काँग्रेसच्या पोतडीतून ‘बाबा’ निघाले; संक्रांतीनंतर ‘उत्तरायण’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:42 PM2019-01-24T18:42:36+5:302019-01-24T18:44:13+5:30

काँग्रेसला आता उत्तरेचे वेध लागलेले दिसतात़ म्हणूनच की काय, नव्या जिल्हाध्यक्ष निवडीत उत्तर उस्मानाबादला संधी मिळाली आहे़

'Baba' went out of the Congress' ward; Uttarayanan after the transition! | काँग्रेसच्या पोतडीतून ‘बाबा’ निघाले; संक्रांतीनंतर ‘उत्तरायण’ !

काँग्रेसच्या पोतडीतून ‘बाबा’ निघाले; संक्रांतीनंतर ‘उत्तरायण’ !

googlenewsNext

- चेतन धनुरे 
उस्मानाबाद : वर्षानुवर्षे दक्षिणेवर वर्चस्व गाजवल्यानंतर काँग्रेसला आता उत्तरेचे वेध लागलेले दिसतात़ म्हणूनच की काय, नव्या जिल्हाध्यक्ष निवडीत उत्तर उस्मानाबादला संधी मिळाली आहे़ जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यात चांगले बस्तान असताना हे पदही अनेक वर्षे याच भागात राहिले़ परिणामी, उत्तर उस्मानाबादकडे दुर्लक्ष होवून या भागात पक्षावर ‘संक्रांत’ कोसळली़ बहुधा या आयणातून बाहेर पडण्यासाठीच आता उत्तरेतील ‘बाबा’ काँग्रेसने पोतडीतून बाहेर काढत उत्तरायणाची सुरुवात केलेली दिसते़

काँग्रेस पक्षाने बुधवारी जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत़ त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून वाशीचे प्रशांत (बाबा) चेडे यांच्या गळ्यात माळ पडली़ या निवडीला ‘उत्तरायणा’ची किनार निश्चितच आहे़ कारण; उस्मानाबाद-कळंब व भूम-परंडा-वाशी मतदारसंघात काँग्रेस आजघडीला जणू अस्तित्वशून्यच आहे़ हल्लीच जिल्हास्तरावरील काही पदे या भागासाठी सोडून काँग्रेसने आपले संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे़ तत्पूर्वीचा इतिहास मात्र, दक्षिण उस्मानाबादच्याच नावे लिहिला गेला आहे़ अगदी काँग्रेसपासून फारकत घेत १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतरच्या काळातील जिल्हा काँग्रेसचा इतिहास हा ‘लिमिटेड’ राहिला आहे. सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, मधुकरराव चव्हाण, बस्वराज पाटील, आप्पासाहेब पाटील ही मंडळी उस्मानाबादच्या दक्षिण भागातील़ त्यांनी या भागात काँग्रेस चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या भागात काँग्रेसची ताकद चांगलीच आहे़ मात्र, उत्तर भागात राष्ट्रवादीच्या प्रभावी आक्रमणाने ही ताकद अगदीच क्षीण झाली़ विभक्त झाल्यानंतरही या भागात काँग्रेसने राष्ट्रवादीविरुद्ध बळ आजमावून पाहिले होते़ मात्र, मोठ्या फरकाने पराभव पाहिला़ त्यामुळे काँग्रेसने जणू उत्तरेचा नादच सोडून दिला़ इतिहास सांगतो की, जिल्हा पूर्णपणे काँग्रेसच्या वर्चस्वाखाली होता़ स्वाभाविकच, विभक्त झाल्यानंतरही या काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व जिल्ह्यावर असणे क्रमप्राप्त होते़ मात्र, वर्चस्वाच्या लढाईत हे दोन पक्षच ऐकमेकांचे विरोधक ठरले़ अगदी आघाडी झाल्यानंतरही येथील काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुरावा संपुष्टात आला नाही़ ऐकमेकांना शह देण्याचा प्रयत्नात शिवसेना चांगलीच वाढली़ किंबहुणा वाढविली गेली, म्हटले तरी वावगे ठरणार नाही़ परिणामी, दक्षिणेतील काँग्रेसींनी आपापली ‘सुभेदारी’ राखण्यातच धन्यता मानली़ यातूनच काँग्रेस फुटली तेव्हापासून व तत्पूर्वीचाही बराचसा काळ पक्षाचे जिल्हाध्यक्षपद हे याच भागात राहिले.

 २००० ते २००५ या काळात उस्मानाबादचे विश्वासअप्पा शिंदे व २००५ पासून ते कालपर्यंत सलग १४ वर्षे तुळजापूरच्या अप्पासाहेब पाटील यांच्याकडे हे पद राहिले़ २००० पूर्वीही हे पद अणदूरच्या सिद्रामप्पा आलुरे गुरुजींकडे काही काळ राहिले़ परिणामी, उत्तरेत काँग्रेसचे ‘पानिपत’ झाले़ आता इतक्या वर्षानंतर काँग्रेसने हे ध्यानी घेऊन ‘उत्तरायणा’स प्रारंभ केला आहे़ वाशीचे प्रशांत (बाबा) चेडे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन उत्तर बाजू मजबूत करण्याच्या दिशेने काँग्रेसने पाऊल टाकलेले दिसते़ काँग्रेसची ही रणनिती कितपत यशस्वी ठरते, हे येणारा काळच सांगेल़

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाढल्या हालचाली
बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसने जिल्ह्याचे प्रमुख पद उत्तर उस्मानाबादकडे सोपविले आहे़ शिवाय, जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा हल्ली या भागात वावरही वाढला आहे़ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘उत्तरेत’ होत असलेल्या या हालचाली वेगळ्याच चर्चांना तोंड फोडणाऱ्या ठरत आहेत़  वाटाघाटीत उस्मानाबादची जागा ही राष्ट्रवादीच्याच वाट्याला आलेली आहे़ उमेदवारांची चाचपणीही सुरु आहे़ मात्र, ऐनवेळी गरज पडल्यास काँग्रेसचीही तयारी असावी, कमकुवत असलेल्या उत्तर भागात ‘ग्राऊंड’तयार असावे, याअनुषंगाने या हालचाली असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले

Web Title: 'Baba' went out of the Congress' ward; Uttarayanan after the transition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.