारमध्ये असताना अचानक झालेल्या धाडसी हल्ल्यात वाटमारी करणाऱ्यांनी कपड्याच्या बॅग,महत्त्वाचे डॉक्युमेन्ट तसेच वाहनाची कागदपत्रेही हिसकावून नेली. इतकेच नव्हेतर मयत जावई यांची वैद्यकीय उपचाराची फाईलही सोबत घेऊन गेले. दागिने जबरीने नेताना त्यांनी कटरचा वापर केला. कुठल्यातरी वस्तूचा वापर करून कारचा टायर पंक्चर करून हा नियोजित हल्ला दरोडेखोरांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१५ मिनिटांपूर्वीही कारचालकास लुटले

सत्याग्रही घाटात ही थरारक घटना घडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी दरोडेखोरांनी याच परिसरात नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एम.एच. १९ बी.यू. २६१४ क्रमांकाच्या कारचालक राहुल प्रेमदास तायडे, रा. अमरावती यालाही अडवून मारहाण करीत त्याच्याकडून जबरीने २ हजार रुपये हिसकावून नेले.

 

Web Title: First punctured car, then beaten and robbed of jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.