केळझर येथील उत्खननात सापडली पुरातन बावडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:49 AM2019-02-16T00:49:59+5:302019-02-16T00:50:18+5:30

येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसराच्या पूर्व दिशेने सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन चिरेदार पाषाणाची विहीर (बावडी) आढळून आली.

Antique foundry found in the excavator at Kelzer | केळझर येथील उत्खननात सापडली पुरातन बावडी

केळझर येथील उत्खननात सापडली पुरातन बावडी

Next
ठळक मुद्देप्राचीन मंदिर व मूर्तीचेही अवशेष : तेरा ते चौदाच्या शतकातील काळ असण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : येथील सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसराच्या पूर्व दिशेने सुरू असलेल्या उत्खननात प्राचीन चिरेदार पाषाणाची विहीर (बावडी) आढळून आली. तसेच देवतांचे भग्नावशेष, जैन तिर्थकरांच्या मूर्तीचे अवशेष, भगवान शंकराचे वाघ, डमरु, शिवलींगाचे भग्नावशेष मिळाल्याने केळझर व जुन्या एकचक्रीनगरला प्राचीन ऐतिहासीक वारसा असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातन पदव्युत्तर विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात सोळा विद्याथ्याची चमू अभ्यासाचा एक भाग म्हणून मागील एक महिन्यापासून उत्खननाचे काम करीत आहे. त्यांच्या दिमतीला गावातील १५ ते २० मजूर कामाला आहेत. सिध्दीविनायक गणपती मंदिराचे अध्यक्ष माधवराव ईरूटकर व सचिव महादेवराव कापसे यांचेही सहकार्य लाभत आहे. येथील खोदकामात प्राचीन बावडी (चिरेदार पाषाणाच्या पायऱ्यांची विहीर) दृष्टीपथास आली.
सध्या हे काम पुर्णत्वास गेले नसून या विहिरीत पाणीसाठा असल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्याचप्रमाणे जैन तिर्थकारांच्या मूर्तीचे अवशेष, देवी- देवतांच्या मूर्तीचे अवशेष, पुरातन विटा, खापर आदी वस्तू मिळाल्यात.
याच परिसरात गणेश तलावाच्या बाजूला खोदकाम सुरु आहे. तेथील खोदकामात भगवान शंकराचे वाघ, डमरु व शिवलींगाचे भग्नावशेष तसेच मंदिराच्या कळसावर असणारी चिरेदार पाषाणाची कोरीव कलाकृती मिळाल्याने याठिकाणी भूमिगत भगवान शंकराचे मंदिर असल्याचा कयास लावल्या जात आहे. त्याच दृष्टीने पुढील खोदकामाला गती देण्यात आली आहे.
या उत्खननात मिळालेले संपूर्ण अवशेष हे प्राचीन वाकाटकाच्या काळानंतरचे व यादव कालीन (हेमाडपंथीय) इसवी सन १३ किंवा १४ व्या शतकातील असल्याचा अंदाज या विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांनी व्यक्त केला आहे. तसेच केळझर गावाच्या सभोवताल दीड ते दोन किलो मीटरच्या परिघात भूमिगत जैन व हिंदू मंदिरांचे मोठ्या प्रमाणात अवशेष असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मागील वर्षीसुध्दा याच काळात डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात या विभागाच्या विद्यार्थ्यांनी येथे उत्खनन केले होते. त्यावेळी मृत अश्वाचा सांगाडा आणि मातीची भांडी, काचेचे मणी आदी वस्तू मिळाल्या होत्या. प्रत्येक वेळी उत्खननात मिळणाºया प्राचीन ऐतिहासीक वास्तू व वस्तुंमुळे या एकचक्रीनगरला प्राचीन ऐतिहासिक वारसा असल्याचे सिध्द होत आहे. हा भूभाग ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा असल्याचेच आता दिसून येत आहे.

Web Title: Antique foundry found in the excavator at Kelzer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.