ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 08:43 PM2021-11-14T20:43:09+5:302021-11-14T20:43:22+5:30

ठाणे शहरातून सुरू झालेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या २२ जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आमच्या भागात सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

Thane Global Covid Care Center will soon be replaced by a Cancer Hospital | ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार

ठाणे ग्लोबल कोविड केअर सेंटरच्या जागी लवकरच कर्करोग रुग्णालय सुरू करणार

Next

ठाणे -  रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून ठाण्याच्या छोट्याशा कार्यालयातून सुरु केलेला हा आरोग्ययज्ञ यापुढेही अखंडितपणे सुरू रहावा, अशी इच्छा राज्याचे नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या वतीने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या वैद्यकीय मदत कक्ष रुपी रोपट्याला आता बहर येऊ लागला आहे. कोरोना काळात अखंडितपणे रुग्णांना सेवा देणारा मदत कक्ष अशी या वैद्यकीय मदत कक्षाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. अवघ्या चार वर्षांत लाखो रुग्णांना मदत करण्यासोबतच तब्बल ६० कोटी रुपयांची सवलत रु ग्णांना मिळवून देण्यापर्यंतचे काम या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून केले आहे.

ठाणे शहरातून सुरू झालेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या २२ जिल्ह्यामध्ये शाखा पसरल्या आहेत. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आमच्या भागात सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याची भावनाही या कक्षाचे संस्थापक शिंदे यांनी व्यक्त केली. कोणतंही संकट समोर येवो सांगली, कोल्हापूर, महाड, चिपळूण, खेड, पाटण, केरळ येथे आलेला पूर असो प्रत्येक ठिकाणी सेवा देण्यासाठी आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तत्पर असतो. महापुरानंतर गावागावात रोगराई पसरू नये यासाठी या कक्षातील डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आज या मदत कक्षाशी जोडलेले डॉक्टर कोणतीही आपत्ती अली तर स्वत:हून आम्हाला फोन करतात की आम्ही कधी मदत घेऊन जायचे ते सांगा ही या मदत कक्षाची ताकद आहे. कोरोना काळात अवघ्या २२ दिवसात एक हजार १५० बेडसचे रुग्णालय उभे करून त्यात आयसीयू, डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आगामी काळात याच तातपुरत्या रु ग्णालयाचे कायमस्वरूपी रुग्णालयाचे रूपांतर करून तिथे कर्करोग रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला फोन आला की आम्ही तो वैद्यकीय मदत कक्षातील कार्यकर्त्यांना देतो आणि त्यानंतर एक दिवस तो माणूस त्यांना झालेल्या मदतीसाठी आम्हाला आभार मानायला येतो असं अनेकदा घडत असल्याचा अनुभव कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोविड योद्धा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला पर्यटन, विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, कामगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री बच्चू कडू, आमदार निलेश लंके, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

अदिती तटकरे यांनी महाड येथील पुराच्या वेळी शिंदे यांनी केलेल्या मदतीसाठी त्यांचे विशेष आभार मानले. तर निलेश लंके यांनी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना आपल्या मतदारसंघात राबवण्याची विनंती शिंदे यांच्याकडे केली. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी हा वैद्यकीय मदत कक्ष सुरू करून गोरगरीब रुग्णांना मदत केल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
या मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती, संस्था आणि रुग्णालयांना सन्मानित करण्यात आले. तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान सकाळी या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर कर्करोगाचा यशस्वी सामना केलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी या रोगाचा सामना कसा केला याबाबत आपले अनुभव कथन केले. तर अवयवदान चळवळीत काम करणारे पत्रकार संतोष आंधळे, रक्तदान चळवळीत सक्रीय असलेले आणि विविध वैद्यकीय विषयांवर विपुल लेखन करणारे जेष्ठ पत्रकार संदीप आचार्य आणि ज्येष्ठ हृदयरोगतज्ञ विजय सुरासे यांनी हृदयरोगाबाबत अतिशय उपयुक्त माहिती दिली. पत्रकार मिलिंद भागवत यांनी त्यांना बोलते केले.

दुपारी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी कार्यकर्त्यांची वैद्यकीय मदतीमागची भूमिका विषद करणारे व्याख्यान पार पडले. त्यानंतर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचे प्रमुख डॉ. सुधाकर शिंदे यांनी या योजनेची माहिती दिली. यावेळी पर्यटन, विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, कामगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री बचचू कडू, आमदार निलेश लंके, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष राजा माने,ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेवक राम रेपाळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेविका परिषा सरनाईक, उल्हासनगर शहराच्या महापौर लिलाबाई आशान, ठाणे जिल्हा रु ग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटीलआदी मान्यवर तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यभरातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thane Global Covid Care Center will soon be replaced by a Cancer Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.