राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश

By अजित मांडके | Published: October 17, 2023 12:50 PM2023-10-17T12:50:23+5:302023-10-17T12:50:44+5:30

प्रलंबित कामांबाबत जबाबदारी निश्चित करणार

Time limit for completion of ongoing works funded by the State Government by December 15; | राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश

राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश

ठाणे  : ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झालीच पाहिजेत. रस्त्यांची जी कामे प्रलंबित राहतील त्याबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात  ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून एकूण २८२ रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. त्यात, विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पध्दतीने रस्त्यांची कामे केली जात आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू असलेली ही कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. पावसाळ्याच्या मोसमात, जुलै महिन्यापासून ही कामे थांबविण्यात आली होती.

आता ती कामे पुन्हा सुरू झालेली आहेत. त्यापैकी, जी कामे अपूर्ण आहेत ती महिन्याभरात आणि जी कामे नव्याने सुरू करायची आहेत ती दोन महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन सर्व कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकण्यात आले आहे. सर्व अपूर्ण व नवीन कामाची यादी करून त्यांची कालमर्यादा आखून घ्यावी. त्यात, प्रलंबित कामांसाठी, भूसंपादन करण्याचा विषय वगळता कोणताही अपवाद केला जाणार नाही. काही कामे शक्य नसतील तर त्याची सयुक्तिक कारणमीमांसा सादर करावी. तशा कामांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करताना गुणवत्तापूर्ण कामे आणि कालमर्यादा याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रकल्पातील कामे सुरू आहेत असे होता कामा नये. कमीत कमी कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. कार्यकारी अभियंत्यांनी  पुढाकार घेऊन कामांना गती द्यावी. जिथे काही अडचणी येतील त्यावर पर्याय शोधावा. तरीही मार्ग निघाला नाही तर वरिष्ठांशी बोलून मार्ग काढून घ्या. कोणत्याही स्थितीत १५ डिसेंबरनंतर ही कामे प्रलंबित राहू नयेत, याचा पुनरुच्चार आयुक्तांनी केला.

रस्त्यांची नवीन कामे करताना दक्षता घ्या

रस्त्यांची नवीन कामे सुरू करताना काही ठिकाणी वाहतूक वळवावी लागेल. अशा ठिकाणी नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल, याची दक्षता अभियंत्यांनी घ्यावी, असेही बांगर यांनी नमूद केले.

त्याचबरोबर, पावसाळ्यापूर्वी सुरू किंवा पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या व्यतिरिक्त इतर काही रस्त्यांची पावसाळ्यात दुरुस्ती करावी लागली असेल तर अशा रस्त्यांची प्रभाग समितीनिहाय माहिती सादर करावी. त्यात, रस्त्यांची नावे, लांबी, मालकी, दोष दायित्व कालावधी आदींची माहिती द्यावी. त्यातून त्या रस्त्यांचे पुढील पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे शक्य होईल, असेही आयुक्त बांगर यांनी सांगितले. या बैठकीत, महापालिका क्षेत्रातील शौचालय दुरुस्ती आणि बांधकाम, शाळा दुरुस्ती, रेल्वे स्थानक परिसर सौंदर्यीकरण, उड्डाणपुलाखालील क्रीडा सुविधा यांचाही आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीला, महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उप नगर अभियंता रामदास शिंदे, विकास ढोले, उपायुक्त उमाकांत गायकवाड, सर्व कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

Web Title: Time limit for completion of ongoing works funded by the State Government by December 15;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.