ठाणे, उल्हासनगरात १२ ड्रोनचा राहणार वॉच

By admin | Published: February 19, 2017 04:25 AM2017-02-19T04:25:04+5:302017-02-19T04:25:04+5:30

ठाणे आणि उल्हासनगर या दोन महापालिकांच्या हद्दीत सुमारे १२७ संवेदनशील मतदान केंद्रे असून या केंद्रांवर एकूण १२ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे.

Watch out for 12 drones in Ulhasnagar, Thane | ठाणे, उल्हासनगरात १२ ड्रोनचा राहणार वॉच

ठाणे, उल्हासनगरात १२ ड्रोनचा राहणार वॉच

Next

ठाणे : ठाणे आणि उल्हासनगर या दोन महापालिकांच्या हद्दीत सुमारे १२७ संवेदनशील मतदान केंद्रे असून या केंद्रांवर एकूण १२ ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाण्यात ९१, तर उल्हासनगरात ४० फ्लॅश पॉइंट तयार केले आहेत. मतदानाच्या दिवशी तक्रार आल्यास पोलीस अवघ्या तीन मिनिटांत पोहोचतील, अशी व्यवस्था केलेली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष तपास पथक स्थापन केले आहे. तसेच सुमारे ८ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये. यासाठी ठाणे शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही महापालिका हद्दीतील प्रत्येकी चार ठिकाणी २४ तासांची नाकाबंदी लावून तेथे एक अधिकाऱ्यासह ३ तीन कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही वॉच असणार आहे.
आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी ४३ गुन्हेगारांना अटक केली आहे. तर, ५ हजारांहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

बीटमार्शलमध्ये वाढ
संवेदनशील केंद्रे तसेच झोपडपट्ट्या येथे सशस्त्र पोलीस गस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातील बीटमार्शलमध्ये मतदानाच्या दिवशी १० ने वाढ केली आहे. ठाण्यात ३५, तर उल्हासनगरमध्ये १० बीटमार्शल वाढवले आहेत. दोन्ही महापालिका हद्दीतील बीटमार्शलची संख्या १२० असेल.

बाहेरून मागवला
अतिरिक्त बंदोबस्त
निवडणुकीसाठी बाहेरून ४०० अधिकारी, ११०० कर्मचारी, १२५० होमगार्ड व तीन ३ एसआरपी कंपन्या असा जवळपास तीन हजारांच्या घरात अतिरिक्त बंदोबस्त मागवला आहे.

समाजकंटकांच्या याद्या तयार
मतदानाच्या वेळी ज्या लोकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा लोकांवरील गुन्हे आणि गोपनीय माहितीच्या आधारे समाजकंटकांची यादी तयार केली आहे. ठाण्यात ३००, तर उल्हासनगरात १५० जणांचा त्या यादीत समावेश आहे.

ठाणे- उल्हासनगरातील एकूण बंदोबस्त
ठाणे महापालिका हद्दीत ४ पोलीस उपायुक्त, १६ सहायक पोलीस आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक, २११ अधिकारी आणि ३६३९ कर्मचाऱ्यांसह ८०० होमगार्ड आणि दोन एसआरपीच्या कंपन्या, तसेच उल्हासनगर येथेही दोन पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, ४७ पोलीस निरीक्षक, १४० पोलीस उपनिरीक्षक, १५३२ कर्मचारी आणि ४०० होमगार्डांसह १ एसआरपीची कंपनी तैनात राहणार आहे.

विशेष तपास पथकांची स्थापना
मतदानाच्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पोलीस ठाण्यात विशेष तपास पथक तयार केली आहेत. तक्रार आल्यावर अवघ्या तीन मिनिटांत हे पथक घटनास्थळी पोहोचेल. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी असणार आहेत.

जिल्ह्यात प्रथमच ड्रोनचा वापर
मतदानाच्या दिवशी ठाण्यात ८ आणि उल्हासनगर येथे ४ ड्रोन संवेदनशील मतदान केंद्रे असलेल्या परिसरात उडवण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात अशा प्रकारे ड्रोनचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. संबंधित उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनचा वापर के ला जाणार आहे.

अतिथींना जावे लागणार परत
निवडणूक प्रचाराकरिता ठाणे, उल्हासनगरात दाखल झालेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना रविवारी प्रचारसमाप्तीनंतर शहर सोडून जाण्यास सांगितले आहे. रविवारी सायंकाळनंतर ही मंडळी उतरलेली हॉटेल, लॉज आदींची तपासणी पोलिसांद्वारे केली जाणार आहे.

बाळकुमला साडेचार लाखांची रोकड जप्त, मुंब्य्रात अ‍ॅडमिनवर गुन्हा दाखल
१बाळकुम चेकपोस्ट येथे तैनात पथकाने शनिवारी सकाळी भिवंडीवरून बाळकुमनाक्याकडे येणाऱ्या रेंज रोव्हर गाडीमधून ४ लाख ६१ हजार ८८० एवढी रोख रक्कम जप्त केली असून अधिक तपासाकरिता आयकर खात्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
२त्याचप्रमाणे शमीन खान इत्तेहात वेल्फेअर ट्रस्ट, शीळ-मुंब्रा यांच्या तक्रारींच्या आधारे सोशल मीडियाद्वारे मतदारांच्या भावना भडकावण्यास कारणीभूत असलेला मजकूर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित केल्याबद्दल आचारसंहिता पथकप्रमुख प्रभाग क्र . २९, ३३ यांनी मुंब्रा पोलीस स्टेशनला अवेअरनेस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन तरबेज कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मूळ बॅनरमध्ये फेरफार करून आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत ९७ संवेदनशील केंद्रे, मुंब्रा येथे सर्वाधिक लक्ष
महापालिकेमार्फत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून आता शेवटच्या टप्प्यातील कामकाज शिल्लक आहे. महापालिकेने शहरातील मतदान केंद्रांची यादी जाहीर केली असून शहरात १७०४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ९७ मतदान केंदे्र संवेदनशील असून १८ मतदान केंदे्र ही मुंब्य्रात आहेत. यात परिमंडळ-१ मध्ये चार पोलीस ठाण्यांत मिळून ४० मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून जाहीर केले आहे. यात सर्वाधिक १८ संवेदनशील मतदान केंदे्र एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत.
त्यानंतर, राबोडी आणि कळवा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी नऊ संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित केली आहेत. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार तर परिमंडळ पाच मध्ये ५७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. यात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १४ मतदान केंदे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. त्याखालोखाल वर्तकनगर १२, कोपरी १०, कापूरबावडी ६, श्रीनगर ६, चितळसर-मानपाडा ५ आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ मतदान केंद्रांचा समावेश आहे

Web Title: Watch out for 12 drones in Ulhasnagar, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.