जलकुंभ पडले कोरडेठाक , पाणीटंचाईमुळे नागरिकांचे झाले हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:52 AM2018-08-17T01:52:46+5:302018-08-17T01:53:05+5:30

अंबरनाथमध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या नावावर शहरात जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, हे जलकुंभ भरण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाणी कमी पडत आहे.

water shortage in Ambarnath | जलकुंभ पडले कोरडेठाक , पाणीटंचाईमुळे नागरिकांचे झाले हाल

जलकुंभ पडले कोरडेठाक , पाणीटंचाईमुळे नागरिकांचे झाले हाल

Next

- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथमध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या नावावर शहरात जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, हे जलकुंभ भरण्यासाठी जीवन प्राधिकरणाला पाणी कमी पडत आहे. त्यामुळे तयार झालेले जलकुंभ कोरडे ठेवण्याची वेळ आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून दोन ते तीन दिवस पाण्यावाचून राहण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे अंबरनाथसाठी ६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतानाही शहरात पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याने आता हे पाणी अधिकारी कुठे मुरवतात, याचा शोध घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
अंबरनाथच्या लोकसंख्येचा विचार करता शहराला सरासरी ४५ ते ५० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. मात्र, अंबरनाथच्या नावावर ६० दशलक्ष लीटर पाणी उचलण्यात येत आहे. आवश्यकतेपेक्षा १० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी उचलण्यात येत असतानाही शहरात मात्र कायमचा पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची गळती वाढल्याने नवीन योजना कार्यान्वित केली गेली. मात्र, नव्या योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाही या योजनेतील पाण्याची गळती मात्र वाढलेली आहे. नव्या योजनेनंतर पाण्याची गळती कमी होणे अपेक्षित असतानाही ते काम करता आलेले नाही. आजही अंबरनाथमधील एकूण पाणीपुरवठ्यापैकी ३७ टक्के पाण्याची गळती होत आहे. त्यात पाणीचोरी आणि जलवाहिनीला लागलेली गळती यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने अतिरिक्त पाणी उचलूनही नागरिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.
नव्या योजनेच्या नावावर शहरात जलकुंभ उभारण्यात आले. मात्र, या जलकुंभाची चाचणी करण्यासाठीही पाणी कमी पडत आहे. नारायणनगर येथील जलकुंभ सुरू केल्यास या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, याची पूर्ण जाणीव प्राधिकरणाला आहे. मात्र, हा जलकुंभ सुरू करण्यासाठी पाणीच चढवले जात नाही. जलकुंभातून बाहेर पडणारे पाणी नव्या जलवाहिनीतून जात असल्याने त्यात असलेला कचरा आणि गाळ हा नागरिकांच्या घरातील नळाद्वारे बाहेर पडतो. जलवाहिन्यांची तपासणी करण्यासाठी अनेकवेळा या जलकुंभातील पाणी तपासणीसाठी सोडण्यात आले. मात्र, आजही दूषित पाणी येत आहे.
नारायणनगर येथील पाण्याची टाकी २५ टक्केही भरण्यात येत नाही. अपूर्ण भरलेल्या पाण्याच्या टाकीतूनच पाणीपुरवठा केला जातो. मुळात बदलापूरहून अंबरनाथला आवश्यक असलेले पाणी अंबरनाथपर्यंत येत नसल्याने जलकुंभ भरला जात नाही. जावसई आणि नारायणनगर येथील जलकुंभ अर्धवट असतानाच या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. नारायणनगरच्या जलकुंभात अजून पूर्ण क्षमतेने पाणी साठवलेले नाही. नागरिकांच्या वाट्याला जाणारे पाणी या जलकुंभात वळवण्यात येत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
मागील १५ दिवस जलकुंभाची तपासणी केली जात असल्याचे कारण पुढे करून नागरिकांचे पाणी पळवण्याचे काम प्राधिकरणाचे अधिकारी करत आहेत. नागरिकांना पुरेसे पाणी दिल्यानंतर तपासणी होणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांना तहानलेले ठेवत चाचणी केली जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार कामामुळे आजही जलकुंभ सुरू झालेले नाही. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता जलकुंभ सुरू करण्याचे काम करण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, असे मोघम उत्तर दिले.

टाकीवर चढून नागरिकांचे आंदोलन


अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागातील पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात अधिकारी अपयशी झाल्याने त्यांना जागे करण्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. जलकुंभ सुरू होत नसल्याने नागरिकांनी त्यावर चढून आपला संताप व्यक्त केला. अखेर गुरुवारपासूनच हा जलकुंभ सुरू केला जाईल असे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेतले. मात्र आठवड्याभरात पाणी पुरवठ्यात काय बदल होतो हे पाहिल्यावर आंदोलनाची पुढची भूमिका निश्चित होईल असे आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले.
पश्चिमेतील कमलाकरनगर, कोहोजगाव, शंकर हाइर्टस्, नारायणनगर, चिंचपाडा, रसाळ चाळ, भोपीवाडी, विठ्ठल मंदिर परिसर, वांद्रापाडा, गौतमनगर या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागाला पाणी पुरवठा करणाºया जलकुं भाचे काम पूर्ण झालेले असतानाही त्यातून पाणी पुरवठा होत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. मागील आठवड्यात या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाºयांना ताकीदही दिली होती. मात्र असे असतानाही ही समस्या सुटत नसल्याने गुरूवारी महिलांच्या आक्रोशाला अधिकाºयांना सामोरे जावे लागले.
२०० हून अधिक महिलांनी थेट पाण्याच्या टाकीसमोरच जनआक्रोश केला. महिला मोठ्या संख्येने या पाणी समस्येच्या विरोधात एकवटलेले पाहून अधिकाºयांना घाम फुटला. अखेर पाटील, चरण रसाळ आणि उमेश पाटील यांनी अधिकाºयांशी चर्चा केली. जोपर्यंत पाण्याची टाकी सुरु होत नाही तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने अधिकाºयांना लेखी आश्वासन द्यावे लागले. प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनात गुरूवारपासून टाकीतून पाणी पुरवठा केला जाईल असे स्पष्ट केले. तसेच रात्रीच्या पाण्याची वेळ बदलून ती दिवसा करण्यात येईल असे सांगितले. मात्र अधिकाºयांच्या पोकळ आश्वासनावर विश्वास न ठेवता संतप्त नागरिकांनी थेट टाकीवर चढून प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

अंबरनाथला आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी मिळत असतानाही जीवन प्राधिकरणाला जलकुंभातून पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे शहरातील काही जलकुंभ हे केवळ शोभेसाठी उभारले आहेत. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांवर वरिष्ठांचा धाक राहिलेला नाही. - प्रदीप पाटील, गटनेते

नागरिकांना वितरित करण्यात येणारे पाणी हे जलकुंभात चढवून त्याची चाचपणी केली जात आहे. आठवड्यातील सहा दिवस नागरिकांना पाणी द्यावे आणि एक दिवसाचे पाणी टाकीला चढवून त्याची चाचपणी करावी. मात्र, प्राधिकरणाचे अधिकारी निव्वळ नागरिकांना त्रास देत आहेत. - उमेश पाटील, नगरसेवक

... तर कार्यालयात बसू देणार नाही

संतप्त आंदोलनांनी लागलीच पाण्याची टाकी सुरू करण्याची मागणी केली. अखेर हतबल झालेल्या अधिकाºयांनीही लागलीच जलकुंभ सुरू करत आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. मात्र होणारा पुरवठा खंडित झाल्यास अधिकाºयांना कार्यालयात बसू दिले जाणार नाही अशी भूमिका घेतली. या आंदोलनात उमेश पाटील, महिला अध्यक्षा निलीमा नायडू यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सहभागी झाले होते.

Web Title: water shortage in Ambarnath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.