परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:42 PM2019-03-04T21:42:38+5:302019-03-04T21:43:06+5:30

वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.

The basis of pollination | परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार

परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार

Next
ठळक मुद्देउल्हास राणे : अ.भा. अंनिस व बहार नेचर फाऊंडेशनद्वारे आयोजित विज्ञान व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वनस्पती अचल असून सपुष्प वनस्पतीमध्ये ९० टक्के परागीकरण हे कीटक व अन्य पशुपक्ष्यांमार्फत होत असल्यामुळे परागीभवन हाच परिसंस्थांचा आधार आहे. तथापि, परागीभवन ही विस्मरणात गेलेली परिसंस्था प्रणाली असून परागसिंचकाची मुख्य भूमिका बजावणाऱ्या माशा, भुंगे, फुलपाखरे व अन्य कीटक यांच्या वाट्याला मानव प्राण्याकडून उपेक्षाच आलेली आहे, असे प्रतिपादन विज्ञान लेखक व पर्यावरणीय वास्तुशास्त्रज्ञ उल्हास राणे यांनी केले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा व बहार नेचर फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित मासिक विज्ञान व्याख्यानमालेत मासिक विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला दहावे पुष्प गुफतांना ते बोलत होते.
'उपेक्षित परागसिंचक' या विषयावर चित्रफितीद्वारे मांडणी करताना उल्हास राणे म्हणाले, मधामुळे मधमाशांवर प्रचंड संशोधन झालेले असून त्याच वेळेस इतर महत्त्वाचे परागसिंचक उपेक्षित राहिले. मधमाशांच्या बाजारीकरणाचा परिणाम अन्य परागसिंचकांवर झाला. शेतीचा विचार करताना जमीन, पाणी, खते आणि बियाण्यांचा विचार आपण केला; पण पीक उत्पन्नवाढीतमहत्त्वाची भूमिका बजावणारे परागसिंचक व परागसिंचन प्रणालीचे योगदान आपण दुर्लक्षित केले. वनाच्या विखंडनाचा परिणाम परागीभवन प्रक्रियेवर झालेला असून जेवढे नैसर्गिक जंगल कमी होत जाणार तेवढेच परागसिंचक कमी होत जाईल. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, एकल पीक पद्धती आणि मानवी वृत्तीत वाढत असलेला 'पॉशपणा' यासह अनेक बाबी परागसिंचकांच्या मुळावर उठलेल्या आहेत. ते विस्थापित होत असून या विस्थापितांची लढाई कोण लढणार, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.
परागसिंचकाचं संवर्धन हे जैवविविधता जोपासण्यातूनच होईल. त्यासाठी गाव व शहरात जैवविविधता जोपासणाऱ्या जैववैविध्य उद्यानांची निर्मिती तसेच शेतकऱ्यांनी बांधावर परागसिंचकाला साह्यभूत ठरणारी झाडेझुडपे लावावीत, असेही राणे यांनी यावेळी सुचविले.
अध्यक्षस्थानी प्रदीप दाते होते. संचालन प्रा. सुचिता ठाकरे यांनी केले. वक्त्यांचा परिचय दिलीप वीरखडे यांनी दिला तर आभार वैभव देशमुख यांनी मानले. व्याख्यानाला डॉ. तारक काटे, मुरलीधर बेलखोडे, संजय इंगळे तिगावकर, प्राचार्य राम उमरे, प्राचार्य रेखा ठाकरे, संगीता इंगळे, प्रा. एकनाथ मुरकुटे, राहुल तेलरांधे, स्नेहल कुबडे तसेच अन्य अभ्यासक उपस्थित होते.

Web Title: The basis of pollination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.