दहीहंडी उत्सवावर स्वाइनचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 04:09 AM2018-09-01T04:09:58+5:302018-09-01T04:10:16+5:30

महापालिका सतर्क : सावधानतेचे आवाहन; ठाण्यातच बाधा झाल्याने मास्क वापरण्याचा सल्ला

Swine stains on the Dahihandi festival | दहीहंडी उत्सवावर स्वाइनचे सावट

दहीहंडी उत्सवावर स्वाइनचे सावट

ठाणे : येत्या ३ सप्टेंबर रोजी ठाण्यात सर्वत्र दहीहंडी उत्सवाची धूम उडणार आहे. परंतु, या उत्सवासह रविवारच्या मॅरेथॉनवरही यंदा स्वाइन फ्लूचे काळे ढग ओढवले आहेत. ठाण्यात एका महिलेला स्वाइनची लागण झाली असून त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्या महिलेला ठाण्यातच बाधा झाल्याने गर्दीची ठिकाणे टाळावीत, तोंडाला किमान मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची धूम काहीशी कमी झाली होती. परंतु, न्यायालयीन बंधने उठल्याने यंदापासून पुन्हा तीची धूम उडणार आहे. यंदा तर प्रथमच भाजपानेही दहीहंडी उत्सवात उडी घेतल्याने ती फोडण्याची चुरस निर्माण होणार आहे. मनसेने १० थरांची हंडी उभारली आहे. शिवसेनासुद्धा विविध ठिकाणी हंडी उभारणार आहे. परंतु, या उत्सवावर स्वाइन फ्लूचे सावट घोंगावू लागले आहे. ठाण्यातील माजिवडा, लोढा भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेला त्याची लागण झाली आहे. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टिकोनातून पालिकेने या भागात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच कळवा रुग्णालयात एक वॉर्डही सज्ज ठेवला आहे. ठाण्यात पहिलाच रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०१५ मध्येसुद्धा अशाच प्रकारे स्वाइन फ्लूने ठाण्यात डोके वर काढले होते. तेव्हा ३५० हून अधिक रुग्ण आढळले होते. त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने आतापासूनच खरबदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दहीहंडी उत्सवात तर हंडी फोडण्यासाठी येणाºया मंडळांची पोरं आणि पाहण्यासाठी बघ्यांची होणारी गर्दी यामुळे याच ठिकाणी काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हणणे व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी गेल्यास तोंडाला मास्क लावावा, सर्दी जास्त दिवस असेल तर काळजी घ्यावी, घसा कोरडा पडत असेल, खवखव होत असेल, अंग दुखत असेल किंवा ताप येत असेल, तर वेळीच उपचार करावेत, असे आवाहन महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी केले आहे.

२१६ बिल्डरांसह ३०१ टायर पंक्चर दुकानदारांना नोटिसा
ठाणे : ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग साथरोग आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. त्यानुसार, आतापर्यंत ३०१ टायर पंक्चर काढणाºया दुकानदारांना आणि २१६ विकासकांना नोटिसा बजावल्या असून दोन लाख ३० हजार ५२७ घरांचा सर्व्हे केला आहे. त्यानुसार, आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले असून जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत या रुग्णांची संख्या ६५ एवढी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मलेरियाचे ४९९ आणि हत्तीरोगाचे पाच आणि स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी हे प्रमाण आटोक्यात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. वारंवार बदलत असलेल्या हवामानामुळे साथरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मागील वर्षी मलेरियाचे जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १३०० रुग्ण आढळले होते. यंदा याच कालावधीत ४९९ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे मागील वर्षी याच कालावधीत १६४ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या ६५ वर आली आहे. त्यामुळे साथरोग आटोक्यात असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला. दुसरीकडे गेल्या वर्षी हत्तीरोगाचे ११, तर यंदा याच कालावधीत पाच रुग्ण आढळले असून स्वाइन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत सुदैवाने एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

साथरोग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख ३० हजार ५२७ घरांचा सर्व्हे केला आहे. तर, जनजागृतीच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांच्या गेटवर लावण्यात आलेल्या मराठी जाहीर नोटिसांची संख्या ९३ हजार ७४१ एवढी, तर हिंदी भाषेतील नोटिसांची संख्या ३९ हजार ७०२ एवढी आहे. साथरोग नियंत्रणाबाबत ३०१ टायर पंक्चर दुकानदारांना आणि २१६ बिल्डरना नोटिसा बजावल्या आहेत.
- डॉ. आर.टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठामपा

Web Title: Swine stains on the Dahihandi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.