Killed in road accident in Gaangwad; Accident when crossing the road | येणेगूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार; रस्ता ओलांडताना झाला अपघात 

उस्मानाबाद : भरधाव वेगातील ट्रकने रस्ता ‘क्रॉस’ करणार्‍या महिलेस जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत महिलेस रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर बस थांब्यानजीक घडली. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महालिंगरायवाडी येथील महिला शारदबाई मुकिंदा घोरपडे (वय ५५) या विद्युत बिल भरण्यासाठी येणेगूर येथे आल्या होत्या. बस थांब्यानजीक रस्ता ओलांडून जात असतानाच भरधाव वेगातील ट्रकने (क्र.एमएच.२५/यू.०१६३) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शारदाबाई यांना उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकॉ निवृृत्ती बोळके, पो.ना. दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळास भेट देवून चौकशी केली. तसेच चालक विकास श्रीमंतराव गवळी (रा. घोटाळ, ता. बसवकल्याण) यास ट्रकसह ताब्यात घेतले. या प्रकरणी मुरूम पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.