विदर्भात कमी मताधिक्याच्या विजयाने भाजपला मोठा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 05:50 PM2018-05-25T17:50:00+5:302018-05-25T17:56:44+5:30

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपला केवळ ३७ मतांनी विजय मिळाला. या कमी मताधिक्क्याच्या विजयाने भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

BJP gets big push in Vidarbha by winning lesser votes | विदर्भात कमी मताधिक्याच्या विजयाने भाजपला मोठा धक्का

विदर्भात कमी मताधिक्याच्या विजयाने भाजपला मोठा धक्का

Next
ठळक मुद्देअर्थकारणात भाजप पिछाडीवरकाँग्रेस उमेदवारांची नियोजनात सरशी

अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजपला केवळ ३७ मतांनी विजय मिळाला. या कमी मताधिक्क्याच्या विजयाने भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचा एकहाती विजय होईल अशी अपेक्षा असताना काँग्रेसच्या उमेदवाराने कमी संसाधनाच्या बळावर गाठलेला मतांचा टप्पा अनेकांना आश्चर्यचकीत करणारा आहे. एकट्या वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यात ३०६ मतदार होते. त्यामध्ये भाजपकडे १८२ काँग्रेसकडे ६६ कडे, राकाँकडे २०, बसपाकडे १० शिवसेनेकडे ४ अपक्ष २४ असे संख्याबळ होते. या संख्याबळाच्या भरोशावर भाजपची मदार होती. परंतु भाजपने संघटनेतील कार्यकर्ता म्हणून डॉ. रामदास आंबटकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. भाजप स्वतच्या मतासह ६०० मतापर्यंत मजल मारेल असे नेते सांगत होते. मात्र भारतीय जनता पक्षाचे कुठलेही नियोजन या निवडणुकीत दिसले नाही. मतदारांना बाहेरगावी फिरण्यासाठी नेतांनाही प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जी बस पोहोचली तिला २४ तासापेक्षा जास्त अवधी लागला. तसेच ज्यांच्याकडे जिल्ह्याच्या नियोजनाची जबाबदारी होती. त्यांनी ३० रूम बुक केल्या असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात सात ते नऊच रूम तेथे बुकींग असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथेही भाजप मतदारांना त्रास सहन करावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूकीत सर्वात महत्त्वाचे असलेले अर्थकारण भाजपकडून फारच उशिरा करण्यात आले. त्यातही सर्र्वांच्या समक्ष आपल्या मतदारांची रांग लावून त्यांना पॉकीट सुपूर्द करण्यात आले. असा अपमानास्पद सारा प्रसंग मतदारांना अनुभवावा लागला. त्यामुळे मतदारांना आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविषयी प्रचंड चिड निर्माण झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी या निवडणूकीत उमेदवाराला व पक्षालाही आसमान दाखवून दिले. दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांनी आपले नियोजन व्यवस्थित केले होते. मात्र चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांच्यावर आमदार विजय वडेट्टीवार गटाचे उमेदवार असा ठप्पा लागला. त्यामुळे वडेट्टीवार विरोधक एकत्रित आले. त्यांनी सराफ विजयी झाले तर वडेट्टीवारांचे वर्चस्व वाढेल याभितीपोती सराफांपासून अंतर राखून ठेवण्याची पूर्ण काळजी घेतली. कुठल्याही परिस्थितीत सराफ विजयी होऊ नये अशी भूमिका स्विकारल्याने या दोन जिल्ह्यात काँग्रेसचेही बरेच मतदान फुटले. शिवसेना भाजपसोबत कुठेही नव्हती. त्यामुळे त्यांचे काही मतं भाजपाला काही काँग्रेसलाही गेलेत राजकीय नेते मानतात. एकूणच या संपूर्ण निवडणूकीत काँग्रेस, भाजप, राकाँ व शिवसेना या चारही पक्षात मतांची फाटाफुट होऊन ही लढाई निर्यायक टप्प्यावर संपली. व भाजपला निसटता विजय मिळाला. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे वर्धा जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तेली समाजाला प्रतिनिधीत्व दिले जात आहे. असा जाहीर प्रचार करण्यात आला. त्यामुळे तेली समाज या निवडणूकीत एकवटला. हा दावा भाजपचे खासदार रामदास तडसही नाकारत नाही. याचाही फायदा भाजपला तिनही जिल्ह्यात झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांसाठी या निवडणूकीने अनेक गोष्टी आता गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचा संदेश दिला आहे. यातून भाजप नेतृत्व धडा घेईल अशी अपेक्षा व्यर्थ ठरू नये.

Web Title: BJP gets big push in Vidarbha by winning lesser votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.